बोले तैसा चाले...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jun-2018
Total Views |



पालकत्वाचा प्रवास आपल्या मुलांच्या माध्यमातून आपल्याला आत्मशोधाकडे नेणारा असेल, तर तो जास्त कल्पक, आनंदी व प्रगतिशील होऊ शकतो. विनाकारण खांद्यावर ठेवून, घेतलेले अहंकाराचे जू मात्र आपल्याला उतरवता आले पाहिजे.

 

“स्वत: शीघ्रकोपी आहे. माझ्या मुलाने तेच गुण उचलले आहेत नेमके.” एका वडिलांनी मुलाच्या ‘रागीट’ (?) स्वभावाचे वर्णन करून, शेवट या वाक्याने केला. “छान! म्हणजे मुलाच्या जोडीने तुमच्या स्वभावातल्या दोषांवर पण काम करण्याची चांगली संधी समोर आली आहे की आपल्या!” अशी सुरुवात मी केल्यावर मात्र ते विचारात पडले. मुलाच्या आईने ‘अगदी खरंय’ असे दशर्विणारी मान हलवली, हे माझ्या नजरेतून सुटले नाही. पालकत्वाचा प्रवास आपल्या मुलांच्या माध्यमातून आपल्याला आत्मशोधाकडे नेणारा असेल, तर तो जास्त कल्पक, आनंदी व प्रगतिशील होऊ शकतो. विनाकारण खांद्यावर ठेवून, घेतलेले अहंकाराचे जू मात्र आपल्याला उतरवता आले पाहिजे.

 

पालक ‘काय सांगतात’ यापेक्षा जास्त ‘कसे बोलतात व वागतात’ याची मुलांच्या मनात नोंद होत असते. गाडी चालवताना अचानक मध्ये कुणी आले, तर आपली होणारी प्रतिक्रिया, जायची इच्छा नसलेल्या पार्टीचे आमंत्रण टाळताना आपण वापरलेले कारण, घरकामाच्या बाईने न सांगता घेतलेल्या सुट्टीबद्दल आपण व्यक्त केलेले मत, नातेवाईकांबद्दल त्यांच्या अपरोक्ष उल्लेखिलेली विशेषणे, वादावादीमध्ये परस्परांबद्दल वापरलेले शब्द, अशा अनेक गोष्टी मुले टिपत असतात. असे बरेच काही ऐकून घेतल्यानंतर एक आई मला त्राग्याने म्हणाली होती, “म्हणजे काय माणसासारखं वागायचंच नाही का?” मी त्यांना म्हटले, “हो तर, वागायचं ना! खरंतर माणसासारखंच वागायचं. जसं माणूस आपल्या मुलांनी व्हावं असं आपल्याला वाटतं, तसं वागायचं.”

 

कॉलेजच्या रियुनियनमध्ये माझा एक मित्र मला त्याचा ‘फॅट टू फिट’चा प्रवास सांगत होता- “आधी खूप प्रयत्न केले वजन कमी करण्याचे. पण, नियमितता नसल्याने विशेष यश आले नाही. मग मी प्रथम इतरांना आणि नंतर स्वतःलाच कारणे देत गेलो, वेळच मिळत नाही, झोपायला उशीर होतो, लवकर कोण उठेल, कामाच्या स्ट्रेसमध्ये आवडीचं खाल्लं की बरं वाटतं, वगैरे. काळजीने बोलण्याऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करायला लागलो. वर्षभरापूर्वी माझा सहा वर्षांचा मुलगा माझ्याशी खेळेनासा झाला. मस्त दंगा करता येत नसेल, तर बाबांशी खेळून, काय उपयोग असं वाटलं असेल त्याला. जरा निरीक्षण केल्यावर लक्षात आलं की, माझ्या चुकीच्या सवयी मुलाने उचलल्या आहेत, अगदी आपल्या फायद्याचे लॉजिक देऊन इतरांची तोंडे बंद करण्याच्या सवयीसकट. आतून खूप वाईट वाटलं गं. मग झपाटून कामाला लागलो आणि फरक तर तू बघतेच आहेस. आता कामानिमित्त बाहेर असण्याचे महिन्यातले दोन ते तीन दिवस सोडले, तर एकही दिवस लेकाबरोबर टेनिस खेळण्याचा एक तास मी मिस करत नाही.” आहे की नाही कौतुक करण्यासारखं? मी मनापासून शाबासकी दिली; आळस झटकून, उभारी घेणाऱ्या दोस्ताला आणि अहंकार दूर सारून, मुलाने कृतीतून व्यक्त केलेल्या मतांना, मान देणाऱ्या त्याच्यातल्या बाबालाही!

 

मुलांमध्ये त्यांच्या पालकांना गुण-दोषांसकट स्वीकारायचा मोकळेपणा निसर्गत:च असतो. त्यांच्यासमोर आपण ‘परफेक्ट’ आहोत, असा आव आणण्याची मुळीच गरज नसते. ‘माय डॅडी स्ट्राँगेस्ट’ किंवा ‘माझी आई ग्रेट आहे’ असा विश्वास असण्याचे मुलांचे एक वय जरूर असते. परंतु कालांतराने, जगाची ओळख होऊ लागल्यावर मुलांच्या मनात हे विचार मागे पडू लागतात. त्यावेळी आई-बाबाच नव्हे, तर प्रत्येक व्यक्ती गुण व दोषांच्या समीकरणांनी बनलेली असते हे मुलांना दाखवून देण्याची संधी पालकांनी दवडू नये. आपल्या भावना, आपल्या चुका, आपल्या कमतरता खूप प्रामाणिकपणे आणि मुख्य म्हणजे ‘म्हणून तुला सांगतो, ‘शिक यातून काहीतरी’ अशी पुष्टी न जोडता, मुलांसमोर मांडायला हरकत नाही. यातून पालक व संवेदनशील वयातील मुलांचा सुसंवाद तर वाढतोच, शिवाय आपल्या भावना, विचार, मते, गुण-दोष मोकळेपणाने व्यक्त करायला आणि स्वीकारायला मुले आपसूक शिकतात. ‘आपण एक स्वतंत्र आणि अद्वितीय व्यक्ती आहोत, आपल्याला इतरांसारखे असण्याची मुळीच गरज नाही’ हा विचार यातून उदयास येतो, हा अजून एक महत्त्वाचा फायदा.

 

गुंजन कुलकर्णी

(लेखिका नाशिक येथे बाल व कुटुंब मनोविकासतज्ज्ञ आहेत.)
7775092277
@@AUTHORINFO_V1@@