रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jun-2018   
Total Views |

साधारणपणे ऐंशीच्या दशकामध्ये ’राजा शिवछत्रपती’ हा मराठी चित्रपट पडद्यावर आला होता. कितीही मोठा पडदा असला तरी छत्रपती शिवरायांचे लोकोत्तर जीवन दाखविण्यासाठी तो तोकडाच पडतो हे तर अनेक वेळा सिद्ध झालं आहे. याही चित्रपटात तशा उणिवा बऱ्याच होत्या, तरीदेखील एक लक्षात राहण्यासारखी गोष्ट यात होती, ती म्हणजे वसंत देसाई यांचं सुरेल संगीत. त्यातही एका गीताची प्रसंगानुरुप केलेली मांडणी तर अजूनही मनात ठसलेली आहे. हे गीत म्हणजे ’रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन’ हा तुकोबांचा अभंग. शिवरायांना अत्यंत नाईलाजाने पुरंदरचा तह करावा लागतो, त्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांच्या एका दिंडीमध्ये पं. भीमसेन जोशी यांच्या भारदस्त स्वरांत समोर आलेला हा अभंग शिवरायांचे भावविश्व ताकदीने उलगडतो. अत्यंत मोजक्या शब्दांत खूप मोठा आशय सांगणारा हा अभंग आहे. सदैव लोकांची चिंता वाहणाऱ्या नि:स्वार्थी सत्पुरुषांना या अंतर्बाह्य युद्धाला कायमच सामोरे जावे लागते. अर्थात, ’पुण्य पर उपकार, पाप ते परपीडा’ हे धर्माचे नेमके सार ज्यांना ज्यांना उमगते अशा सर्वच व्यक्तींना वैयक्तिक पातळीवर ही दोन्ही युद्धे लढावीच लागतात.
 
वैयक्तिक पातळीवर हे युद्धांचे प्रसंग जसे निभावून न्यावे लागतात तसेच काही संस्थांच्या प्रकृतीमध्येच ही रात्रंदिनीची युद्धे अविभाज्य घटक म्हणून अंतर्भूत असतात. रक्तपेढी ही अशाच काही ’युद्धमान’ संस्थापैकी एक. अत्यावश्यक सेवा या सदरात येत असल्याने रक्तपेढीची सेवा ही चोवीस तास चालु असते ही बाब तर सर्वांनाच माहिती आहे. पण रक्तपेढी चोवीस तास चालु असते म्हणजे नक्की काय चालु असते, याचे नेमके उत्तर रक्तपेढीची फ़ारशी माहिती नसणाऱ्यांना कदाचित सांगता येणार नाही. रक्तपेढीचे अनेक विभाग आहेत. यात रक्तसंकलन, रक्ततपासणी (एलायजा व नॅट प्रयोगशाळा), रक्तविघटन, रक्तगट आणि जुळवणी, रक्तविकिरण या तांत्रिक विभागांसोबतच व्यवस्थापन, अर्थविभाग, जनसंपर्क विभाग, शिबिर व्यवस्थापन, स्वागतकक्ष असे अन्य विभागही कार्यरत असतात. पण रक्तपेढीच्या चोवीस तास चालु असण्याशी संबंध असतो तो दोन विभागांचा. हे विभाग म्हणजे स्वागतकक्ष आणि रक्तगट व जुळवणीची मुख्य प्रयोगशाळा, ज्याला सिरॉलॉजी लॅब असे संबोधले जाते. जनकल्याण रक्तपेढीच्या बाबतीत सांगायचे तर या याव्यतिरिक्तही आणखी एक विभाग चोवीस तास कार्यरत असतो, तो म्हणजे ’रक्तदूत सेवेचा’ (blood courier) अर्थात या सर्वांत खऱ्या अर्थाने जिला युद्धभूमी म्हणता येईल ती म्हणजे रक्तपेढीची मुख्य प्रयोगशाळाच.
 
