नाशिक शिक्षक मतदारसंघात चुरशीची लढत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jun-2018
Total Views |



विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीनंतर आता शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीत भाजपतर्फे अनिकेत विजय पाटील, अपक्ष प्रताप सोनवणे, शिवसेनेतर्फे किशोर दराडे, धुळ्याचे संदीप बेडसे टीडीएफतर्फे रिंगणात आहेत. नाशिक विभाग शिक्षक आमदार मतदार संघाच्या निवडणुकीत नाशिक जिल्ह्यामधून पाच, अहमदनगर जिल्ह्यातून सात, धुळे जिल्ह्यातील तीन तर जळगाव जिल्ह्यातील एक उमेदवार असे एकूण १६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
 

नाशिक शिक्षक मतदारसंघात उमेदवारांची भाऊगर्दी झालेली असली तरी खरी लढत भाजपचे अनिकेत पाटील, शिक्षक लोकशाही आघाडी अर्थात टीडीएफचे संदीप बेडसे आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढवित असलेले माजी खा. प्रताप सोनवणे या तिघांमध्ये आहे. प्रताप सोनवणे यांनी माघार न घेतल्याने या निवडणुकीची चुरस अधिकच वाढली आहे. नाशिक आणि नगर जिल्ह्यामध्ये मतदानासाठी शिक्षकांनी सर्वाधिक नोंद केलेली आहे. त्यामुळे उमेदवारांनी या दोन्ही जिल्ह्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. जळगाव जिल्ह्यातून एकच उमेदवार असल्याने उमेदवारांना तेथे अधिक लक्ष द्यावे लागणार आहे.

 

नाशिक जिल्ह्यात यापूर्वी शिक्षक लोकशाही आघाडीतर्फे नानासाहेब बोरस्ते यांनी शिक्षक आमदार म्हणून निवडणूक सततच्या जनसंपर्कामुळे जिंकली होती. त्यानंतर माजी मंत्री प्रशांत हिरे यांचे चिरंजीव अपूर्व हिरे यांनी या मतदार संघात प्रतिनिधित्व केले होते. शिक्षक आमदारकीच्या निवडणुकीत यापूर्वीचा इतिहास बघता प्रताप सोनवणे यांचा अपवाद वगळता शिक्षक मतदार हे कुठल्याही राजकीय पक्षाला मदत न करता शिक्षकांच्या प्रश्नांवर आवाज उठविणारे आणि शिक्षकांशी तसेच त्यांच्या शाळा आणि संस्था यांची कामे करणारे शिक्षक नेतृत्वाला निवडून देतात, हा इतिहास आहे. शिक्षक लोकशाही आघाडीचे उमेदवार संदीप त्र्यंबकराव बेडसे यांचा दांडगा जनसंपर्क आणि यापूर्वी मंत्रालयात मंत्र्यांचे विशेषकार्य अधिकारी म्हणून काम केले असल्यामुळे या पाचही जिल्ह्यातील सर्व शिक्षणसंस्था, संस्थाचालक आणि माध्यमिक शिक्षक यांच्याशी सततचा संपर्क आल्यामुळेच संदीप बेडसे यांना शिक्षक लोकशाही आघाडीने उमेदवारी दिली. तर भाजपने माजी मंत्री विजय नवल पाटील यांचे पुत्र अनिकेत पाटील यांना उमेदवारी दिली. तर अपक्ष म्हणून माजी खा. प्रताप सोनवणे हे रिंगणात उतरले. शिवसेनेने उमेदवार म्हणून किशोर दराडे यांना रिंगणात उतरविले आहे, परंतु नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत व पालघर लोकसभा निवडणुकीत भाजप-सेनेत निर्माण झालेला तणाव बघता इतर उमेदवारांपेक्षा दराडे यांची या निवडणुकीत दमछाक होण्याची चिन्हे आहेत.

 

माजी खासदार तसेच मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षणसंस्थेचे अध्यक्षपद भूषविलेले प्रताप सोनवणे यांचे पाचही जिल्ह्यांत असलेले यापूर्वीचे नातेसंबंध, संपर्क, खासदारकी आणि आमदार म्हणून केलेल्या कामांच्या जोरावर प्रताप सोनवणे यांनी भारतीय जनता पक्षाकडे उमेदवारी मागितली खरी, परंतु ती न मिळाल्याने ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत. अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी आपली उमेदवारी असल्याची गर्जना करीत ते कामाला लागले आहेत. भारतीय जनता पक्षातर्फे निवडणूक रिंगणात असलेले अनिकेत पाटील यांच्यामागे त्यांचे वडील माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांचा वारसा तसेच भारतीय जनता पक्षाचे पाचही जिल्ह्यांत असलेले नेटवर्क ही जमेची बाजू आहे. भाजप आणि जिल्ह्यात असलेली मजबूत पक्षसंघटना सध्या अनिकेत पाटील यांच्या प्रचाराच्या कामाला लागली आहे. नाशिक विभाग शिक्षक मतदार संघात सोळा उमेदवारांची भाऊगर्दी, भाजप सेनेने वेगवेगळी मांडलेली चूल, त्यातच प्रताप सोनवणे यांच्यासारख्या मातब्बर उमेदवाराने केलेली बंडखोरी यामुळे शिक्षक मतदार संघाची निवडणूक उत्तरोत्तर रंगत चालली आहे. कोण आघाडी घेणार? कुणाचा प्रचार कोणत्या स्तरावर होत आहे याबाबतची चर्चा सर्वत्र होत आहे.

@@AUTHORINFO_V1@@