देवाधिदेव महादेव आदियोगी शिव नटराज नृत्यमुद्रा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jun-2018   
Total Views |



 

CERN जिनेव्हा-स्वीत्झर्लंड येथील नटराजाच्या प्रतिमेच्या स्थापनेला १८ जून रोजी १४ वर्षे पूर्ण होत आहेत. तसेच, नटराजाच्या प्रतिमेच्या बाजूच्या संगमरवरावर, आनंद. के .कुमारस्वामी यांच्या १९१८ सालातील नटराजाच्या निबंधातील एक वाक्य कोरले आहे. या निबंधाला २०१८ मध्ये एक शतक पूर्ण होते आहे. त्यानिमित्ताने हा लेख...

 

प्राचीन भारतीय शैव संप्रदायानुसार शिवाची नटराज नृत्यमुद्रा ही विश्वाच्या अव्याहत निर्मिती आणि लय या प्रक्रियेचे नृत्य आहे. नटराजाची ही नृत्यमुद्रा विश्वाच्या अविरत, चिरंतन, शाश्वत गतीची ऊर्जा आहे, भौतिक भूमितीद्वारे त्याने केलेली विश्वाची संरचना आहे, विश्वाच्या अमर्याद सौंदर्याचे तालबद्ध तत्त्वज्ञान आहे आणि अंतिमत: सामान्य सजीवांच्या ज्ञानबोधासाठी त्याने केलेली नृत्यमय कलाधिष्ठित आणि कालातीत अभिव्यक्ती आहे. नटराज, अगणित-अनंत-अक्षय्य कलागुण सौंदर्याचा निर्माता आणि या वैश्विक रंगमंचाचा स्वामी, या सृष्टीतील महोत्तम नर्तक आणि सर्वश्रेष्ठ अभिनेता आहे आणि तोच स्वतः प्रेक्षकही आहे. आनंद के कुमारस्वामी यांच्या ‘THE DANCE OF SHIV’ या १९१८ सालात लिहिलेल्या निबंधाच्या या पहिल्या दोन ओळी. या विश्वसंमती प्राप्त निबंधाचे २०१८ हे शताब्दी वर्ष आहे. या बरोबरच CERN - European Center for Research in Particle Physics in Geneva या स्वित्झर्लंडमधील जागतिक संशोधन केंद्रामधे नटराजाच्या दोन मीटर उंच ब्राँझमधील प्रतिमेची स्थापना झाली. त्याला १८ जून रोजी १४ वर्षे पूर्ण होत आहेत. या प्रतिमेच्या बाजूला असलेल्या संगमरवरी फलकावर आनंद कुमारस्वामींच्या वर उल्लेख केलेल्या निबंधातील एक वाक्य कोरलेले आहे.

 

Ananda K. Coomaraswamy, seeing beyond the unsurpassed rhythm, beauty, power and grace of the Nataraja, once wrote of it It is the clearest image of the activity of God which any art or religion can boast of.

 

चिह्नसंस्कृती, चिह्नसंकेत आणि चिह्नार्थ या विषयाची गोडी लागली आणि वाचन सुरू झाले. त्या काळात साधारण २००८ साली आनंद. के. कुमारस्वामी यांचे चिह्नसंस्कृती विषयातील अनेक निबंध वाचायला मिळाले आणि त्याच प्रेरणेने कुमारस्वामींचा मी एकलव्य विद्यार्थी झालो, त्यांचा गुरुस्थानी स्वीकार केला.

 

‘GOD PARTICLE' म्हणजेच देवतत्त्वाच्या अभ्यासातील श्रेष्ठ आंतरराष्ट्रीय अणू-परमाणू वैज्ञानिक डॉ. फ्रीटोर काप्रा यांच्या १९७२ सालातील एका लेखात त्यांनी ‘GOD PARTICLE' म्हणजेच देवतत्त्व आणि नटराजाच्या या नृत्य प्रतिमेतील चिह्नसंकेत आणि चिह्नार्थ यांचा जगाला नव्याने परिचय करून दिला. त्यानंतर प्राचीन भारतीय विज्ञान आणि विद्वत्तेचा परिचय आणि महत्त्व, आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक समुदायाने स्वीकारले असे म्हणायला हरकत नाही. आनंद कुमारस्वामी यांनी शंभर वर्षांपूर्वीच ‘THE DANCE OF SHIV' या निबंधात नटराजाच्या या नृत्य प्रतिमेतील चिह्नसंकेत आणि चिह्नार्थ याचा सखोल आणि सविस्तर परिचय सामान्य वाचकाला करून दिला होता. कुमारस्वामी लिहितात- “महादेवाचे किती नृत्यप्रकार त्याच्या अनुयायांना माहीत असावे याची कल्पनाही मी करू शकत नाही. मात्र, ‘शिवप्रदोषस्तोत्र’ या संहितेत महादेवाच्या हिमालयातील संध्याकालीन नृत्याचे वर्णन विस्ताराने केले गेले आहे. कुमारस्वामी यांनी निबंधात वर्णन केलेला हा पहिला नृत्यप्रकार, याचे त्यांनी फार सुंदर वर्णन केले आहे.

