शू लॉण्ड्री, अफलातून कल्पना...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jun-2018
Total Views |



संदीपनं शू लॉण्ड्री सुरू केल्यानंतर नेहमीप्रमाणे आणखी आठ जणांनी या व्यवसायात उतरून, त्याच्याशी स्पर्धा सुरू केली. परंतु, फार दिवस त्यांचा टिकाव लागला नाही. या कमी मार्जिन असलेल्या व्यवसायात जम बसवणं तसंही कठीणच आहे. परंतु, संदीपने अत्यंत हुशारीने व चिकाटीने आपल्या व्यवसायाचा विस्तार केला. आज संदीपकडे काम करण्यासाठी अनेक कामगार आहेत आणि त्याच्या व्यवसायाचा वेगाने विस्तार होत आहे.

’संघर्ष मे आदमी अकेला होता है, सफलता में दुनिया उस के साथ होती है, जिस जिस पर यह जग हँसा है, उसी ने इतिहास रचा है.’ हे माझं वाक्य नाही. अनेकांनी स्वत:च्या कर्तृत्वाने हे वाक्य प्रत्यक्ष जीवनात सिद्ध केलं आहे. करायचं ठरवलं, तर काहीही अशक्य नाही आणि करायचंच नसेल, तर सगळंच अशक्य वाटतं. गेल्या रविवारच्या अंकात मी ’नोकर्‍यांना पर्याय शोधण्याची गरज’ या शीर्षकाचा लेख लिहिला होता. कारण, आज आपल्या देशात सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील नोकर्‍यांची संख्या व नोकरी मागणार्‍यांची यात फार अंतर निर्माण झाले आहे. नोकर्‍या कमी आणि मागणारे जास्त, अशी विषम परिस्थिती तयार झाल्याने बेरोजगार तरुणांची मोठी फौज उभी झाली आहे. प्रत्येकाला नोकरी मिळणे शक्य नसल्याने स्वयंरोजगाराकडे वळण्यातच आपले हित आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

प्रबळ इच्छाशक्‍ती असणारी व्यक्‍ती देवालाही शोधून काढते, असं म्हटलं जातं. मनात काहीतरी करण्याची जिद्द असेल, तर कोणत्याही संकटावर मात करणं शक्य असतं, हे सिद्ध करणारी असंख्य उदाहरणं देता येतील. ’स्वप्ननगरी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुंबई येथील एका युवकाने अशाच एका अफलातून कल्पनेवर आधारित व्यवसाय सुरू केला. त्या युवकाचं नाव आहे संदीप गजाकस.

संदीप गजाकस या युवकाने सुरू केलेला व्यवसाय खूपच साधा आणि सरळ आहे व तो म्हणजे लॉण्ड्रीचा. होय, संदीपने सुरू केली आहे लॉण्ड्री, परंतु कपड्यांची नव्हे, तर शू लॉण्ड्री. म्हणजे पादत्राणे धुवून, स्वच्छ करून देण्याचा व्यवसाय. ऐकून आश्‍चर्याचा धक्‍का बसला ना? शूज धुवून किंवा स्वच्छ करून कुणी फायद्याचा व्यवसाय करू शकतं, असा विचारही कुणी आजपर्यंत केला नसेल. परंतु, संदीपने बचत केलेल्या काही पैशांतून देशातील पहिली शू लॉण्ड्री सुरू केली. हा एकदम ’हट के’ आणि नवीन असला, तरी अगदी सरळ व्यवसाय आहे.

संदीप मिठीबाई कॉलेजमध्ये शिकत असताना त्याचे काही मोठ्या घरचे श्रीमंत मित्र खूप बेफिकीर होते. विशेष करून शूजच्या बाबतीत. एकदा घातल्यानंतर जराही खराब झाला, तरी ते शूज फेकून देत असत. त्यावेळी संदीपने आपल्या मित्रांसोबत लावलेल्या शर्यतीतून या अफलातून व्यवसायाचा जन्म झाला. संदीपने फक्‍त शर्यत जिंकण्यासाठी म्हणून आपल्या मित्रांचे शूज स्वच्छ करून, नवे असल्यासारखे करून दिले. संदीपने ते शूज इतके स्वच्छ केले, की ते आपलेच आहेत यावर त्याच्या मित्रांचा विश्‍वासच बसेना. त्याच वेळी शू लॉण्ड्री सुरू करण्याची कल्पना संदीपच्या मनात आली.

