ईशान्य भारताला पुराचा तडाखा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jun-2018
Total Views |


गुवाहाटी : ईशान्य भारतामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे ईशान्य भारताला यावर्षीचा पुराचा पहिला तडाखा बसला आहे. सातत्याने सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे आसाम, मणिपुर, मिजोरम आणि त्रिपुरा या राज्यांना पुराचा मोठा फटका बसला असून यामुळे जवळपास अडीच लाख नागरिकांवर विस्थापित होण्याची वेळ आली आहे. पुरामुळे अनेक ठिकाणच्या पायाभूत सुविधा देखिल नष्ट झाल्यामुळे या राज्यांमधील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

गेल्या आठवड्याभरापासून ईशान्य भारतामध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे आसाम, मणिपुर, मिजोरम आणि त्रिपुरामधील अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. तसेच डोंगरांमधून वाहत येत असलेले पाणी थेट गावांमध्ये आणि शहरांमध्ये घुसल्यामुळे अनेक ठिकाणी कमरेएवढे पाणी जमा झाले आहे. अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी गेल्यामुळे अनेकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. एकट्या आसाममध्ये सात जिल्ह्यांना या पुराचा फटका बसला असून जवळपास १ लाख ७० हजार लोकांना यामुळे विस्थापित व्हावे लागले आहे. यानंतर त्रिपुरामध्ये सर्वाधिक पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे. यानंतर मणिपूर आणि मिझोराममध्ये देखील हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. या राज्यांमध्ये देखील दरड कोसळून रस्ते आणि वाहतूक बंद पडली आहे.

दरम्यान सर्व राज्य सरकारांनी नागरिकांच्या मदतीसाठी सरकारी शिबिरे सुरु केली आहे. अनेक ठिकाणी भारतीय जवान देखील नागरिकांच्या मदतीसाठी म्हणून आले आहेत. आसाम रायफल्सच्या जवानांकडून आसाममध्ये मोठ्या प्रमाणात 'रेस्क्यू ऑपरेशन' सुरु करण्यात आली आहे. त्रिपुराचे मुख्यमंत्री बिपल्ब देब यांनी देखील केंद्र सरकारला मदतीसाठी आवाहन केले होते. त्रिपुरामध्ये देखील सैनिकांना पाठवण्यात आले असून याठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात मदतकार्य सुरु करण्यात आली आहेत.



@@AUTHORINFO_V1@@