पगडी व्हर्सेस पागोटे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jun-2018
Total Views |
 

पुणे येथे ‘हल्लाबोल’ आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा सत्कार करण्यात आला. सत्कारप्रसंगी त्यांच्या डोक्यावर पुणेरी परंपरेनुसार पगडी घालून त्यांचा सन्मान करण्यात आला. मात्र, थोड्याच वेळात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या डोक्यावरील ही पगडी काढून व त्याऐवजी तेथे पागोटे घालत शरद पवारांनी राजकारणातील नव्या संभाव्य जातीय धु्रवीकरणाचे जे संकेत दिलेत त्याने अनेक प्रश्‍न आणि चर्चांना जन्म दिला.
 
प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियावरील या चर्चांचा धुराळा अजूनही खाली बसलेला नाही. तसेही जातीय राजकारण करण्यात पवारांचा हातखंडा आहे. कोणत्यावेळी कोणते ‘कार्ड’ वापरायचे याचे त्यांच्याइतके अचूक ज्ञान राजकारणात फार कमी नेत्यांना असेल. पवार त्यात सर्वांपेक्षा आघाडीवर आहेत. याचाच प्रत्यय देत त्यांनी छगन भुजबळांना पागोटे घालत आणि महात्मा फुले यांच्या रूपात ‘पेश’ करीत त्या समाजाची विखरू पाहणारी मते आपल्याकडे कशी वळवता येतील याचा ‘श्रीगणेशा’ या निमित्ताने केला आहे असे म्हणावयास जागा आहे.
 
तसेही २०१४ मध्ये सत्तेवरून पायउतार झाल्यापासून राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसची आघाडी आणि विशेषतः शरद पवार अत्यंत अस्वस्थ आहेत. मधल्या काळात झालेल्या निवडणुकांमध्ये आलेले अपयश आणि पक्ष सोडून गेलेले नेते-कार्यकत्यांमुळे राष्ट्रवादीच्या तंबूत बरीच अस्वस्थता पसरली होती. त्यांची हतबलता अधिकच वाढलेली दिसत होती. यातून आलेल्या निराशेतूनच पवारांनी मुख्यमंत्र्यांपासून ते पंतप्रधानांपर्यंत मिळेल त्यांच्यावर आरोपांचे आणि झोडपून काढण्याचे सत्र सुरू केले. परवाचा प्रकारही त्यातूनच घडला. भुजबळांच्या डोक्यावरील पुणेरी पगडी काढून त्याऐवजी पागोटे घालत ते यापुढे कोणती ‘संस्कृती’ स्वीकारणार आहेत याचे त्यांनी सूतोवाच केले.
 
खरेतर, पुण्यात कोणत्याही कार्यक्रमात आलेल्या मान्यवरांना ‘पुणेरी पगडी’ घालून त्यांचा सन्मान करण्यात येतो. ही झाली पुण्याची पध्दती. कोल्हापुरात ‘फेटा’ बांधला जातो तर अनेक भागात रूमाल वा टोपी घालून मान्यवरांचा सन्मान करण्याची पध्दती आहे. पगडी असो वा टोपी - ही झाली मान्यवरांचा सत्कार करण्याची रीत. मात्र यानंतर ‘राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यक्रमात पाहुण्यांच्या सन्मानासाठी यापुढे कधीही पगडी नव्हे तर ‘पागोटे’च वापरावे’ अशा त्यांनी ज्या सूचना दिल्या त्या पवारांच्या अंतर्मनातील ‘पगडी’ची भीती दर्शविणार्‍या आहेत की काय ? असे वाटते. यातून त्यांना कुणाला दूर लोटायचे आहे आणि कुणाला जवळ करायचे आहे हे स्पष्टपणे जाणवते. कारण पगडी असो, पागोटे असो वा टोपी - ही सन्मानाची प्रतीकं आहेत. मात्र दुर्दैवाने, पगडी आणि पागोटे यांना एका विशिष्ट ‘जाती’चा संदर्भ चिकटविण्यात आल्याने आणि त्याकडे आजवर त्याच दूषित दृष्टीने पाहण्यात येत असल्याने त्यातील सन्मानाची भावना राहते बाजूला आणि ‘जाती’चा संदर्भच अधिक गडद होतो. पवारांनाही हेच साधायचे होते की काय? अशी सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमातील चर्चाही पवारांच्या या कृतीबद्दल बरेच काही सांगून गेली. एक मात्र खरे की, यापुढे ‘पगडी’ व्हर्सेस ‘पागोटे’ असा सामना शरद पवार राजकारणात आणि समाजकारणातही कसे रंगवतात, हे पाहणे अत्यंत रंजक ठरणार आहे.
 
 
 
 
 
दिनेश दगडकर (९९२२९१९४४६)ो
 
@@AUTHORINFO_V1@@