त्रिवेणी संगमातील सुप्त नदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jun-2018   
Total Views |



 

अनेक वेळा परिभाषाच विचार प्रवाह निर्माण करते व त्या आधारे शत्रू-मित्रभाव ठरविले जातात. आजवर घटनाधिष्ठित सेक्युलर मतप्रवाह व संघाचा हिंदुत्ववादी मतप्रवाह हे एकमेकांच्या विरोधी मानले जात असत, परंतु मोहनजी आणि प्रणव मुखर्जी यांच्यात ज्या चर्चेच्या फेऱ्या झाल्या त्यातून आपण वेगळ्या शब्दांत बोलत असलो तरी त्याचा अर्थ एकच आहे, असा विश्वास दोघांच्या मनात निर्माण झाला असावा.
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्षाच्या समारोपाच्या कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपस्थित राहिल्याने देशभर माजलेल्या चर्चेच्या वादळातून एक चांगली गोष्ट घडली व ती म्हणजे अनेक वाहिन्यांनी या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले. त्यामुळे संघाचा कार्यक्रम कसा असतो, याचे प्रत्यक्ष दर्शन कोट्यवधी भारतीयांना झाले. त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरसंघचालक व प्रणव मुखर्जी यांची पूर्ण भाषणे वाहिन्यांनी दाखविली. आजवर डॉ. मोहनजी भागवत यांच्या भाषणातील जेवढा भाग वृत्तपत्रातून बातमी म्हणून येत असे किंवा वाहिन्यांवर दाखविला जात असे, तेवढाच भाग लोकांसमोर येई. लोकप्रबोधन हे प्रसारमाध्यमांचे उद्दिष्ट केव्हाच इतिहासजमा झाले असून ज्यातून सनसनाटी बातमी तयार होईल, तसा मालमसाला आपल्या वाचकांना किंवा प्रेक्षकांना पुरविणे एवढाच उद्देश राहिल्याने त्यांच्या भाषणातील असा भाग उचलून किंवा त्याला तसे स्वरूप देऊन लोकांपुढे येत असे. यातून संघाची एक विशिष्ट प्रतिमा प्रसारमाध्यमांनी तयार केली होती, परंतु यावेळी मोहनजींचे भाषण पूर्णपणे दाखविले गेल्यामुळे त्यांच्या भाषणाचीही सकारात्मक चर्चा झाली. दोन्ही वक्त्यांनी मांडलेले विचार सारखे असले तरी वेगवेगळ्या परिभाषेत मांडले होते. या परिभाषाच केवळ वेगळ्या होत्या असे नव्हे तर ते दोघेही वेगवेगळ्या संकल्पनांतून वेगवेगळ्या लोकप्रवाहांशी संवाद साधत होते. अनेक वेळा परिभाषाच विचार प्रवाह निर्माण करते व त्या आधारे शत्रू-मित्रभाव ठरविले जातात. आजवर घटनाधिष्ठित सेक्युलर मतप्रवाह व संघाचा हिंदुत्ववादी मतप्रवाह हे एकमेकांच्या विरोधी मानले जात असत, परंतु मोहनजी आणि प्रणव मुखर्जी यांच्यात ज्या चर्चेच्या फेऱ्या झाल्या त्यातून आपण वेगळ्या शब्दांत बोलत असलो तरी त्याचा अर्थ एकच आहे, असा विश्वास दोघांच्या मनात निर्माण झाला असावा. त्यातून प्रणव मुखर्जींना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले गेले व ते त्यांनी पूर्ण विचारांती स्वीकारले. त्यांनी डॉ. हेडगेवार हे भारतमातेचे थोर सुपुत्र होते,’ हे नमूद करून आपल्या मनातील भावना स्पष्ट केल्या. त्याचबरोबर राष्ट्र, राष्ट्रभक्ती या संकल्पनांचा विस्तृत ऊहापोहही आपल्या भाषणातून केला. तो करत असताना संघ असा वागत नाही, अशी टीकाही केली नाही किंवा संघाने भावी काळात असे वागावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली नाही. एका अर्थाने गेल्या दोनशे वर्षांत जो मुख्य राष्ट्रीय प्रवाह विकसित झाला आहे, त्याचे स्वरूप त्यांनी स्पष्ट केले.
 

