श्रद्धा परमार्थाचा प्राण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jun-2018
Total Views |

 

 
 
अदृश्य, अप्रकट असणार्‍या परमात्माला शोधण्यासाठी लाखो वर्षांपासून प्रयत्न करणार्‍यांची मोठी मांदियाळी आहे.

परम + अर्थ म्हणजे परमार्थ. जगण्याला आशयघन करणं याचाही अर्थ परमार्थच नाही का? जगणं आशयघन, आशय-संपन्न करण्यासाठी एक दिशा, एक ध्येय हवं. ध्येय ठरलं की वाटचालीला प्रारंभ होतो. वाट अवघड असली, तरी पुढे पुढे चालत रहायचं. संपूर्ण विश्वाचा सृष्टीचा निर्माता कोण ते शोधून काढणं हे ध्येय. प्रत्येक गोष्ट सहजपणाने देऊन, गुप्त राहणारा निर्माता. आपलं नाव पत्ता प्रकट न करता अखंड देणारा. प्रसिद्धीसाठी वाट्टेल ते करणारे बरेच दिसतात. अशा काळात गुप्तपणाने कार्य करणारा कसा आहे, याची उत्सुकता वाटणं स्वाभाविक आहे. सगळीकडे असतो, परंतु नेत्रांनी दिसत नाही. कार्य करतो, पण समोर येत नाही. यामध्येच त्याचंं वेगळेपण व वैशिष्ट्य लक्षात येतं.

कर्म, भक्ती, ज्ञान या मार्गाने त्या चैतन्याला आकलन करण्याचा प्रयास केला जातो. ज्ञानमार्ग कठीण आहे. कर्ममार्गात कर्तेपणा जाता जात नाही. भक्तिमार्ग मात्र सामान्य माणसाला थोडा सोपा वाटतो. भगवंताचं अखंड नाम, घेता घेता त्याच्यापर्यंत जाता येतं. अनेक भक्त, संत नामसाधनेनंं परमात्म्यापर्यंत पोहोचले. यांच्या मनात प्रगाढ श्रद्धा होती की नामामधे तो आहे आणि त्याच्ी प्राप्ती नक्की होणार!

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी नामस्मरणावर भर दिला आहे. ते म्हणतात-

“जेथे नाम तेथे राम”

नामावर पक्की श्रद्धा ठेवून नामस्मरण केल्यावर जेथे नामाची अखंड धून असते, तेथे रामाला यावं लागतं. राम नामाच्या मागे ओढला जातो. आपण फक्त माळेचे मणी ओढतो. श्रद्धापूर्वक नामस्मरण झालं, की श्रीराम प्रसन्न होतो. जीवनात राम येतो, मग काम दूर जातो. सगळं लक्ष रामाकडे लागलं की श्रीराम भक्तांना भेटायला अधीर होतो. त्याला भक्ताच्या भेटीची ओढ लागते.

श्‍वासागणिक सश्रद्ध भावानं रामनाम ज्या देहात घुमत जातं, त्या देहाचं पावित्र्य वृद्धिंगत होतं. नामाची वीणा नाजूकपणाने निनादत राहते. त्या वीणेचा झंकार रामाला भावतो. कितीही कठीण प्रसंग आला, तरी नामाची वीणा वाजतच राहते. श्रद्धा किंचितही कमी होत नाही. कोणाला दोषी ठरवून, नाव ठेवला जात नाही. रामाच्या स्मरणात सदैव दंग राहिल्याने मनस्वास्थ्य बिघडत नाही. अशांत होऊन, कसंतरी जीवन जगलं जात नाही. ही सगळी श्रद्धेची कमाल आहे.

श्रद्धा असली की शंकेने मन हैराण होत नाही. राम आहेच! तो माझ्यासमवेत वावरतो, या श्रद्धाभावाने भारलेलं मन रामनामाने भारून जाणं स्वाभाविक आहे. प्रभू राम माझ्या बोटाला धरून, मला चालवतो. ज्याप्रमाणे आई मला पडू देणार नाही, सांभाळून घेऊन जाईल असा विश्वास बालकाला असतो, त्याच प्रमाणे भक्ताला श्रीरामाविषयी पक्की खात्री असते. राम मला एकटा सोडून जाणार नाही, तो मला हळूवार हातानं संकटातून तारेल. भवताली परमरमात्म्यावर श्रद्धा नसलेले वावरत असतानादेखील भक्ताची श्रद्धा डळमळीत होत नाही. भक्त श्रीरामाला परमप्रिय दैवताची पूजा करताना श्रद्धेचं घट्ट चंदन लवतो. आपल्या दैवताकडे लक्ष ठेवून असतो, त्याचं सुंदर पूजन करण्यात रंगून जातो.

‘राम रंगी रंगले, मन हे रामरंगी रंगले’

रामरंगात रंगून गेलेल्या मनावर लौकिकाचा रंग बसतच नाही. श्रद्धेचा रंग पक्का होतो. हा रामरंग इतका सुंदर असतो की इतर कोणतेही आवडत नाहीत. अशी भावावस्था अवर्णनीय आहे.

दृढ पक्क्या श्रद्धेच्या बळावर अशक्य वाटणार्‍या गोष्टी सहज शक्य होतात आशा निराशेचा क्लेषदायक खेळ थांबता. दुःख आपलं तोंड काळं करतात, संपूर्ण जगतामधील वैभव अशा भक्तांच्या ठायी नांदतं. मुक्तिदासी दारी उभ्या राहतात. रामनामाची धुंदी चढते. मग लौकिक गोष्टी शुल्लक वाटतात. प्रभू श्रीराम गवसला म्हणून आनंद गगनात मावत नाही. राम सखा, सोबती होऊन जातो. कलिकाळाचं भय संपून जातं संकल्प, विकल्प संपून जातात. जीवनाचा कलश रामरायाच्या सुगंधी जलानं भरतो. तो कधी रीता होत नाही. निर्धाराला धार चढते. भक्ताच्या जीवनात रामाचं स्थान पक्कं होऊन जातं. एका रामाच्या ठायी सगळे सुंदर अष्टसात्विक भाव गोळा होतात. श्रीराम सावळा, मेघश्याम लावण्याचा मूर्तिमंत पुतळा! त्याच्या अनुभूतीने व साक्षात्काराने त्याच्याशी नित्य-संवाद साधण्याचं भाग्य उद्याला येतं. अदृश्य असलेला परमात्मा सापडल्याचं समाधान कधी संपून जात नाही. श्रद्धेच्या बळावर हाती न लागणारा श्रीराम थेट हृदयात जाऊन बसतो. ’सहज सिंहासनीराजा रघुवीर ’श्रद्धाभावें तया पूजा उपचार’

असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. श्रद्धेचा पाया पक्का असला, की परमार्थाची इमारत कोसळण्याचा धोका नसतो. त्या इमारतीमधे परमात्मा विविध रूपांसमवेत वावरतो. ते त्याचं वस्तीस्थान होऊन जातं. अलौकिक परंतु अदृश्य असणारा परमात्म्याचे आकलन होते. त्याच्या चैतन्याचा क्षणोक्षणी प्रत्यय येतो. मग श्रद्धा अधिकाधिक घट्ट होत जाते. श्रद्धेच्या बळावर परमात्म्याची प्राप्ती होते हे नक्की.


कौमुदी गोडबोले
@@AUTHORINFO_V1@@