अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांना लाच घेताना अटक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jun-2018
Total Views |



डोंबिवली : प्रशासकीय कामकाजातील भ्रष्टाचार व अनधिकृत बांधकामे प्रकरणात वारंवार चर्चेत राहिलेलेे कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी अटक केली.त्यांच्यासह दोघा लिपिकांना ही अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे गेल्या २० वर्षांत लाच प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या २७ वर पोहोचली आहे.

कडोंमपाचे वादग्रस्त अधिकारी संजय घरत यांनी अनधिकृत बांधकामावर कारवाई करू नये यासाठी संबंधितांकडे ४५ लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र, तडजोडीअंती ३५ लाख रुपये देण्याचे निश्चित ठरले. त्यापैकी पहिला आठ लाखांचा हप्‍ता घेताना ठाणे लाच लुचपत विभागाने त्यांना पकडले. बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. यामध्ये त्यांच्यासह भूषण पाटील आणि ललित आमरे या दोघांना अटक करण्यात आली आहे.

आजवर केडीएमसीमध्ये अनेक अधिकारी आणि कर्मचारी लाचखोर प्रकरणात अटक करण्यात आले आहेत. घरत यांच्या प्रकरणानंतर केडीएमसीतील भ्रष्टाचाराच्या उन्मादाचे चित्र दिसून आले.

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात वाढलेली अनधिकृत बांधकाम प्रकरणी नुकत्याच पार पडलेल्या महासभेत त्याच्या वर ठपका ठेवण्यात आला होता. त्यांना निलंबित करावे, असा ठराव महासभेत संमत करण्यात आला होता. त्यामुळे घरत अडचणीत आले होते.

वाहने आणि घरांची झडती

रात्री उशिरापर्यंत घरत यांची चौकशी लाचलुचपत विभागाच्या वतीने सुरू होती. कारवाईनंतर त्यांच्या दोन वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर एक पथक त्यांच्या डोंबिवली येथील एमआयडीसी घरी तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली.

मुख्यमंत्र्याकडे केली होती तक्रार

संजय घरत यांच्या कामातील भ्रष्टाचाराप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेसुद्धा त्यांच्या बद्दल तक्रार करण्यात आली असल्याचे कल्याणचे आ. नरेंद्र पवार यांनी सांगितले. नागपूर अधिवेशनादरम्यान ही तक्रार करण्यात आली होती.

नागरिकांनी वाटले पेढे

अतिरिक्त आयुक्त संजय घरत याला ८ लाखांची लाच घेताना अटक केल्यानंतर नागरिकांनी पेढे वाटून आपला आनंद व्यक्त केला. अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी गेल्या ११ दिवसांपासून आंदोलन करणार्‍या कल्पेश जोशी याने नागरिकांना पेढे वाटले.

@@AUTHORINFO_V1@@