अमेरिकेकडून संभाव्य आर्थिक धोका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jun-2018
Total Views |

 

 

 

 

भारतासहित अनेक देश अमेरिकन वस्तूंवर अव्वाच्या सवा आयात शुल्क लादून अमेरिकेला लुटत असल्याचे विधान त्यांनी केले. याबाबतीत लवकरच नवीन धोरण ठरवले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

 
 

भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापारामधील एक महत्त्वाचा देश म्हणजे अमेरिका. भारत-अमेरिकेचा एकूण व्यापार १२५ अब्ज डॉलरचा आहे. भारतीय उत्पादनांच्या एकूण निर्यातीपैकी सुमारे १६ टक्के निर्यात अमेरिकेमध्ये होते. भारतीय बनावटीचे तयार कापड, मौल्यवान रत्ने आणि दागिने, गाड्यांचे सुटे भाग, रसायने, औषधे यांचा अमेरिका हा मोठा ग्राहक आहे. अमेरिकेबरोबरचा व्यापार हा भारताला आतापर्यंत नेहमीच फायदेशीर ठरत आला आहे. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांची अलीकडची वक्तव्ये धोक्याचा इशारा देणारी आहेत. ट्रम्प यांची खासियत अशी की, ते जे बोलतात ते करून दाखवतात. त्यामुळे ट्रम्प यांची विधाने सगळं जग गांभीर्याने घेत असतं.

 

नुकत्याच कॅनडामध्ये झालेल्या जी ७राष्ट्रांच्या परिषदेत डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन वस्तूंवर भारतात आकारल्या जाणाऱ्या आयात शुल्कावर नाराजी व्यक्त केली. भारतासहित अनेक देश अमेरिकन वस्तूंवर अव्वाच्या सवा आयात शुल्क लादून अमेरिकेला लुटत असल्याचे विधान त्यांनी केले. याबाबतीत लवकरच नवीन धोरण ठरवले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. ट्रम्प यांच्यासाठी सर्वांत चिंतेची बाब म्हणजे भारत-अमेरिका यांच्यातला (अमेरिकेच्या दृष्टीने) नकारात्मक व्यापारतोल. २०१७-१८ या आर्थिक वर्षात भारताची अमेरिकेतली निर्यात ही ४७.९ अब्ज डॉलर इतकी होती, तर आयात २६.६ अब्ज डॉलर इतकी होती. याचा अर्थ भारताबरोबरच्या व्यापारात अमेरिकेला २१.३ अब्ज डॉलर इतका तोटा सहन करावा लागला आहे. हा नकारात्मक व्यापारतोल डोनाल्ड ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपतो आहे. भारतात अमेरिकेतून आयात होणाऱ्या वस्तूंवर मोठे आयातशुल्क आकारले जाते, ज्यातून भारत सरकारला मोठं उत्पन्न मिळतं. वाहनांवर ६० ते ७५ टक्के, अल्कोहोल आणि इतर पेयांवर १५० टक्के, तर कापड आणि तत्सम वस्तूंवर ३०० टक्क्यांपर्यंत आयात शुल्क आकारले जाते. याउलट भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या बहुतांश वस्तू Generalised System of Preferences(GSP) च्या अंतर्गत येत असल्याने या वस्तूंवर अमेरिकेकडून आयात शुल्क आकारले जात नाही.

 

१९७४ साली झालेल्या GSP करारानुसार जगातल्या गरीब राष्ट्रांच्या उत्पादनांना अमेरिकेत मुक्त प्रवेश देण्यात येतो. या करारानुसार भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या सुमारे साडेतीन हजार उत्पादनांवर अमेरिकेकडून कोणतेही आयातशुल्क आकारले जात नाही. या योजनेअंतर्गत भारतातून होणाऱ्या निर्यातीचे मूल्य सुमारे साडेपाच अब्ज डॉलर आहे. GSP योजनेमुळे अमेरिकेचं दिवाळं निघत असल्याने या योजनेचा पुनर्विचार करणार असल्याचे ट्रम्प यांनी बोलून दाखवले. GSP योजनेत काही बदल होऊन भारतीय उत्पादनांवर अमेरिकेकडून आयात शुल्क लादले गेले तर त्याचा विपरित परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. तसंच अमेरिकेकडून भारतात आयात होणाऱ्या उत्पादनांवरील आयात शुल्क कमी करण्यासाठी अमेरिका आता दबाव वाढवेल, अशी शक्यता आहे.

 

अमेरिकेतून आयात होणाऱ्या हार्ले डेव्हिडसन दुचाकींवरील आयात शुल्क भारताने फेब्रुवारीमध्ये ७५ टक्क्यांवरून ५० टक्क्यांवर आणले होते. हे आयात शुल्क शून्य करावे, अशी अमेरिकेची मागणी आहे. तसेच वैद्यकीय उपकरणांच्या किमतींवर भारताने लावलेले निर्बंध उठविण्याची मागणीही अमेरिकेकडून होत आहे. अमेरिकेतून येणाऱ्या दुग्ध उत्पादनांवरही भारताने २००३ साली बंदी घातली होती. अमेरिकेने अनेकदा मागणी करूनही भारताने ही बंदी न उठवल्यामुळे अमेरिका नाराज आहे. भारतातून निर्यात होणाऱ्या तयार कपड्यांवर अमेरिका ८ ते २८ टक्के आयात शुल्क आकारते, तर अमेरिकेकडून भारतात आयात होणाऱ्या तयार कपड्यांवर ३२ टक्के आयात शुल्क आकारले जाते. अमेरिका हे आयात शुल्क वाढविण्याची शक्यता असून त्यामुळे भारतीय निर्यातदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. भारतातून तयार कपड्यांची ३० टक्के निर्यात अमेरिकेत होते. एकंदर, भारताबरोबरच्या व्यापारधोरणात अमेरिकेकडून मोठे बदल होण्याचे संकेत दिसत आहेत. या संभाव्य आर्थिक धोक्याबाबत भारताला दक्ष राहावे लागेल.

 

हर्षद तुळपुळे

 

@@AUTHORINFO_V1@@