परंतु, कोणतीही कल्पना मनात आली म्हणजे ती प्रत्यक्षात उतरतेच असं नव्हे. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर संदीपने इतरांसारखेच नोकरीसाठी प्रयत्न सुरू केले. या दरम्यान त्याने फॅशन कोरिओग्राफर, इव्हेंट मॅनेजर, फुटबॉल खेळाडू आणि कॉल सेंटरमध्ये काम केलं. कॉल सेंटरमध्ये काम करत असताना संदीपला ग्राहकांसोबत संवाद साधण्याची कला अवगत झाली. असंच मार्गक्रमण सुरू असताना पुन्हा एकदा संदीपच्या डोक्यात शू लॉण्ड्रीची भन्नाट कल्पना घर करू लागली. मग त्यानं ही कल्पना प्रत्यक्षात आणण्याचा निर्णय घेतला. ही बाब वडिलांना सांगितली असता, संदीप नेमकं काय करणार, हेच त्यांना समजेना.

कोणत्याही पाठिंब्याविना आपली अफलातून संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्याच्या ध्येयाने झपाटलेल्या संदीपनं स्वत:चा व्यवसाय सुरू केला. यासाठी त्यानं आपल्या बेडरूममध्ये वर्कशॉप सुरू केलं. काही मित्रांच्या मदतीनं छोटंसं मार्केटिंग अभियानही हाती घेतलं. प्रारंभी संदीपने एकट्यानेच मार्केटिंग, क्‍लीनिंग, डिलिव्हरी आणि बिलिंग या सर्व जबाबदार्‍या पार पाडल्या. आज डिलिव्हरी बॉय दुसर्‍या ठिकाणी गेला आहे, त्यामुळे मी आलो आहे, असं संदीप ग्राहकांना सांगत असे. तसं तर मला स्वत:लाच डिलिव्हरी करायला आवडायचं. याचं कारण म्हणजे आपले शूज नवे असल्यासारखेच बघितल्यानंतर ग्राहकांच्या चेहर्‍यावर दिसणारं समाधान बघायला मला आवडायचं, असं संदीप सांगतो.

समुद्रकिनारी असल्यामुळे मुंबईतील हवामान दमट असतं. शिवाय धुळीचाही सामना करावा लागत असल्यामुळे पादत्राणेही लवकर खराब होतात. अशा स्थितीत शू लॉण्ड्री सुरू केल्यास चांगला प्रतिसाद मिळू शकतो, या अपेक्षेने संदीपने हा व्यवसाय सुरू केला. संदीप एक जोडी शू क्लिनिंगचे सुमारे दीडशे रुपये घेतो. यामध्ये ग्राहकाच्या घरून शू नेणं, आवश्यक ती दुरुस्ती करणं, धुवून स्वच्छ करणं आणि वाळवून, ग्राहकांना परत करणं, अशी कामं केली जातात. ऑफिससाठी जागा घेणं परवडत नसल्याने ग्राहकांच्या घरूनच पिक-अप आणि डिलिव्हरीची व्यवस्था केली. कालांतराने संदीपने शॉपर्स टॉपमधील एका ग्राहकाला आपल्या शू लॉण्ड्रीबाबत सांगितलं असता, त्याने विकलेल्या शूजच्या आफ्टर सेल्स सर्व्हिसचं काम त्याला दिलं. म्हणजे दुकानातून विक्री झालेल्या शूजची नंतरही देखभाल करण्याची सेवा. हे काम मिळाल्यानंतर मात्र संदीपने कधीच मागे वळून बघितलं नाही. अदिदास, प्युमा यासारख्या जवळपास सर्वच ब्रॅण्डेड कंपन्यांच्या आफ्टर सेल्स सर्व्हिसची जबाबदारी आज संदीप सांभाळत आहे.

संदीपने शू लॉण्ड्री सुरू केल्यानंतर नेहमीप्रमाणे आणखी आठ जणांनी या व्यवसायात उतरून, त्याच्याशी स्पर्धा सुरू केली, परंतु फार दिवस त्यांचा टिकाव लागला नाही. या कमी मार्जिन असलेल्या व्यवसायात जम बसवणं तसंही कठीणच आहे, परंतु संदीपने अत्यंत हुशारीने व चिकाटीने आपल्या व्यवसायाचा विस्तार केला. आज संदीपकडे काम करण्यासाठी अनेक कामगार आहेत आणि त्याच्या व्यवसायाचा वेगाने विस्तार होत आहे.

