‘दिव्य’ यश संपादिलेली भारतीय स्त्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jun-2018   
Total Views |

 

 
कॉर्पोरेट जगतात मानाचा तुरा रोवणारी अशीच एक भारतीय महिला म्हणजे दिव्या सूर्यवेंद्र. या ३९ वर्षीय भारतीय महिलेची ‘जनरल मोटर्स’ या बलाढ्य अमेरिकन कंपनीच्या मुख्य वित्त अधिकारीपदी (Chief Finance Officer-CFO) नियुक्ती झाली आहे.
 

गतिकीकरण चांगलं की वाईट हा एक न संपणारा वाद आहे. काही लोक आर्थिक विकासाची संधी म्हणून त्याच्याकडे पाहतात, तर काही लोक ‘नववसाहतवाद’ म्हणून त्याची हेटाळणी करतात. ते काहीही असलं तरी जागतिकीकरणाचा एक फायदा मात्र निश्चितपणे मान्य करावाच लागेल. तो म्हणजे भारतीय लोकांना आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये आपली बुद्धिमत्ता आणि क्षमता आजमावण्याची, कर्तृत्व सिद्ध करण्याची मिळालेली संधी. केवळ पुरुषच नव्हे, तर महिलाही आता अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये वरच्या पदापर्यंत पोहोचून, स्वत:चंच नव्हे, तर देशाचंही नाव मोठं करताना दिसतात. कॉर्पोरेट जगतात मानाचा तुरा रोवणारी अशीच एक भारतीय महिला म्हणजे दिव्या सूर्यवेंद्र. या ३९ वर्षीय भारतीय महिलेची ‘जनरल मोटर्स’ या बलाढ्य अमेरिकन कंपनीच्या मुख्य वित्त अधिकारीपदी (Chief Finance Officer-CFO) नियुक्ती झाली आहे.

 

दिव्या सूर्यवेंद्र या मूळच्या चेन्नईच्या. त्या लहान असतानाच त्यांच्या वडिलांचं निधन झालं. त्यामुळे दिव्या आणि त्यांच्या दोन बहिणींना वाढवण्याची जबाबदारी एकट्या आईवर पडली. तीन मुलांसहित कुटुंब चालवणं ही सोपी गोष्ट नव्हती. त्यांच्या आईने प्रचंड कष्ट केले, पण मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत कुठलीच तडजोड केली नाही. दिव्या यांनी मद्रास विद्यापीठातून वाणिज्य शाखेत पदव्युत्तर शिक्षण घेतलं. त्यानंतर वयाच्या २२ व्या वर्षी त्यांनी एमबीए करण्यासाठी अमेरिकेच्या सुप्रसिद्ध हार्वर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला. अमेरिकेसारख्या देशात राहून, शिक्षण घेण्याएवढे पैसे त्यांच्याकडे नव्हते. त्यांनी शैक्षणिक कर्ज घेऊन, आपला अभ्यासक्रम पूर्ण केला. कर्ज फेडायची जबाबदारी असल्याने ताबडतोब नोकरी शोधणं भाग होतं. त्या म्हणतात की, “स्वत:च्या पायावर उभं राहण्याची जबाबदारी असल्यामुळे माझ्याकडून कष्ट केले गेले आणि काहीतरी मोठं करायची इच्छा निर्माण झाली. ’जनरल मोटर्स’ सारख्या बलाढ्य कंपनीत नोकरी मिळेल, असं मला लहानपणी स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं. फक्त काहीतरी आव्हानात्मक करण्याची जिद्द होती इतकंच.” एमबीए पूर्ण केल्यावर त्यांना ‘प्राईस वॉटर हाऊस कूपर्स’ या कर आणि गुंतवणूक सल्लागार कंपनीत पहिली नोकरी मिळाली. त्यानंतर जगप्रसिद्ध ‘युबीएस’ या बँकेत काही दिवस नोकरी केल्यानंतर वयाच्या 25 व्या वर्षी त्या जनरल मोटर्स कंपनीत वरिष्ठ वित्त विश्लेषक म्हणून रूजू झाल्या. दिव्या यांच्या बुद्धिमत्तेमुळे आणि काम करण्याच्या कुशलतेमुळे या कंपनीत त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत गेली. जगप्रसिद्ध ‘फॉर्च्युन’ या मासिकातर्फे दरवर्षी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ४० वर्षांखालील सर्वोत्कृष्ट ४० महिलांची (४० under ४०) यादी प्रसिद्ध केली जाते. २०१५ च्या या यादीमध्ये आर्थिक विषयांमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी दिव्या यांचं नाव घेतलं गेलं होतं. २०१७ च्या जुलै महिन्यात त्यांची जनरल मोटर्स कंपनीच्या कॉर्पोरेट फायनान्स डिपार्टमेंटमध्ये उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली.

