घनघोर युद्ध.

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jun-2018
Total Views |

 

 
सुरुवातीलाच भीम आणि भीष्म यांची गाठ पडली, भीष्मांनी आपला संहार सुरूच ठेवला होता.

आज युद्धाचा पाचवा दिवस. कौरवांनी आपली व्यूहरचना मकरव्यूहात केली, तर युधिष्ठिराने बहिरी ससाण्याच्या आकारात. चोचीच्या जागी भीम होता. शिखंडी आणि धृष्टद्युम्न त्या पक्ष्याचे दोन डोळे होते, डोके सात्यकी, मान अर्जुन, डावा पंख द्रुपद आणि विराट तर उजवा पंख केईकेय बंधू यांनी सांभाळला होता. अभिमन्यू आणि द्रौपदीपुत्र पक्ष्याची पाठ होते आणि पंखांच्या टोकास नकुल व सहदेव होते.

 

 हे पाहून अर्जुन वेगाने त्यांना सामोरा गेला. इकडे दुर्योधन द्रोणांकडे जाऊन म्हणाला, ''मी तुमच्या आणि भीष्म पितामह यांच्या मदतीवर सर्वस्वी अवलंबून आहे. तुम्हा दोघांसमोर पांडव क्षुल्लक आहेत.” यावर द्रोण म्हणाले, ''तू मूर्ख आहेस म्हणून पांडवांच्या पराभवाची आशा धरत आहेस. ते अजिंक्य आहेत हे तुला अजून कसे कळत नाही? आम्ही दोघे कर्तव्य पार पाडण्याची शर्थ करू, पण त्याहून अधिक काही मागू नकोस.” द्रोण पांडवांच्या दिशेने निघून गेले. सात्यकी त्यांना तोंड देत होता. द्रोण व सात्यकी यांच्यात घनघोर युद्ध झाले. सात्यकीच्या मदतीला भीम आला. भीमाच्या समोर आता द्रोण भीष्म आणि शल्य आले. भीमाला मदत म्हणून अभिमन्यू आणि द्रौपदीचे पुत्र आले. शिखंडी पण भीष्मांच्या समोर आला. द्रोणांना आठवण झाली की दुर्योधनाने सुरुवातीलाच सांगितले होते शिखंडीपासून भीष्मांचे रक्षण करा, कारण शिखंडी आधी स्त्री असल्यामुळे भीष्म शिखंडी वर शस्त्र उचलणार नव्हते. म्हणून द्रोण पुढे आले. वृद्ध भीष्मांवर सगळे पांडव एकदम तुटून पडले. नेतृत्व अर्जुन करत होता. भीष्म भीमाशी लढत होते. भर दुपारची वेळ होती व वरून सूर्य आग ओकत होता. रणभूमीवर रक्तामांसाचा चिखल झाला होता. त्यातून पाय घसरत होते. सर्वत्र हत्ती, माणसे, घोडे यांचे मृतदेह विखुरले होते. अर्जुन सामोरा आला. त्याने व श्रीकृष्णाने शंख फुंकले. तो आवाज ऐकून सारेच कौरव समीप आले. दोन्ही सैन्यामध्ये घनघोर युद्ध सुरु झाले. विराटाचे बाण लागून, भीष्म जखमी झाले. त्यांनी आपली नजर विराटाकडे वळवली आणि त्याच्याशी ते लढू लागले. इकडे अश्वत्थाम्याने अर्जुनावर हल्ला चढवला. अर्जुनाने त्याच्या शौर्याची प्रशंसा केली आणि हलकेच तो बाजूला निघून गेला, कारण गुरुपुत्राबरोबर लढण्यात त्याला रस नव्हता. भीमासमोर दुर्योधन आला आणि दोघांत धुमश्चक्री सुरु झाली. भीमाने तीक्ष्ण बाण मारून, दुर्योधनाच्या छातीला जखम केली, तरी दुर्योधन त्वेषाने लढत होता. अभिमन्यू तर विळ्याने शेत कापावे तसे शत्रुसैन्य कापत होता. दुर्योधनाचा पुत्र लक्ष्मण त्याला अडवायला आला, पण त्याने त्याला गंभीर जखमी केले. कृप लक्ष्मणाला बाजूला घेऊन गेले.

