जशी समस्या असते तसेच त्याचे उपायही असतात: डॉ. संजय जोशी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jun-2018
Total Views |


मुंबई: ''प्लास्टिकची समस्या ही मानवनिर्मित समस्या आहे. मात्र, जशी समस्या असते तसे त्यावर उपायदेखील असतात,” असे मत पर्यावरणतज्ज्ञ डॉ. संजय जोशी यांनी व्यक्त केले. जनकल्याण बँकेने मुंबईतील अंधेरी येथे ’प्लास्टिकमुक्त मुंबई’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जनकल्याण बँकेचे अध्यक्ष संतोष केळकर, उपसंचालक किशोर बागडे, माजी संचालक वझे, बँकेच्या संचालिका माया भाटकर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
”आपण ज्या समस्या निर्माण करतो त्यावरील उपायही आपल्याकडेच असतात. पृथ्वीला आपण ब्ल्यू प्लॅनेट असे संबोधतो. आज पाण्याचे अनेक स्त्रोत प्लास्टिकमुळे प्रदूषित झाले असल्याचीही माहिती डॉ. जोशी यांनी यावेळी दिली. तसेच त्यांनी प्लास्टिकचा पूर्वेतिहास उलगडून सांगितला. ”आज आपण पूर्णतः प्लास्टिकवर अवलंबून आहोत. प्लास्टिक हे केवळ एक दोन वर्षात नष्ट होण्यासारखे नसून संपूर्ण प्लास्टिक बंदीसाठी अजूनही १५० ते २०० वर्षांचा कालावधी लागू शकतो,” असे ते म्हणाले. ”समस्या या प्लास्टिकमुळे होत नसून आपण ज्याप्रकारे प्लास्टिकचा वापर करतो त्यामुळे होत असतात. अनेक ठिकाणी आपण प्लास्टिक असेच फेकून देतो. याचाच प्रत्यय आपल्याला पावसाळ्यातही येत असतो. पाण्यात टाकण्यात येत असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या या शेकडो वर्षे अशाच पाण्यात पडून राहतात. त्यामुळे समुद्री जीवांनाही त्याचा त्रास होत असल्याचे त्यांनी नमूद केले. खाण्यामार्फत गायी-म्हशींच्या पोटात गेलेले प्लास्टिक हे त्यांच्यासाठी तर धोकादायक असतेच त्याव्यतिरिक्त दुध पिणार्‍यांसाठीही ते धोकादायक असल्याचे सांगत त्यांनी गर्भवती महिलेने असे दूध प्यायल्यास त्याचा त्रास येणार्‍या अपत्यालाही होऊ शकतो, असे सांगितले. त्यामुळे प्लास्टिकला पर्याय शोधणे किंवा असलेल्या प्लास्टिकचा पुन्हा पुन्हा वापर करण्याचाही सल्ला त्यांनी यावेळी दिला.
जनकल्याण बँकेमार्फत दरवर्षी सीएसआरमधून अशाप्रकारचे निरनिराळे उपक्रम राबविण्यात येतात. शाळांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, आरोग्य शिबिरांचे आयोजन, वृक्षारोपण, पथनाट्यांमार्फत जनजागृती, कारगिलमधील योद्धांसाठी ५० लाखांची देणगी, जीएसटीचे मार्गदर्शन, होतकरूंना आर्थिक मदत असे अनेक उपक्रम यापूर्वी बँकेमार्फत राबविण्यात आले असल्याची माहिती बँकेचे माजी अध्यक्ष वझे यांनी दिली. तसेच या कार्यक्रमाचे औचित्य साधून जनकल्याण बँकेच्या ऑनलाईन अ‍ॅपचे अनावरण करण्यात आले. तसेच याच्या वापराबद्दल माहितीही देण्यात आली. येत्या काही दिवसांमध्ये बँकेची इंटरनेट बँकिंग ही सुविधादेखील सुरू होणार आहे. तसेच बँकेने प्लास्टिक बंदीसाठी आपले योगदान देण्याच्या हेतूने नवा उपक्रम हाती घेतला असून सर्वच कर्मचार्‍यांना ज्यूटच्या बँगांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
@@AUTHORINFO_V1@@