नवे अध्यक्ष स्वप्नातल्या घटना आकाशात पतंगासारख्या उडवतात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jun-2018
Total Views |



खा. विनय सहस्त्रबुद्धे यांचा अप्रत्यक्षरित्या राहुल गांधींना टोला

मुंबई: भारतीय जनता पक्षाच्या सरकारने कोणत्याही उद्योगपतीचे एका पैशाचेही कर्ज माफ केले नाही. अशी काही वक्तव्ये करून एका पक्षाचे नवे अध्यक्ष आपल्या स्वप्नातल्या घटना आकाशात पतंगासारख्या उडवतात, असे म्हणत खा. विनय सहस्त्रबुद्धे यांनी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांना टोला लगावला. मुंबई पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते संवाद साधत होते. यावेळी भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये, सुरेश वडवलकर, सुधाकर काश्यप, नरेंद्र वाबळे, संजय चव्हाण आणि अजय वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते.

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून सुशासन विभागाची जबाबदारीही आपल्यावर सोपवण्यात आल्याची माहिती खा. सहस्त्रबुद्धे यांनी दिली. तसेच यावेळी त्यांनी सांस्कृतिक संबंध परिषदेविषयही माहिती दिली. ही संस्था गेल्या ७० वर्षांपांसून कार्यरत असून, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात या त्यांनी या संस्थेचा प्रचार आणि प्रसार परदेशातही केला. आता हा विभाग केंद्र सरकारच्या विदेश विभागाचा भाग असून, अनेक दिग्गजांनी या संस्थेचे नेतृत्व केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. या अंतर्गत अनेक कलांचा प्रसार केला जातो, तसेच संस्थेच्या कार्यसूचीत निरनिराळ्या कार्यक्रमांचा समावेश करण्यात आल्याचे ते म्हणाले. कारागीर म्हणून प्रसिद्ध असलेल्या घटकांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी सध्या आपण काम करत आहोत. छत्तीसगड, मणिपूर तसेच अन्य राज्यांमधील कलाकारांना मंच उपलब्ध करून देण्यासाठीही आपण प्रयत्नशील असल्याचे खा.सहस्रबुद्धे म्हणाले.

आपल्याकडे भाजपच्या सुशासन विभागाची जबाबदारी आहे. त्यामुळे अहवालातून येणारी माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे आणि नागरिकांकडून अभिप्राय घेऊन, ते सरकारपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण काम आपल्याला पार पाडावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. हरियाणा सरकारच्या सहकार्यांने आपण स्त्री भ्रूणहत्येविरोधात उपक्रम राबविला आणि त्याचा फायदाही दिसून आला. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण कमी झाले असून, स्त्री पुरुषांच्या संख्येत असलेली तफावत कमी होत असल्याची माहिती त्यांनी दिली. भाजप सरकारची नियत चांगली असून, सरकारच्या उद्दिष्टांबद्दल कोणतीही वेगळी भावना नाही. सरकारमध्ये देवाणघेवाणीच्या भावनेतून काम केले जाते. सब का साथ, सब का विकास हे आपल्या सरकारचे उद्दिष्ट असून, गेल्या चार वर्षांमध्ये सरकारवर कोणत्याही भष्ट्राचाराचे आरोप झाले नसल्याचे सहस्रबुद्धे म्हणाले.

वेगळ्या विचारांची साथ

सरकारने सध्या अनेक बदल केले असून, त्याचे मुख्य उदाहरण म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. अर्थसंकल्पाचा महिना बदलल्यामुळे योजना यशस्वीरीत्या राबविण्यासाठी तसेच त्यासाठी पैसा वेळेत खर्च करण्यासाठी मदत मिळते. तसेच पंतप्रधान देशातील नागरिकांशी संवाद साधून, मन की बात’ सादर करत असून, तीदेखील अनोखी बाब असल्याचे ते म्हणाले.

स्वामी विवेकानंदांना शिकागोत अभिवादन

स्वामी विवेकानंद यांना अभिवादन करण्यासाठी तसेच जगभरात एकतेचा संदेश पोहोचावा यासाठी शिकागोमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सहस्त्रबुद्धे यांनी यावेळी दिली.

योजना राबविण्यावर सरकारचा भर

सरकारने केवळ योजना आखण्यावर भर दिला नसून त्या तळागाळापर्यंत राबविण्यावर भर दिला असल्याचे ते म्हणाले. सरकाने सध्या गव्हर्मेंट ई मार्केट सुरू केले असून छोट्यात छोट्या उद्योजकालाही आता त्यात सहभागी होणे शक्य झाले आहे. आपली वस्तू तो थेट सरकाला विकू शकतो अशी प्रक्रिया तयार करण्यात आली असून आता राज्य सरकारनेही याचा लाभ घ्यावा.

विनय सहस्रबुद्धे, भाजप खासदार

@@AUTHORINFO_V1@@