रक्ताची मागणी कोणत्या वेळी येईल ते सांगणे कठीणच. त्यामुळे इथे काम करणारा तंत्रज्ज्ञ वर्ग कुठल्याही वेळेला कितीही बॅग्जची मागणी येऊ शकते हे गृहीत धरुनच काम करत असतो. रक्तघटकांची मागणी दोन प्रकारची असते. एक म्हणजे रुग्णालयांतून रुग्णाच्या नावे येणारी मागणी. यात रुग्णाची व्यक्तिगत माहिती, निदान आणि रक्तघटक मागणीचा तपशील वगैरे नमूद केलेला एक विशिष्ट नमुन्यातील विनंती अर्ज आणि त्या रुग्णाचा रक्तनमुना या दोन गोष्टी असणे गरजेचे असते. या विनंती अर्जातील मागणीप्रमाणे रक्तघटक वितरित करताना दिलेल्या रक्तनमुन्याच्या आधारे रक्तगट तपासून तो निश्चित करणे आणि रक्तजुळवणी (cross matching) करणे ही प्रक्रिया महत्वाची असते. रुग्णाचा रक्तनमुना आणि रक्तदात्याचा रक्तनमुना जुळवून बघण्याची एक शास्त्रीय प्रक्रिया आहे. या दोन्ही रक्तनमुन्यांतील पेशी आणि द्रव हे ’सेंट्रीफ़्यूज’ या यंत्राच्या सहाय्याने वेगळे करुन रुग्णाच्या रक्तामध्ये रक्तदात्याच्या रक्तपेशी सोडल्या तर काय होईल, याची एक छोटीशी रंगीत तालीमच इथे करुन बघितली जाते. हीच रक्तजुळवणी. रक्तदाता व रुग्ण यांचे रक्तगट जुळले तरीही रक्तजुळवणी आवश्यकच असते. कारण आपल्याकडे रक्तगट पाहिले जातात ते ABO आणि Rh या दोन पद्धतींनी. पण वैद्यकीय शास्त्राने रक्तगट पडताळणीच्या सुमारे ३४ पद्धती सांगितल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक रुग्णासाठी स्वतंत्र रक्तजुळवणी आवश्यकच ठरते. शिवाय समान गट असले तरी एक रक्त निरोगी रक्तदात्याचे असते तर दुसरे रुग्णाचे आणि रुग्णाच्या रक्तात आजारपणामुळे काही वेगळी प्रतिकारके निर्माण झाल्याचीही शक्यता असते. म्हणूनच रक्तजुळवणीअंतर्गत ’रुग्णाला काही त्रास तर होणार नाही ना’ याची खात्री रक्तपेढीव्दारा केली जाते आणि अर्थातच रक्ताची मागणी कुठल्याही वेळेला येऊ शकत असल्याने हे काम करण्यासाठी रक्तपेढीची ही मुख्य प्रयोगशाळा चोवीस तास सज्ज असते.
 
दुसरी मागणी असते ती एक तर रक्तसाठवणूक केंद्रांकडून आलेली किंवा अन्य रक्तपेढ्यांची. या मागणीमध्ये बहुधा मोठ्या प्रमाणावर (bulk transfer) रक्तपिशव्या वितरित करायच्या असतात. रक्तसाठवणूक केंद्रांना किंवा अन्य रक्तपेढ्यांना रक्तघटक देताना मात्र रक्तजुळवणी करण्याची आवश्यकता नसते कारण त्या त्या ठिकाणी प्रत्यक्ष रुग्णांकडुन मागणी आल्यावरच रक्तजुळवणी होते.
 
या दोन्ही प्रकारच्या मागण्या सातत्याने रक्तपेढीत येऊन दाखल होत असतात. जनकल्याण रक्तपेढीमधून तर दिवसाला सरासरी शंभरेक रक्तघटक वितरित होत असतात. हे वितरण होत असताना रक्तसाठ्यातून तारखेची वैधता (expiry date) पाहून योग्य ती पिशवी काढली जाणे, योग्य रक्तनमुनाच तपासण्यासाठी घेतला जाणे, रक्तगट तपासणी व रक्तजुळवणी करणे, रुग्णाचे व रुग्णालयाचे नाव पुन्हा पुन्हा तपासून घेणे, प्रक्रियांमधील सर्व पायऱ्यांची कागदोपत्री अचूक नोंद करणे आणि मुख्य म्हणजे हे सर्व काम शक्य तितक्या वेगाने तरीही अत्यंत शांत चित्ताने करणे हे खरोखरीच आव्हानात्मक आहे. शिवाय हे सर्व करताना फ़ोन कॉल्स सतत चालु असतात. रुग्णालयांतून बोलणाऱ्या व्यक्तीला संबंधित मागणीबाबत त्वरित स्पष्टीकरण हवे असते. काही वेळा अनावश्यक चौकश्याही होतात, पण तरीही उत्तरे तर द्यावीच लागतात. रुग्णांच्या आलेल्या मागण्यांना न्याय देत असतानाच रक्तसाठवणूक केंद्रे व अन्य रक्तपेढ्यांच्या मोठ्या प्रमाणावर आलेल्या मागण्याही सांभाळाव्या लागतात. मोठ्या संख्येने रक्तपिशव्या वितरित करताना लिखापढी करण्यात काही त्रुटी (clerical errors) राहणार नाहीत, हेही बघावेच लागते. इकडे स्वागतकक्षही शांत नसतो. वाट पहात बसलेल्या रुग्णांच्या नातलगांना एकेक क्षण तासासारखा वाटत असतो. त्यामुळे तिथेही स्वाभाविकपणे सतत चौकश्या सुरू असतात. अशा सर्व कोलाहलामध्ये एकही चूक न होऊ देता रक्तपिशवी वितरित करणे म्हणजे ’युद्धात चारी बाजुंनी आलेले हल्ले परतवित आपल्या शस्त्रकौशल्याने विजयश्री प्राप्त करण्यासारखेच’ आहे. इथे छोट्याशा चुकीलाही क्षमा नाही. रक्तपेढी किती मोठी आहे, तिचे सामाजिक कार्य किती महान आहे ही कीर्ती एखाद्या छोट्याशा चुकीमुळे सहज विस्मरणात जाऊ शकते. अर्थात प्रश्न केवळ कीर्तीचा नाही तर अचूकता महत्वाची आहे ती रुग्णसुरक्षेसाठी. त्यामुळे रक्तपेढीच्या मुख्य प्रयोगशाळेमध्ये काम करणारे सर्व तंत्रज्ज्ञ या दृष्टीने तयारीचे असावे लागतात.
 
