वसई-विरार मनपाच्या ताफ्यात गुजरात पासिंग कचरा गाड्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jun-2018
Total Views |



 

वसई : वसई-विरार महानगरपालिकेच्या ताफ्यात गुजरात पासिंगच्या कचरा गाड्या असल्याची बाब नुकतीच निदर्शनास आली आहे. पालिका क्षेत्रातील काही रहिवाशांना सदर गाड्या पालिकेच्या ताफ्यात दिसल्यानंतर त्यांनी ही बाब सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आणली होती. मात्र, वसई-विरार पालिका क्षेत्र महाराष्ट्रात असताना महाराष्ट्राचा रस्ते कर बुडवून, गुजरात पासिंगच्या नव्या गाड्या या ठिकाणी का आणण्यात आल्या, असा सवाल या ठिकाणचे नागरिक विचारत आहेत.
 

वसई-विरार महानगरपालिकेने स्वच्छता विभागांतर्गत ‘जी’ आणि ‘एच’ प्रभागातील कचरा उचलण्यासाठी नुकतीच निविदा प्रक्रिया राबविली होती. यानंतर निविदा मिळालेल्या ठेकेदाराने गुजरातमधील पासिंग असलेल्या कचर्‍याच्या ट्रिपर पालिकेच्या ताफ्यात दाखल करून, त्यांच्या वापरास सुरुवात केली. मात्र, वसई-विरार पालिका क्षेत्र हे महाराष्ट्रात असताना राज्य सरकारचा रस्ते कर बुडवून, गुजरातमध्ये पासिंग केलेल्या गाड्या कार्यरत केल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कचरा उचलण्यासाठी ट्रिपर गाड्यांसाठी मे. रिलायबल एजन्सीला निविदा मंजूर करण्यात आली होती. यानंतर एच प्रभागातील नवघर-माणिकपूर आणि जी प्रभागातील वालिव या ठिकाणचा कचरा उचलण्यासाठी १२ ट्रिपर गाड्या पुरवण्याचे कार्यादेश देण्यात आले होते. मात्र, यानंतर या ठिकाणी गुजरात पासिंगच्या काही गाड्या कंत्राटदाराने पुरविल्या असल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आले होते. याबाबत ‘दै. मुंबई तरुण भारत’ने पालिकेच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता, या गाड्या हटविण्याचे निर्देश कंत्राटदाराला दिले असल्याची माहिती देण्यात आली.

 

‘कंत्राटदाराने पुरवलेल्या ज्या गाड्या गुजरात पासिंगच्या होत्या त्या बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कंत्राटदाराला तोंडी समजदेखील देण्यात आली असून, यापुढे या गाड्यांमार्फत कचरा उचलला जाणार नाही,' असे वसंत मुकणे, वरिष्ठ आरोग्य निरीक्षण, वसई-विरार मनपा यांनी सांगितले.

 

‘वसई-विरारमध्ये आधी दुकानांचे फलक, रेल्वेच्या पाट्या, महापौरांचे व स्थानिक आमदारांचे भाषण गुजराथीत व्हायचे आणि आता तर चक्क वसई विरार महापालिकेच्या स्वच्छता ताफ्यात अनेक गाड्या गुजरात पासिंगच्या आल्या आहेत. म्हणजे स्थानिक कर भरणार आणि या गाड्यांचा रोड टॅक्स गुजरातला जाणार,”

हृषिकेश वैद्य,

अध्यक्ष

‘आमची वसई’ सामाजिक संस्था

@@AUTHORINFO_V1@@