 

शूलपाणि अर्थात शिवा, या नृत्यात प्रियकराच्या राजस भावमुद्रेत आहेत. अनेक देवदेवतांच्या उपस्थितीत, आपली प्रेयसी, पत्नी उमादेवी हिच्यासमोर कैलासावर नृत्याला आरंभ करत आहेत. त्यांचा दैवी वाद्यमेळ तयारीत मग्न आहे. देवी सरस्वती वीणेच्या तारा छेडते आहे, इंद्रदेव वेणूचे सूर लावतो आहे, ब्रह्मदेव झांजा घेऊन सिद्ध आहेत, देवी लक्ष्मी गायनाला सुरुवात करते आहे आणि लक्ष्मिपती नारायणाने ढोलकीचा ताल धरला आहे. गंधर्व, यक्ष, सिद्ध, साधक, विद्याधर आणि अप्सरा असे तिन्ही लोकातील नागरिक सभोवती जमले आहेत. अपूर्व ईश्वरी वाद्यवृंदासह सिद्ध होऊन, देवाधिदेव शिव आपले अलौकिक स्वर्गीय नृत्य कैलासावर सादर करीत आहेत. ‘कथा सरीत सागर’ या संहितेच्या प्रस्तावनेमध्येसुद्धा या वैश्विक नृत्याचे साग्रसंगीत वर्णन उपलब्ध आहे. शिवाच्या या नृत्यमुद्रेत, महादेव द्विभुज म्हणजे दोनच हात असलेल्या शरीरमुद्रेत आहेत. सामन्यात: नटराजाच्या विग्रह प्रतिमेत दिसतो तसा कोणताही मायावी असुर, या नृत्याचे वेळी महादेवाला शरण आलेला नाही आणि त्यांच्या उजव्या पायाखाली अंकितही झालेला नाही. शिवप्रदोष स्तोत्र आणि ‘कथा सरीत सागर’ या दोन संहितांशिवाय अन्य कुठल्याही शैव साहित्यात, या नृत्याचा उल्लेख अथवा विश्लेषण केले गेले नाही.

 

भैरव किंवा वीरभद्र अशा तामसी भावमुद्रेतील महादेवाचे दुसरे नृत्य, तांडवनृत्य म्हणून विश्वमान्य झाले. देवी कालीमातेसह स्मशानभूमीत सादर होणाऱ्या या नृत्यात भैरव विग्रहातील शिव, दशभुज शरीरमुद्रेत आहेत. भैरवाबरोबर भूत आणि पिशाच्चगण नृत्यात तल्लीन झाले आहेत. औरंगाबाद जवळील वेरूळ गुंफा, मुंबई जवळील घारापुरी गुंफा, कर्नाटकातील बदामी येथील गुंफा आणि भुवनेश्वर जवळील गुप्तेश्वर गुंफामध्ये, भारताच्या जवळपास सर्व प्रदेशांमध्ये भैरवाच्या या तांडवनृत्य शैलीतील प्राचीन भित्तिचित्रे आणि शिल्प उपलब्ध आहेत. आर्यांच्या भारतातील आक्रमणाविषयीच्या इतिहासाचे आज नव्याने विचारमंथन सुरू झाले आहे, मात्र कुमारस्वामींच्या शंभर वर्षांपूर्वीच्या निबंधातील उल्लेखानुसार, तांडवनृत्य शैली ही महादेवाला देवत्व प्राप्त होण्याच्या आधीच्या, आदिमपर्व काळातील असावी. या नंतरच्या काळात शैव आणि शाक्त या दोन्ही पंथांच्या लिखित साहित्यामध्ये या तांडवनृत्य शैलीचा महत्त्वाचा संदर्भ उपलब्ध झाला. देवी महाकाली आणि भैरवाच्या स्मशानभूमीत सादर होणाऱ्या नृत्यामागाचे विलक्षण मार्मिक आणि प्रगाढ गांभीर्याने नोंदलेले चिह्नसंकेत काय आहेत ते जाणून घेतले की आपल्या पूर्वजांची विद्वत्ता आणि त्यांचा सर्वंकष अभ्यास आपल्याला चकित करतो.