असे तयारीचे तंत्रज्ज्ञ, त्यांचे पर्यवेक्षक आणि डॉक्टर्स हे तर जनकल्याण रक्तपेढीचे मोठेच बलस्थान आहे. तांत्रिक विभागात नव्याने रुजू होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस तांत्रिक विभागाचे ’कर्णधार’ आणि रक्तपेढीचे कार्यकारी संचालक डॉ. अतुल कुलकर्णी एक गोष्ट त्यांच्या मिश्कील शैलीमध्ये नेहमी सांगतात. ती म्हणजे, ’भरपूर काम करण्याची इच्छा आणि सवय असेल तर ’जनकल्याण’ मध्ये तुम्हाला कामाचे नक्कीच समाधान मिळेल, पण जर आरामदायी कामाची अपेक्षा असेल तर मात्र तुम्ही इथे लवकर वैतागण्याची शक्यता आहे.’ हे शतप्रतिशत सत्य आहे. कारण दर वर्षी तीनशे ते साडेतीनशे रक्तदान शिबिरांतून वीस ते बावीस हजार रक्तपिशव्यांचे संकलन आणि तीस ते बत्तीस हजार रक्तघटकांचे वितरण – ही आकडेवारीच इथल्या कामाचे वर्णन करायला पुरेशी आहे. पण अर्थात इथल्या तांत्रिक विभागाने अत्यंत समर्थपणे हा सर्व कार्यभार आपल्या खांद्यांवर पेलला आहे, ही मात्र अभिमानाची गोष्ट आहे.
 
गौरी गणपती असो वा दसरा-दिवाळी, स्वातंत्र्य दिन असो वा प्रजासत्ताक दिन, नवरात्री असो वा कोजागरी, ईद असो वा नाताळ – यांपैकी कुठल्याही दिवशी आणि कुठल्याही वेळी आपण रक्तपेढीत या ---’बाकी सर्वांच्या दृष्टीने सुट्टीचा माहौल तयार करणाऱ्या’ या विशेष दिवसांनादेखील रक्तपेढीचे तंत्रज्ज्ञ, पर्यवेक्षक आणि डॉक्टर्स शांतपणे आपले कर्तव्य बजावताना आपल्याला दिसतील. विशेष म्हणजे यात महिलांची संख्या लक्षणीय आहे. या महिलाही आपापले घर सांभाळणाऱ्या आणि सणासुदींच्या दिवशी घरात हव्याहव्याशा वाटणाऱ्या गृहिणी आहेत. पण आपले कर्तव्य बजावण्यासाठी कुणाला गौरीपूजन सोडुन यावे लागते तर कुणी नवरात्रीच्या गरब्यावर पाणी सोडुन येते. दिवाळीच्या पहाटे घरच्या मंडळींबरोबर असण्याऐवजी त्याच वेळी एखादी गृहिणी रक्तपेढीत ’रक्तजुळवणी’ही करत असते. आपल्या कर्तव्य बजावण्याशी कुणाच्या तरी जगण्या-मरण्याचा संबंध आहे, हे जेव्हा मनावर ठसते तेव्हा स्वाभाविकच प्राधान्यक्रम बदलले जातात.
 
सीमेवरुन बोलावणे आले की सैनिक नाही का हातातली सर्व कामे टाकून तिथे जात ? युद्ध म्हटले की हे सर्व आलेच !
 
 
 
 
- महेंद्र वाघ
 
@@AUTHORINFO_V1@@