येणे वाग्यज्ञे तोषावे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jun-2018
Total Views |
 
 
“मनी धरावे ते होते / विघ्न अवघेचि नासोन जाते/ कृपा केलिया रघुनाथे/ प्रचीत येते”.
या समर्थ रामदासांच्या वचनांचा प्रत्यय आमच्या पत्रकार सहनिवासात यशस्वीपणे संपन्न झालेल्या ज्ञानेश्वरी वाचनाच्या उपक्रमाच्या संगतेत आला. अधिक महिन्यात सर्वांच्या सहकार्याने पूर्ण झालेला हा एक प्रकारे वाग्यज्ञच होता. सर्वांच्या चेहऱ्यावर उपक्रमाच्या सुफळ समाप्तीचे तेज झळकत होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान टिपताना माझे मन मात्र मागोवा घेऊ लागले.
 
आमच्या पत्रकार सहनिवासातील भगिनींनी अधिक मासात ज्ञानेश्वरी वाचन करण्याचे ठरविले. भारतीय परंपरेत अधिक मासाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. दर तीन वर्षांनी हा अधिक मास येत असतो. या महिन्याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. अधिक मास म्हणजे दान-धर्म, व्रतवैकल्ये करून पुण्यसंचय करण्याची सुवर्णसंधीच. या महिन्यात धार्मिक कार्यक्रम आणि उपक्रम करण्याकडे लोकांचा कल असतो. अशा या पवित्र महिन्यात आपणही काही चांगला आणि सर्वांना सहभागी करून घेता येईल असा उपक्रम राबवावा असा विचार सहनिवासातील काही भगिनींनी केला आणि सर्वानुमते ज्ञानेश्वरी वाचनाचा उपक्रम राबविण्याचे ठरले.
 
१६ मे ते १३ जून हा अधिक मासाचा कालावधी होता. नागपूरचा उन्हाळा. भर दुपारी कुलरची थंड हवा आणि टिव्ही मालिकांच्या मायाजालात न गुरफटता दुपारी चार वाजता एकत्र जमायचे हे सोपे काम नव्हते. चार ते सात घराबाहेर राहायचे आणि एक-दोन दिवस नव्हे तर एक संपूर्ण महिनाभर हा उपक्रम चालवायचा यावर बरेच मंथन, चर्चा झाली. आपल्याला हे सर्व झेपेल का असा प्रश्नही काहींनी उपस्थित केला. पण शेवटी हा कार्यक्रम घ्यायचाच यावर सर्वांचे एकमत झाले.
 
समन्वयमहर्षी प्रज्ञाचक्षु श्री गुलाबराव महाराजांचे पट्टशिष्य श्री बाबाजी महाराज पंडित यांनी ज्ञानेश्वरीवर लिहिलेल्या टीकात्मक ग्रंथातील प्रत्येक अध्यायाचे रोज एक अध्याय या प्रमाणे वाचन करावे असे ठरले. त्यासाठी सहनिवासातील प्रत्येक घरी हा उपक्रम व्हावा, असा विचार समोर आला आणि त्याप्रमाणे प्रत्येक घरी संपर्क करून वाचनाचा दिवस निश्चित करण्यात आला. ज्यांच्या घरी वाचन असेल त्या घरच्या गृहिणीने वाचन करावे आणि इतरांनी श्रवण करावे असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते. प्रत्येक घरी या उपक्रमाचे स्वागतच झाले. काही मंडळी बाहेरगावी जाणार होती पण त्यांच्या घरचा कार्यक्रम ठरला होता तत्पूर्वी त्यांनी आपला प्रवासाचा कार्यक्रम पूर्ण केला होता आणि या उपक्रमात सहभागी झाले होते. काही हिंदी भाषिक घरातून सुद्धा या उपक्रमाचे स्वागत झाले. मराठी वाचनाचा सराव नसला तरी आमच्या घरी देखील हा कार्यक्रम झाला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. त्यांच्या घरी मग वाचनाची बाजू मराठी भगिनींनी सांभाळली.
 
हा वाग्यज्ञ जरी सहनिवासातील भगिनींनी पुढाकार घेऊन घडवून आणला तरी त्यात घरच्या पुरुष मंडळींचा देखील सक्रीय सहभाग होता. कुणी गजरे आणून देत होते तर कुणी प्रसादाची व्यवस्था केली होती. कुणी वाणाचे समान आणून दिले अशा अनेक पद्धतीने घरच्या पुरुष मंडळींनी या उपक्रमात आपला सहभाग नोंदविला. घरातील लहान-मोठे सगळेच या वाग्यज्ञात सहभागी झाले होते.
 
आजवर पत्रकार सहनिवासात अनेक कार्यक्रमाचे आयोजन झाले आहे. अलीकडे, पौरोहित्य वर्ग सुरु झाला आहे. दर शिवरात्रीला कोण्या एकाच्या घरी रुद्रपठण, महिम्नस्तोत्र आणि शिवतांडव स्तोत्राचे गायन होते. तत्पूर्वी श्रीसूक्त, विष्णू सहस्रनाम, गणपती अथर्वशीर्ष आदी उपक्रम राबविले गेले. गेल्यावर्षी कोकिला व्रताचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर हवन करून साजरा करण्यात आला होता.
 
यावर्षी अधिक मासाची सुरुवात गंगा दशहराने झाली. पहिल्याच दिवशी कडक उन्हात भर दुपारी चार वाजता किती महिला येतील याविषयी मनात धाकधूक होती पण जास्तीत जास्त भगिनी येतील असा विश्वास होता. हा विश्वास सार्थकी लागला. संपूर्ण महिनाभर या उपक्रमात ३५-४० महिलांचा सक्रीय सहभाग होता. ज्ञानेश्वारी वाचनाचा प्रारंभ, आणि जगन्नाथ पंडिताने रचलेल्या गंगा लहरीचे सूर आसमंतात घुमू लागले आणि सगळेच वातावरण भारावून गेले होते.
 
आज फ्लॅट संस्कृतीमुळे जुनी मुल्ये, परंपरा यांचा लोप होत चालला आहे असे म्हटले जाते, काही प्रमाणात हे खरेही आहे. पण त्याच बरोबर काही करण्याची इच्छा-आकांक्षा मनी बाळगून, सर्वांना सोबत घेऊन चालण्याचे ठरवून, सर्वांच्या सहकार्याने केलेला प्रयत्न यशस्वी होतो हे देखील तितकेच खरे आहे. पत्रकार सहनिवासातील ज्ञानेश्वरीच्या या वाग्यज्ञाने हेच अधोरेखित केले आहे. या उपक्रमामुळे सहनिवासातील प्रत्येक महिला स्नेहरज्जूने परस्परांशी जोडल्या गेल्या ही या कार्यक्रमाची मोठीच उपलब्धी म्हणावी लागेल.
 
 
 
- सौ. सुषमा पाचपोर
 
@@AUTHORINFO_V1@@