 

सात्यकी कौशल्याने लढत होता. अर्जुनासारखीच सहजता, डौल आणि चापल्य त्याच्या लढाईत दिसत होते. भूरिश्रवस् हा त्याचा जुना शत्रू, सात्यकी त्याच्याशी भिडला. इकडे भीष्म व अर्जुन यांचे युद्ध सुरूच होते. कोणीही माघार घेईना. सूर्य मावळत आला होता. सर्व वीर थकलेले दिसत होते म्हणून भीष्मांनी आपले सैन्य मागे घेण्याचे ठरविले. या दुर्योधनामुळे आपल्याला आजोबांबरोबर लढावे लागत आहे म्हणून अर्जुन खूप चिडला होता.

 

युद्धाचा सहावा दिवस उजाडला. या दिवशी पांडवांनी आपल्या सैन्याची रचना मकरव्यूहात केली होती, तर कौरवांनी प्रत्युत्तर म्हणून क्रौंचव्यूह रचला. पहिली सलामी भीम आणि द्रोण यांची झाली. भीमाने द्रोणांचा सारथी मारून टाकला. तरीही द्रोणांनी लगाम हाती धरून, युद्ध सुरूच ठेवले. भीष्म आणि द्रोण यांनी संहार सुरूच ठेवला, मात्र एकाही पांडवाला इजा होऊ नये अशा रीतीने ते युद्ध खेळत होते. अर्जुनाने नकुल आणि सहदेवाच्या मदतीने दुर्योधनाच्या सेनेचा खूप संहार केला. भीमाने तर व्यूहात घुसल्यावर रथ सोडून, खाली उडी मारली आणि कित्येक सैनिक मारून टाकले. धृष्टद्युम्नाला रथात भीम दिसला नाही म्हणून तो घाबरून गेला. तोही त्याच्या शोधात व्यूहामध्ये शिरला आणि मग त्या जोडीला पाहून, कौरव सैन्यात घबराट पसरली.

 

इकडे द्रोण आणि द्रुपद यांचे युद्ध सुरु झाले. दोघेही एकमेकांचे कट्टर वैरी. द्रुपदात द्रोणांचा पराभव करण्याची ताकद नव्हती. तेवढ्यात धृष्टद्युम्नाने प्रमोहन नावाचे अस्त्र सोडले. त्याने कौरवांचे सारे जण बेशुद्ध पडत आले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून द्रोणांनी दुसरे प्रतिरोध अस्त्र सोडले. त्यामुळे दुर्योधनाचे भाऊ पुन्हा शुद्धीवर आले. भीम आज खूपच क्रोधित झाला होता. त्याने कौरव सैन्याचा प्रचंड संहार केला. सूर्य मावळायला आला, तसे दोन्ही बाजूंनी सैन्य तंबूत परतले. नेहमीप्रमाणे दुर्योधन आपले दु:ख घेऊन, भीष्मांकडे गेला आणि म्हणाला, ”तुम्ही पांडवांचा नाश केला पाहिजे. त्याशिवाय माझ्या मनाला शांती लाभणार नाही. भीष्म म्हणाले, ”तू असे बोलावेस हे योग्य नाही. मी तुला अगोदरच सांगितले होते की तुझ्यासाठी मी प्रयत्नांची शर्थ करेन. मी तर प्राण पणाला लावून लढतो आहे. मला मरण आले तरी चालेल. पण सुरुवातीलाच मी हेही स्पष्ट केले होते की मी पांडवांचे प्राण घेणार नाही, ते मला तुझ्याइतकेच प्रिय आहेत, पण मी तुला विजय मिळवून देईन. तू खूप दमला आहेस, जखमी आहेस, जा आता औषध घेऊन विश्रांती घे.” त्यांनीच दुर्योधनाला औषध दिले आणि झोपायला पाठविले.

सुरेश कुळकर्णी

@@AUTHORINFO_V1@@