 

वरकरणी वाचताना असे वाटते की, शिव म्हणजे संहारक शक्ती आहे. त्याला आणि देवी महाकालीला सजीवांचे जीवनव्यवहार संपल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंतिम अग्निसंस्कार करण्याची जागा, स्मशानभूमी ही नृत्यासाठी प्रिय आहे. भयचकित होऊन, आपण याचा पुढचा संदर्भ घेणे टाळतो. प्रत्यक्षात या स्मशानभूमीचा संकेत फार वेगळे दृष्टांत देतो. मृत सजीवांच्या पार्थिवांना इथे अग्निसंस्कार करून, नष्ट केले जाते हे वास्तव आहेच, मात्र त्याही पलीकडे याचा सूक्ष्मार्थ-गूढार्थ असा आहे की, महादेव आणि देवी महाकाली, तुम्हाला निष्क्रिय बनवणाऱ्या निष्फळ संकल्पना आणि मनोबल उद्ध्वस्त करणारी तुमची नकारात्मक मनस्थिती, इथे अग्नीच्या स्वाधीन करतात, जणू पुनर्जन्म देऊन, तुम्हाला पुन्हा उत्साही आणि सक्रीय बनवतात. निरोगी मन-शरीर आणि सुद़ृढ, निकोप जीवनशैली प्राप्त होण्यासाठी अडसर ठरणारा तुमचा अहंकार, अहंभाव आणि तुमची गर्वभावना, इथे अग्नीच्या स्वाधीन करून, नष्ट केली जाते. सर्वशक्तिमान विश्वनियंत्याचे हेच प्राथमिक निर्मिती आणि लय तत्त्व, तांडवनृत्यामध्ये अभिनित झाले आहे.

 

कैलासावरील प्रियकराच्या भूमिकेतील महादेव आणि भैरवाचे तामसी, उग्रभावातील तांडवनृत्य या दोन्ही विग्रहात शिव, पूर्णपुरुष अवस्थेत आहेत. नटराजाच्या विग्रहातील शिवाची नादांतनृत्य शैली ही त्याची प्रगत नृत्यशैली कालांतराने चिदंबरम या दक्षिण भारतातील शिवमंदिराशी जोडली गेली. त्या काळात, चिदंबरम या देवालयाला पृथ्वीचे हृदय मानले गेले होते आणि हे तांडवनृत्य प्रत्येकाच्या हृदयात म्हणजेच भावविश्वात घडत असते अशी ही प्राचीन भारतीय संकल्पना.

 

नटराज या नृत्यशैलीमधील शिव, अर्धनारीनटेश्वर अशा अलौकिक चतुर्भुज शरीरमुद्रेत प्रकट झाले. नटराजाच्या या नृत्यमुद्रेला वैश्विक मान्यता प्राप्त झाली आणि याच नृत्यमुद्रेतील नटराज स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा शहरातील ‘CERN' संशोधन केंद्रात स्थापित आहे. कुमारस्वामींच्या निबंधातील उल्लेखात आणि आज वर्तमानकाळात सुद्धा नटराजाच्या अद्वैताचा अनुभव निश्चितच सहज उपलब्ध आहे. बंगालमधील शाक्तपंथीय परंपरेनुसार नटराजाच्या डाव्या शरीरातील मातृभाव अवस्थेतील देवी महाकालीची उपासना आजही मोठ्या उत्साहात केली जाते. भारतातील अन्य शैवपंथीय प्रामुख्याने महादेवाची उपासना करतात.

 

पुढील लेखात शिवाच्या नटराज विग्रहातील चतुर्भुज मूर्तीचे चिह्नसंकेत आणि चिह्नार्थ, थील्लाई चिदंबरम देवालय आणि त्याच्या ‘कोईल पुराणम’ याचे विश्लेषण आणि सविस्तर परिचय, रसिक वाचकांना करून दिला जाईल!

 

7400173637

@@AUTHORINFO_V1@@