श्याम गुरुजींचा श्वानाश्रम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jun-2018
Total Views |

 
प्रमोद बोराटने 
पुलगाव, 
माणसं माणसांशी माणसांसारखी वागत नाहीत. कुत्र्यासारख्या त्याच्या सहजीवक प्राण्याशी त्याने माणुसकीने वागणे ही तर फार दूरची बाब आहे. माणसं आपल्या जन्मदात्यांना म्हातारे झाल्यावर वृद्धाश्रमांत टाकतात, अशा हवेत एक माणूस आहे तो भटक्या कुत्र्यांसाठी ‘श्वानाश्रम’ चालवितो.
कुत्रा ही माणसांसाठी शिवी झाली आहे. ‘कुत्ते, कमीने मैं तेरा खून पी जाऊंगा’ सारखे संवाद चित्रपटांत असतात. एकीकडे विदेशी प्रजातींची कुत्री लाखो रुपयांना विकत घेऊन प्रतिष्ठा म्हणून ती पाळली जातात. त्यांच्या रखरखाववर पुन्हा दरमहा हजारो रुपये खर्च केले जातात; पण रस्त्यावरच्या सडकछाप कुत्र्यांच्या नशिबी मात्र हड्‌ हड्‌च असते.
वर्धा जिल्हा परिषदेच्या एका शाळेत असलेले श्याम जुनघरे सहकुटुंब ही श्वानसेवा करतात. पत्नी संगीता व कन्या कल्याणी त्यांच्या या कार्यात कुरबूर न करता सहभागी असतात.
पुलगावच्या हिंगणघाट फैलात तीन माणसं आणि दहा-बारा कुत्र्यांचं हे कुटुंब आनंदात रहात. घरात माणसं तीन, पण कुत्री असंख्य. रस्त्यावरची कुत्री यांच्या घरात सरळ प्रवेश करतात. रस्त्यावरची जखमी कुत्री श्यामसर सरळ घरातच आणतात. त्यांच्या उपचारावर लागेल तो खर्च करतात. मागे एका कुत्र्यास कानाच्या मागे फोड झाला होता त्या कुत्र्याला या इसमाने वर्ध्यास डॉ. जोग यांच्याकडे इलाज केला. त्या कुत्र्यावर त्यांनी हजारो रुपये खर्च केले. एका कुत्रीस निमोनिया झाला तेव्हा तिच्यावरही हजारो रुपये खर्च झाले... ‘नेकी कर और दरीयांमे डाल’ या न्यायाने ते त्यांच्या या निरपेक्ष श्वानसेवेची वाच्यताही करत नाहीत. त्यांच्या या कार्याबद्दल आता आजूबाजूचे लोक आदराने सांगू लागले आहेत.
प्रस्तूत प्रतिनिधीने त्यांच्या घरांला भेट दिली तेव्हा कडक उन्हाळ्यात अगदी दहा, बारा बेवारस कुत्री छान कुलरच्या हवेत बिनधास्त झोपलेली! न राहवून विचारलंच, ‘‘कुत्र्यांना कुलर?’’, ‘‘का त्यांना गर्मी होत नाही?’’ त्यांचा मला उलट प्रश्र्न... ‘‘तसं नाही पण पाळलेल्या कुत्र्यांचे लाड करतात...’’, ‘‘मग? या बेवारस कुत्र्यांना जीव नाही? बघा बघा कसे छान झोपलेत.’’ असे अत्यंत कौतुकाने त्या कुत्र्यांकडे बघत गुरुजी म्हणाले अन्‌ मग पोटच्या लेकरांची ओळख करून द्यावी तितक्या मायेनं त्या कुत्र्यांबद्दल सांगते झाले... हा जब्या कल्याणीचा भाऊ. कल्याणी दहावीला तालुक्यात अव्वल आली होती. तिचा अभ्यास सांभाळूनही तिने आजारपणात या जब्याची सेवा केली होती...
नुसता आश्रयच नाही, तर त्यांनी त्या कुत्र्यांशी नातीही जोडली आहेत. जब्या हा कुत्रा त्यांच्या कन्येचा भाऊ! ऐश्र्वर्या, रिया, बन्या अशी अनेक नावांची कित्येक कुत्री घरभर झोपलेली. बाहेर वर्‍हाड्यांतही कुत्रीच कुत्री. या कुत्र्यांना ऊन लागू नये यासाठी श्यामभाऊंनी वर छान हिरवी नेट बांधून ठेवली. कुत्र्यांना झोपायला अंथरुण. बरे, घरात फिरायला कुणालाही मनाई नाहीच. या कुत्र्यांना खाऊ घालणे, आंघोळ घालणे, त्यांचं आजारपण ही सर्व काळजी कुटुंबातील व्यक्ती म्हणूनच घेतली जाते हे विशेष.
श्याम गुरुजींना रस्त्यात एखादा जखमी प्राणी दिसला की त्याच्यावर ते इलाज करणार. मग तो गाढव असो, माकड असो की कुत्रा. त्याला मलमपट्टी करणार आणि वेळ पडलीच तर दवाखान्यातपण नेतील. खर्च कितीही येवो!
यांच्या परिवारातील अशा सदस्यांबद्दल ते भावूक होत सांगतात... दत्तादेखील असाच. कधी त्याच्या पायावरून मोटारसायकल गेली असावी म्हणून तो मोटारसायकलच्या मागे भुंकत जायचा. एकदा चार-पाच युवकांनी या दत्ताच्या गळ्यात फास टाकून त्याला मोटारसायकलने फरफटत नेले. नंतर गुरुजींनी त्याला जखमी अवस्थेत आणले, त्याच्यावर उपचार केले; पण तो जगला नाही. माणसाचा करावा तसा गुरुजींनी दत्ताचा अंत्यसंस्कार केला. लोक सांगतात, कुठल्याही प्राण्यांचा अंत्यसंस्कार ते तितक्याच सन्मानाने करतात.
बाळंत कुत्रीची ते विशेष काळजी घेतात. कुत्र्यांच्या आहारावर, आरोग्यावर व अंत्यसंस्कारावर खर्च होतोच. प्रशांत डफळे यांचे मेडिकल स्टोर्स आहे. ते ही कुत्र्यांच्या उपचारासाठी बरीच औषधे विनामूल्य देतात तर सचिन मुळे हे त्यांना औषध सुचवितात.
पाळलेल्या कुत्र्यांची दखल घेणारे अनेक आहेत.
आता लोकांचा सेल्फ इतका दांडगा झाला आहे की ते कशाहीसोबत, कुणाही सोबत सेल्फी घेतात... श्याम गुरुजींसोबत एक सेल्फी घ्यावा म्हटलं तर ते नाही म्हणाले. ‘पेपरात छापू नका’ म्हणत हात जोडले. ‘‘मला कुठल्याही प्राण्याचे दु:ख, वेदना नाही पाहवत म्हणून मी हे करतो. त्यात मला बरं वाटावं, हा माझाच स्वार्थ आहे...’’ असे गुरुजी म्हणत असताना अवघ्या अस्तित्वाचे दोन हात व्हावे अन्‌ या माणसाचे पाय पकडावे असे वाटले... पण, गुरुजी तोवर त्यांच्या एका श्वानस्नेह्याच्या सेवेत रुजू झाले होते!
@@AUTHORINFO_V1@@