मतदारयाद्यांचे काम २० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jun-2018
Total Views |



नाशिक : निवडणूक आयोगाने मतदार यादी निर्दोष करण्यासाठी मतदार याद्यांच्या पडताळणीसाठी केंद्रस्तरीय अधिकार्‍यांना मतदारांच्या घरोघरी भेटी देऊन माहिती संकलित करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ४७ टक्केच काम झाल्याने पुन्हा मतदान केंद्रस्तरीय अधिकार्‍यांची बैठक घेण्यात येऊन २० जूनपर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश दिले.

 

पुढील वर्षी लोकसभेसह विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे निवडणूक यंत्रणेची जबाबदारी वाढली आहे. चुकारहित मतदार याद्या तयार करण्याचे आयोगाचे आदेश असल्याने त्यानुसार जिल्ह्यातील मतदार याद्यांत कुठल्याही चुका राहता कामा नये, असे आयोगाचे आदेश आहेत.

 

याकरिता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मतदार याद्या शुद्धीकरणाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार जिल्ह्यात जवळपास दीड लाख मतदारांची दुबार नावे आहेत. तसेच अनेकांचे रंगीत फोटो यादीत अद्ययावत केलेले नाहीत. काहींचे पत्ते चुकीचे आणि अपूर्ण आहेत. मतदारांकडे मतदान ओळखपत्रही नाही. स्थलांतरित आणि मयत मतदारांची नावेही यादीत कायम आहेत.

 

यामुळे बोगस मतदानाचीही शक्यता अधिक आहे. तसे होऊ नये यासाठी आयोगाने मतदार याद्या शुद्धीकरणाचा कार्यक्रम जाहीर केला आहे, परंतु नाशिक जिल्ह्यात या कामाबाबत बीएलओंमध्ये उदासीनता दिसून येत आहे. त्यामुळे आज पुन्हा सर्व बीएलओंची बैठक घेण्यात आली. आयोगाने ठरवून दिलेली मोहिमेची मुदत संपत आली तरी काम का पूर्ण होत नाही?, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात येऊन २० जूनपर्यंत हे काम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचे आदेश या बैठकीत देण्यात आले.

@@AUTHORINFO_V1@@