नाशिकमध्ये आता संरक्षण संशोधन केंद्र

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jun-2018
Total Views |



नाशिक : 'संरक्षण आणि हवाई उत्पादन क्षेत्रामधील उत्पादनातील संशोधनाला चालना मिळावी या हेतूने नाशिकमध्ये संरक्षण संशोधन केंद्र अर्थात ‘डिफेन्स इनोव्हेशन हब‘ होणार,’ असे सूतोवाच केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना केले. नाशिकमध्ये ‘डिफेन्स इनोव्हेशन हब‘ स्थापन करण्यासंबंधी सर्व उपयुक्तता असल्यामुळे येथे संरक्षण व हवाई उत्पादन क्षेत्रातील संधीबाबत येत्या शुक्रवारी (दि. १५ जून) रोजी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. त्याबाबतची माहिती देताना डॉ. भामरे बोलत होते.

 

’सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चरर्स’, संरक्षण मंत्रालय, भारत सरकार आणि सी. आय. आयतर्फे शुक्रवारी येथील हॉटेल एमरॉल्ड पार्क येथे ‘संरक्षण व संरक्षण हवाई उत्पादन क्षेत्रातील उद्योगांसाठी संधी‘ या विषयावर एक दिवसीय चर्चासत्र पार पडणार आहे. केंद्र शासनतर्फे ’डिफेन्स एक्स्पो २०१८’ मध्ये ‘इनोव्हेशन फॉर डिफेन्स एक्सलन्स’ योजनेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली होती. या योजनेसाठी संरक्षण संशोधन संस्था अर्थात ‘डिफेन्स इनोव्हेशन ऑर्गनायझेशन’च्या माध्यमातून ‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर निधी उपलब्ध करून दिला जात आहे. संस्थेसाठी एच. ए. एल. व शंभर कोटी भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. यांनी अनुक्रमे शंभर कोटी आणि ५० कोटींचा निधी उभारला आहे. खासगी संस्थांनी संरक्षण भंडारविषयक तयार केलेल्या साहित्याची गुणवत्तेची हमी देण्यासाठी त्रयस्थ तपासणी एजन्सीज (आऊटसोर्सिंग ऑफ कॉलिटी अॅणश्युरन्स फंक्शन फॉर डिफेन्स स्टोअर्स मॅन्युफॅक्चर्ड बाय प्रायव्हेट इंडस्ट्रीज टू थर्ड पार्टी इन्स्पेक्शन एजन्सीज) आणि व्यापारप्राप्ती योग्य सूट प्रणाली (ट्रेड रिसिव्हेएबल्स डिस्कॉन्टिंग सिस्टीम) याचा शुभारंभ नाशिकमध्ये आयोजित चर्चासत्रात होणार आहे.

 

पत्रकारपरिषदे प्रसंगी डॉ. भामरे म्हणाले की, 'देशात संरक्षण सामुग्रीच्या उत्पादनाला चालना देत, भारताला उदयोन्मुख संरक्षण उत्पादनाचे हब बनविण्याची भूमिका केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने स्वीकारली आहे. त्याअंतर्गत महाराष्ट्रामधील नाशिकमध्ये ‘डिफेन्स हब’ होण्याची क्षमता आहे. त्यामुळेच त्याला पूरक ठरेल, असा उपक्रम पहिल्यांदाच नाशिकमध्ये राबविला जात आहे. या चर्चासत्रात नौदल, लष्कर, हवाईदल विभागाचे उच्च पदस्थ अधिकारी, टाटा, महिंद्रा, किर्लोस्कर, भारत फोर्ज या कंपन्यांचे प्रतिनिधी आणि आयुध निर्माण मंडळ, संरक्षण संशोधन व विकास प्रतिष्ठान, गुणवत्ता तपासणी विभागाचे महासंचालक, एअर कॉलिटी अॅसश्युरन्स, एच. ए. एल., जी. एस. एल. या सार्वजनिक क्षेत्रातील संस्था सहभागी होत आहेत. तसेच या चर्चासत्रात नाशिक इंडस्ट्रीज मॅनिफॅक्चरर्स असोसिएशन अर्थात निमा, अंबड इंडस्ट्रियलिस्ट मॅनिफॅक्चर असोसिएशन अर्थात आयमा, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅटग्रीकल्चर, लघु उद्योग भारती आदी संघटना सहभागी होणार आहेत.

 

संरक्षण क्षेत्राशी निगडीत वितरक विकासाच्या अनुषंगाने राबवण्यात येत असलेल्या उपक्रमातून नाशिकच्या औद्योगिक क्षेत्राला व रोजगारनिर्मितीला यातून चालना मिळेल,असेही डॉ. भामरे यांनी यावेळी सांगितले. चर्चासत्राची सुरुवात सकाळी दहा वाजता होणार आहे. यात सी. आय. आयचे पश्चिम विभागाचे अध्यक्ष पिरुझ खामबत्ता, संरक्षण मंत्रालयातर्फे सहसचिव संजय जाजू, इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चरर्सचे महासंचालक लेफ्टनंट (निवृत्त) जनरल सुब्रता साहा, भारत फोर्जचे व्यवस्थापकीय संचालक-अध्यक्ष बाबा कल्याणी, हवाई दलाचे एअर मार्शल एस. बी. देव, लष्कराचे लेफ्टनंट जनरल देवराज अनबू, राज्य शासनाचे लघु व मध्यम उद्योगाचे सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, किर्लोस्कर पंपचे प्रकल्पप्रमुख सुनील बापट हे संवाद साधतील.

 

दुपारच्या तांत्रिक सत्रात आर्टिलरी स्कूलचे रणबीर सिंग सलारिया, नौदलाचे रिअर अॅवडमिरल संजय वात्स्यायन, हवाई दलाचे एअर व्हाईस मार्शल बी. आर. कृष्णा, किर्लोस्कर न्युमॅटीक कंपनीचे अध्यक्ष राहुल किर्लोस्कर, एच. ए. एलचे मुख्य कार्यकारी अधिकारी दलजीत सिंग, महिंद्रा समूहाचे अध्यक्ष एस. पी. शुक्ला, लष्कराचे मेजर जनरल शंतनू दयाळ, नौदलाचे रिअर अॅिडमिरल राजाराम स्वामीनाथन्, हवाई दलाचे अतिविशिष्ट सेवापदक विजेते बी. के. सूद, माझगाव डॉकचे सरव्यवस्थापक डॉ. जे. एम. जहांगीर, टाटा मोटर्सचे उपाध्यक्ष व्ही. एस. नोरोन्हा आदी संवाद साधतील.

 

डॉ. प्रशांत पाटील यांचा पाठपुरावा

 

अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून नाशिकमध्ये रुग्णसेवेत असलेले डॉ. प्रशांत पाटील यांनी नाशिकच्या औद्योगिक क्षेत्राच्या विकासाला चालना मिळावी म्हणून संरक्षण विषयक उत्पादन क्षेत्रासाठी दोन वर्षांपासून पाठपुरावा केला आहे. त्याची फलनिष्पत्ती म्हणून नाशिकमध्ये हे चर्चासत्र होत आहे. यावेळी छोटेखानी प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. नाशिक आणि नगरमधील उद्योजकांना मुंबई आणि पुण्याच्या औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांच्या साखळीत एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे, असे डॉ. भामरे यांनी सांगितले.

@@AUTHORINFO_V1@@