राष्ट्राची जडणघडण दोन पातळ्यांवर होत असते. राष्ट्रनिर्मितीची प्रेरणा हा यातील पहिला घटक असतो तर देशातील संस्थाजीवन हा राष्ट्रनिर्मितीतील दुसरा घटक असतो. ज्या देशात या दोन्ही प्रक्रिया नैसर्गिकरित्या विकसित झालेल्या असतात त्या समाजातील समाजमन दुभंगलेले नसते. पण भारतात ही प्रक्रिया स्वाभाविक झाली नाही. जसजसे इंग्रजांचे राज्य दृढमूल होऊ लागले, तसे भारतातले संस्थाजीवन अमूलाग्र पालटू लागले. पाटील, कुलकर्णी, देशमुख गेले आणि तलाठी, तहसीलदार, कलेक्टर आले, पोलीस आले, जात पंचायती गेल्या व न्यायालये आली, वकील आले, गुरुकुले गेली व शाळा, महाविद्यालये आली. जीवनातली अनिश्चितता कमी झाली व निश्चितता आली. हा केवळ संस्थात्मक बदल नव्हता तर मूल्यात्मक परिवर्तनही घडू लागले. परंपरेची जागा बुद्धीनिष्ठा घेऊ लागली. पूर्वी समाजाचा विचार करताना अभिजनकेंद्री होत असे, तो बहुजनकेंद्री होऊ लागला. यात जसे समतेचे मूल्य होते तसेच लोकशाहीमुळे त्याला व्यावहारिक किंमतही आली. निवडणुकीमुळे सामाजिक समीकरणे बदलू लागली. युरोपमध्ये वैचारिक प्रवाहाबरोबरच सामाजिक प्रवाह बदलत गेला. भारतात मात्र ब्रिटिश राज्यामुळे हे संस्थाजीवन लादले गेले. त्यामुळे त्याचा पायाच कृत्रिम राहिला. समाजाच्या स्वाभाविक राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेतून ते निर्माण न झाल्याने त्यात सक्तीच्या स्वीकाराची भावना होती, स्वाभाविक उत्स्फूर्ततेची नव्हती. भारताला स्वातंत्र्य मिळाले व भारताने राज्यघटना स्वीकारली, परंतु ही राज्यघटना ब्रिटिश परंपरेतून आलेल्या नव्या अभिजन वर्गाने तयार केली होती. त्याला भारतीय लोकमानसाचा आधार होता, असे नव्हे.

 

गेल्या किमान पाच हजार वर्षांच्या परंपरेतून भारताचे लोकमानस घडले आहे. त्यातून या लोकमानसाची एक परिभाषा निर्माण झाली आहे, एक सांस्कृतिक पर्यावरण निर्माण झाले आहे. आधुनिक मूल्ये आणि पारंपरिक मूल्ये यात सुसंगती कशी आणायची व त्यातील विसंवाद कसा दूर करायचा, असे अनेक प्रश्न या संबंधात निर्माण झाले. मुळात या परंपरेचा अर्थ कसा लावायचा असाही वाद निर्माण झाला. इथल्या समाजमानसात खोलवर रुजलेली एकात्मता जशी होती तशीच व्यवहारात आत्यंतिक विषमताही होती. देश टिकवायचा असेल तर या एकात्मभावावरच भर दिला पाहिजे, असे काहीजणांचे मत होते. विषमतेची चिकित्सा केली तर देशातील एकात्म भाव कमी होईल, अशी भीती त्यांना वाटत होती तर समाजातील विषमता दूर करणे याला प्राधान्य दिले पाहिजे, असे काही जणांना वाटत होते. जर समाजातील विषमतेचे भेदक दर्शन घडविले नाही तर या प्रश्नावर समाजातील संवेदनशीलता जागृत होणार नाही, असे काही जणांना वाटत होते. परंपरेचा सन्मान ठेवून परिवर्तन घडविले पाहिजे, असे काही जणांना वाटत होते, तर या परंपरेतूनच सर्व अनिष्ट गोष्टी आल्या आहेत. त्यामुळे तिचा त्याग केल्याशिवाय या समाजात परिवर्तन होणार नाही, यावर काही लोकांचा ठाम विश्वास होता. त्यामुळे विविध विचारसरणीच्या आधारावर वैचारिक संघर्ष निर्माण झाले, चळवळी निर्माण झाल्या. त्यातून राजकीय भूमिका तयार झाल्या.

