कोकण पदवीधर निवडणुकीतील राष्ट्रवादी, शिवसेनेच्या उमेदवारांवर गुन्हे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jun-2018
Total Views |




प्रतिज्ञापत्रातून बाब उघड


ठाणे : कोकण पदवीधर निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने उमेदवारी दिलेल्या उमेदवारांच्या नावावर गुन्हे दाखल असल्याची बाब समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्यावर सर्वाधिक गुन्हे दाखल असून, शिवसेनेच्या संजय मोरे यांच्यावरदेखील विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून समोर आली आहे. तर भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे याच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नसल्याचे त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून समोर आले आहे.

 

दि. २५ जून रोजी कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, आता निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी १४ उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये प्रमुख लढत असल्याचे म्हटले जात आहे. नुकतेच सर्व उमेदवारांनी आपले प्रतिज्ञापत्र सादर केले असून, राष्ट्रवादीच्या नजीब मुल्ला यांच्यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये २० पेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे भ्रष्टाचार निर्मूलन कायद्यांतर्गतही त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. गुन्हेगारी कारस्थान, संपत्ती हडपणे, खोटी कागदपत्रे तयार करणे अशा विविध गुन्ह्यांची नोंद असल्याचे त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. तर आपल्या नावे १६ कोटी ८९ लाख ३५ हजार आणि पत्नीच्या नावे सात कोटी ९८ लाख ९८९ रुपयांचे उत्पन्न असल्याची माहिती मुल्ला यांनी सादर केली आहे. तर शिवसेनेचे संजय मोरे यांच्यावरही नौपाडा आणि ठाणेनगर पोलीस ठाण्यात सार्वजनिक शांतताभंग करणे, लोकसेवकावर हल्ला करणे, अतिक्रमण करणे अशा स्वरूपाच्या गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती समोर आली आहे. तर त्यांच्याकडे एकूण एक कोटी ६४ लाखांची स्थावर मालमत्ता असून, आपला टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. तर त्यांच्या पत्नीचा इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय असल्याचीही माहिती त्यांनी दिली आहे.

 

निरंजन डावखरेंवर एकही गुन्हा नाही

 

भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्यावर एकाही गुन्ह्याची नोंद नसून, त्यांच्याकडे ११ कोटींची चल आणि ७ कोटी ७९ लाखांची अचल संपत्ती असल्याची माहिती त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून समोर आली आहे. भारतीय जनता पक्षाचे निरंजन डावखरे यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावर कोणत्याही पोलीस ठाण्यात एकही गुन्हा नोंदवला नसून, कोणत्याही न्यायालयात एकही खटला सुरू नसल्याची माहिती दिली आहे.

@@AUTHORINFO_V1@@