नाशिकनेच आणले नावारूपाला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jun-2018
Total Views |



 

गझल गायकी ही एक अनोखी कला आहे. गायन आणि गझल गायन यात काहीसा फरक आहे. गझल लेखन आणि गायन यांची वेगळीच मजा असते. गझल एक वृत्तप्रकार आहे, त्याचप्रमाणे तो एक काव्यप्रकार व गायनप्रकारही आहे. इस्लामी संस्कृतीकडून भारतीय संगीतास मिळालेल्या देणगीत या सुगम गायनप्रकाराचा समावेश होतो.
 

प्राचीन इराणमधील (पर्शियामधील) या प्रेमगीताचा प्रकार भारतात सूफी संतांच्यामुळे रुजला. ईश्वर-भक्ताचे नाते प्रियकर-प्रेयसीमधील संबंधाच्या परिभाषेत स्पष्ट करणाऱ्या या संतांनी आपली प्रार्थनागीते गझल या काव्यप्रकारात रचली आणि त्यांना सांगीतिक आकार देताना भारतीय रागतालांचा उपयोग केला. मराठीत गझल अनेकांनी लिहिली. त्यात अमृतराय यांनी सर्वप्रथम गझल लिहिली असे सांगितले जाते. कवी माधव ज्युलियन यांचे गज्जलांजली हे पुस्तक प्रसिद्ध आहे. अलीकडच्या काळात गझल समृद्ध केली कविवर्य सुरेश भट यांनी. याच सुरेश भट यांनी मूळच्या विदर्भातील असलेल्या डॉ.ज्योत्स्ना राजोरिया (मुळच्या बानुबकोडे) यांच्यातील गझल गायिका हेरली. मुंबई येथे जावून गझल आणि अन्य गायन प्रकारात नशीब आजमावावे असे त्यांनीच ज्योत्स्ना यांना सुचविले होते. त्यातूनच मुंबई जवळ असल्याने मोठे बंधू नंदकिशोर बानुबाकोडे यांनी त्यांना नाशिकला येण्याचे आमंत्रण दिले. त्या नाशिकला आल्या आणि नाशिकने त्यांना गायिका आणि गझल गायिका अशी ओळख दिली. नाशिकने आपल्याला भरभरून दिले असे त्या अभिमानाने सांगतात.

 

डॉ.ज्योत्स्ना बानुबाकोडे यांचे वडील विदर्भातील अमरावती येथे राहत होते. वडील लाचलुचपत खात्यात नोकरीस होते. लहानपणापासून गायनाची आवड असल्याने ज्योत्स्ना यांनी तीन चार वर्षाच्या असल्यापासून गायनास प्रारंभ केला होता. इयत्ता सहावीत असताना त्यांनी प्रथम सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेतला. अमरावती रिफोर्म्स क्लब येथे त्यांनी गझल गायिली. ते वर्ष १९८८-८९ असेल. त्यानंतर त्यांनी आपले शिक्षण सुरु ठेवले होते. बीएएमएस म्हणजे आयुर्वेदातील वैद्य पदवी त्यांनी संपादन केली. त्यानंतर संगीत विषय घेवून बीए , एमए देखील केले. २००१ च्या दरम्यान त्या नाशिकला आल्या. मोठे बंधू नंदकिशोर यांच्याकडे राहू लागल्या. त्यावेळी महाकवी कालिदास कलामंदिरात त्यांनी प्रथम नाशिकमध्ये कार्यक्रम केला. त्यानंतर त्यांचा सांगीतिक प्रवास सुरु झाला तो अखंडपणे सुरु आहे. प्रारंभी त्या आणि त्यांचे बंधू संजय हे दोघे कार्यक्रम करीत असत. नाशिक परिसरात त्यांची जोडी प्रसिद्ध होती. गझल आणि अन्य गीते देखील त्या गात. नाशिकमध्ये हॉटेल गेट वे मध्ये त्यांची ओळख संगीत क्षेत्रातील मुंबई येथे राहणारे शिवनंदन राजोरिया यांच्याशी झाली आणि त्यांचे लग्न जमले. संगीत क्षेत्रात विविध वाद्ये आणि संगीत संयोजन करतानाच शिवनंदन यांनी नंतर संगीत दिग्दर्शक म्हणून देखील नाव कमाविले. पत्नीला प्रोत्साहित करून शिवनंदन यांनी आता अशा मुक्कामांवर पोहचविले आहे की आपल्या या वाटचालीचे त्यांना स्वतःलाच अप्रूप वाटते.

 

केवळ महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरातच नव्हे तर भारतातील मुंबई,दिल्ली, चेन्नई,बंगळूरू सर्व मोठ्या शहरात त्यांनी कार्यक्रम केलेले आहेत. त्या बरोबरच कॅनडा, लंडन,श्रीलंका,मोरीशास अशा अनेक देशात देखील त्यांनी कार्यक्रम केलेले आहेत. कार्यक्रम हा एक भाग झाला, त्या बरोबरच अनेक चित्रपटात देखील अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर, सुरेश जैन, अलोक,अनुप जलोटा आदींसमवेत त्यांनी गझल आणि विविध गायन अल्बममध्ये आपल्या आवाजाची झलक दाखविली आहे. अनेक चित्रपटातून देखील त्यांनी पार्श्वगायन केले आहे.

 

आता तर त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या आणि गाजत असलेल्या पाणीबाणी चित्रपटात मकरंद अनासपुरे, रविंद्र मंकणी, तेजा देवकर आदि नामवंत कसलेल्या अभिनेत्यांच्या समवेत त्यांनी भूमिका केली आहे. संगीत दिग्दर्शक अतुल दिवे यांनी निर्मिती केलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत सदानंद दळवी. डॉ.पुरुषोत्तम भापकर यांच्या संकल्पनेवर आधारित हा चित्रपट आहे. अर्थात अभिनय क्षेत्रात त्यांनी चंचुप्रवेश केला असला तरी त्यांची मूळ आवड गायन हीच असून गझल हेच त्यांचे पहिले प्रेम आहे. गझल क्षेत्रात खूप काही करण्याची त्यांची मनीषा आहे. त्यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा !

 

पद्माकर देशपांडे

@@AUTHORINFO_V1@@