 

भारतीय स्वातंत्र्याला ७० वर्षे होऊन गेली. ज्याला इंग्रजप्रणीत संस्था रचना म्हणून संबोधले जात होते, ती आता समाजाच्या अंगवळणी पडली आहे. किंबहुना ती इथल्या समाजव्यवस्थेचा एक स्वाभाविक भाग बनली आहे. परंतु ती निरोगी आहे, असे म्हणता येणार नाही. त्यात अनेक संकटे निर्माण झाली आहेत. त्यातील व्यावसायिक निष्ठा झपाट्याने खालावत आहे. ज्यांनी परंपरेवर अधिक भर दिला त्यांनाही आधुनिक मूल्यांचा स्वीकार करण्याशिवाय गत्यंतर नाही, असे लक्षात येऊ लागले आहे. त्याचबरोबर ज्यांनी परंपरांचा तिरस्कार केला होता, त्यातीलही काही जणांना परंपरेशी सुसंवाद साधून परिवर्तन केल्याशिवाय ते स्थायी परिवर्तन होत नाही, हे ध्यानात आले आहे. परंपरेचा सन्मान हा राष्ट्रनिर्मितीतील एक महत्त्वाचा घटक असतो हेही त्यांच्या लक्षात येऊ लागले आहे. अशाप्रकारे एक स्वाभाविक अनौपचारिक सामंजस्याचे वातावरण समाजात निर्माण होऊ लागले आहे. त्याचा परिणाम अराजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांना येत आहे.

 

याला छेद देणारे वातावरण राजकीय व प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रात आहे. समाजातील सुसंवाद वाढविण्यापेक्षा विसंवादाचे मुद्दे शोधून त्याभोवती संघर्षाचे वातावरण तयार करणे म्हणजेच खरे राजकारण व वृत्तपत्रस्वातंत्र्य असा ग्रह निर्माण झाला आहे. त्यामुळे समाजात एक कृत्रिम संघर्षाचे वातावरण निर्माण झाले आहे व प्रसारमाध्यमांतून ते अधिक मोठे करून दाखविले जात आहे. या परिस्थितीत शब्दांच्या, परिभाषेच्या पलीकडे जाऊन, मूळ हेतूंचा शोध घेण्याचा प्रयत्न होणे आवश्यक होते. संघाचा असा प्रयत्न नेहमीच राहिला आहे, परंतु प्रसारमाध्यमातून सकारात्मक प्रयत्नांपेक्षा नकारात्मक खऱ्या-खोट्या घटना, वक्तव्ये यांना प्रसिद्धी देऊन संघाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून पूर्वग्रहदूषित वातावरण निर्माण करण्यात आले. प्रणव मुखर्जींनी आपल्या उपस्थितीने याला छेद दिला.

 

असे असले तरी संघाची राष्ट्रनिर्माणाच्या प्रक्रियेतून निर्माण झालेली परिभाषा, भावविश्व व राष्ट्रजीवनातील व्यवहारात प्रस्थापित झालेली परिभाषा, भावविश्व यात अजूनही अंतर आहे. अनेक गैरसमजांचे मूळ त्यात आहे. हे दोन्ही प्रवाह एकत्र येऊ शकतात, इच्छितात याचे दर्शन उभ्या भारताला घडले व म्हणून तो राष्ट्रीय चर्चेला विषय बनला, परंतु या दोन्ही परिभाषांना, भावविश्वांना जोडणारी नवी परिभाषा, भावविश्व निर्माण होणे गरजेचे आहे. या दोन्ही नद्यांच्या प्रवाहांना जोडणारी सुप्त तिसरी नदी प्रकट होणे गरजेचे आहे.

@@AUTHORINFO_V1@@