 

‘जनरल मोटर्स’ ची युरोपीय शाखा असलेल्या ‘ओपेल’ या कंपनीची विक्री असो, वा ‘क्रूझ’ या वाहनउद्योगक्षेत्रातल्या स्टार्ट अप कंपनीची खरेदी असो, कंपनीचे असे व्यवहार दिव्या यांनी अत्यंत कुशलतेने हाताळून, कंपनीला मोठं यश मिळवून दिलं. जपानच्या ‘सॉफ्ट बँक ग्रुप’कडून कंपनीला त्यांनी सव्वादोन अब्ज डॉलर्सचे भांडवल मिळवून दिलं. आपल्या तेरा वर्षांच्या कारकिर्दीत दिव्या यांनी कंपनीची पत वाढवण्यात मोठं योगदान दिलं आहे. कंपनीच्या विविध पेन्शन योजनांचे सुमारे ८५ अब्ज डॉलर्सचे व्यवहार त्यांनी अत्यंत कुशलतेने आणि प्रामाणिकपणे हाताळले. जनरल मोटर्स ही जुनी कंपनी असली तरी सतत नवीन प्रकल्प अंगावर घेणारी, नवीन आव्हानं स्वीकारणारी आणि आपल्या उत्पादनाच्या बाबतीत सतत नाविन्याचा ध्यास ठेवणारी आसल्याने या कंपनीत काम करणं हे आनंददायी असल्याचं त्या सांगतात.

 

अमेरिकेत त्यांचं घर न्यूयॉर्क शहरात आहे, तर कंपनीचं ऑफीस तिथून सुमारे एक हजार किलोमीटर दूर असलेल्या डेट्रॉइट शहरात आहे. डेट्रॉईटमध्ये त्यांचे पती दहा वर्षांच्या मुलीसह राहतात. दिव्या यांना कामानिमित्त डेट्रॉइटमध्येच राहवं लागतं. शनिवार-रविवार त्या न्यूयॉर्कला त्यांच्या घरी जातात. कंपनीचं काम आणि कुटुंब हे दोन्ही सांभाळणं खूप अवघड जातं, पण हे दोन्ही सांभाळत सांभाळत, आज त्या या पदापर्यंत पोहोचल्या आहेत. ऑफिस हे राहण्याच्या ठिकाणापासून खूप दूर असल्याने कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करता येतं, असं त्या सांगतात. जाण्यायेण्याच्या वेळातही त्या अखंड काम करतात. बॉक्सिंग हा त्यांचा आवडता खेळ आहे.

 

खासगी क्षेत्रात फक्त एकच गोष्ट मापली जाते, ती म्हणजे गुणवत्ता. दिव्या सूर्यवेंद्र यांचं हे यश भारतीय महिलांच्या गुणवत्तेचा, चिकाटीचा आणि व्यवस्थापनकौशल्याचा साक्षात पुरावा आहे.

@@AUTHORINFO_V1@@