आपल्या या अनोख्या प्रवासाबाबत बोलताना संदीप म्हणाला की, स्वच्छतेची मला प्रारंभीपासूनच आवड होती. आता विवाहानंतर माझ्यातही खूप फरक पडला, अशी कबुली त्याने दिली. एखाद्या व्यक्‍तीच्या शूकडे बघून, मी त्याच्या जीवनात डोकावू शकतो, असं गमतीने तो म्हणाला. २००३ पासून आतापर्यंत शूजच्या हजारो जोड्या स्वच्छ आणि सुमारे ६० हजार जोड्या दुरुस्त केल्या असतील. संदीपचा हा दावा अनोखा वाटत असला, तरी त्याच्या अफलातून कामाची ती पावतीच आहे. आज व्यवसायाचा विस्तार झाल्यानंतर संदीप आपला बहुतांश वेळ घरीच घालवतो. दिवसभर ब्लॅकबेरी किंवा लॅपटॉपवर दररोज सुमारे शंभर ई-मेल्सला उत्तरं देण्याचं काम तो करतो. यांपैकी बहुतांश ई-मेल्समध्ये खराब झालेल्या शूजची छायाचित्रं असतात. ”शू लॉण्ड्रीच्या देशभरातील फ्रँचाईझींचे मालक किंवा कर्मचार्‍यांनी ते पाठविलेले असतात. २००९ मध्ये आम्ही दररोज ८० ते ९० शूजच्या पेअर्स स्वच्छ करत असू. तेव्हा माझ्याकडे १६ कर्मचारी होते,” असंही संदीपनं सांगितलं.

संदीप आठ वर्षांचा असताना त्याला पाचगणीच्या बोर्डिंग स्कूलमध्ये पाठविण्यात आलं. तिथे तो एक खेळाडू आणि उत्तम एनसीसी कॅडेट म्हणून गाजला. एअर इंडियामध्ये असलेले त्याचे वडील जगभरात फिरत आणि भारतात उपलब्ध नसलेले महागडे व ब्रॅण्डेड शूज संदीपसाठी ते आणत असत. एनसीसीची शिस्त (पॉलिश असलेले शूज) आणि माझे महागडे शूज स्वच्छ ठेवण्याची गरज हे यामधील कौशल्य प्राप्‍त करण्याचं पहिलं पाऊल होतं. परंतु, त्यामधून अशा प्रकारे व्यवसाय उभा करेन, असा कधीही विचार केला नव्हता, असंही संदीप म्हणाला. फायर इंजिनिअरिंग विषयातील पदवी घेतल्यानंतर २००१ साली नोकरीकरिता आखातामध्ये जाण्याची तयारी संदीपने सुरू केली होती. परंतु, ९/११ ला अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरावर दहशतवादी हल्‍ला झाला आणि जागतिक परिस्थिती बदलून गेली. आखातात युद्ध सुरू होण्याची शक्यता लक्षात घेता त्याच्या पालकांनी तिथे जाण्यास मज्जाव केला. त्यामुळे भारतात फारच कमी संधी असलेल्या पदवीच्या आधारे मी येथेच होतो. खूप स्वप्न बघितली, परंतु काहीच मार्ग सापडत नव्हता. इतर कोणत्याही व्यवसायात मदत करण्याची वडिलांची इच्छा होती. परंतु, हुशार, शिक्षित आणि पुरस्कार विजेता खेळाडू असूनही आपला मुलगा इतरांचे शूज स्वच्छ करतो, या कल्पनेनंच त्याचे पालक हादरून गेले होते. त्यामुळे संदीपनं स्वत:च व्यवसाय सुरू केला आणि तो यशस्वी करून दाखवितानाच इतरांसमोर आदर्शही निर्माण केला. अशा अफलातून कल्पना प्रत्यक्षात आणून यशाचं शिखर गाठता येतं, हे संदीप गजाकस या तरुणानं आपल्या कर्तृत्वानं सिद्ध करून दाखविलं आहे. त्याचा हा प्रवास इतरांसाठीही निश्‍चितच प्रेरणादायी आहे.

“एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न करू नका. शिवाय अर्धवट शिजलेलं कोणतंही उत्पादन लॉन्च करू नका. तुमच्याकडे असलेल्या पैशांचं योग्य व्यवस्थापन करा आणि वायफळ खर्च कमी करा. तुमचं उद्दिष्ट ग्राहकांना असलेल्या अपेक्षेपेक्षाही उंच ठेवा आणि तुमच्याशीच स्पर्धा करा,” हाच संदेश संदीपने आपल्या कृतीतून दिला आहे.

डॉ. वाय. मोहितकुमार राव

@@AUTHORINFO_V1@@