‘अभिनव भारत मंदिर’ पर्यटन केंद्र म्हणून विकसित होणार?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jun-2018
Total Views |

 

नाशिक : नाशिकमधील स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतिकारकांचे केंद्र असणारे ‘अभिनव भारत मंदिर’ हे पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याबाबत आ. देवयानी फरांदे यांनी मंगळवारी पर्यटन मंत्र्यांकडे विकास आराखडा सादर केला. पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पर्यटन क्षेत्र विकासकामांबाबत मुंबई येथे बैठक पार पडली. त्यात फरांदे यांनी हा विकास आराखडा सादर केला आहे.

अभिनव भारत मंदिराची जीर्ण झालेली वास्तू पाडून त्याजागी नवीन वास्तू तयार करणे, त्यात क्रांतिकारकांचे व इतर स्वातंत्र्यपूर्व काळातील रंगचित्र रेखाटणे, स्वातंत्र्यपूर्व काळातील चित्रप्रदर्शन तयार करणे, लेझर शो व इतर सुशोभीकरण आदी प्रमुख मुद्द्यांचा या विकास आराखड्यात समावेश आहे. ‘अभिनव भारत मंदिर’ वास्तू विकसित करण्याकामी ४ कोटी ८३ लाख रुपये व इतर आवश्यक कामांसाठी २ कोटी ६८ लक्ष रुपये असा एकूण सात कोटींहून अधिकचा विकास आराखडा आ. फरांदे यांनी रावल यांच्यासमोर मांडला. याबाबत पर्यटनमंत्री रावल यांनी मंजुरीचे आश्वासन आ. फरांदे यांना दिले आहे.

‘अभिनव भारत मंदिर’ हे स्वातंत्र्यपूर्व काळातील क्रांतिकारकांचे मुख्यालय होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘अभिनव भारत’ नावाने सुरू केलेल्या संघटनेचे ते मुख्यालय होते. मात्र आज या वास्तूची दुरवस्था झाली आहे. हीच बाब लक्षात घेऊन हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. यावेळी पर्यटन प्रधान सचिव विजयकुमार गौतम, सहव्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड, अधीक्षक अभियंता रवींद्र पवार, जिल्हा नियोजन अधिकारी चौधरी, कार्यकारी अभियंता तांबे, सहायक अभियंता शेलार आदी उपस्थित होते.

@@AUTHORINFO_V1@@