'पर्यावरणस्नेही’ आम्ही, राखतो पर्यावरणाचे भान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jun-2018
Total Views |

 

 
 
 
 
पर्यावरण दक्षता मंडळ ही स्वयंसेवी संस्था गेली १६ वर्षे पर्यावरण शिक्षण, संशोधन आणि जनजागृती या क्षेत्रात कार्यरत आहे.

पर्यावरण दक्षता मंडळ

विज्ञानाचा वापर माणसाने केला आणि विज्ञानाचा दुरूपयोगही माणसाने केला. त्याच्यावर अंकुश माणूस ठेवू शकत होता, पण माणसाने कायम विज्ञानाचा दुरूपयोग केला. खरं आहे ना हे की, आपण जागतिकीकरणानुसार बदलत चाललो, पण पर्यावरणासाठीची कर्तव्ये मात्र विसरत गेलो. माणुसकीचे कितीसे भान राहिले माहीत नाही, मग पर्यावरणाचे भान कसे राखणार? पर्यावरणाचे भान राखणे हा एक मोठा प्रश्‍नच आहे. या पर्यावरणाचे भान राखण्याचे काम डोंबिवलीचे पर्यावरण दक्षता मंडळ करत असते.

या संस्थेचे अध्यक्ष म्हणून डॉ. पुरुषोत्तम काळे हे काम पाहत आहेत तर डॉ. रघुनंदन आठल्ये व विद्याधर वालावलकर उपाध्यक्ष, संगीता जोशी(सचिव), डॉ. मानसी जोशी (खजिनदार), आशिष पाटील (संचालक), कविता वालावलकर, कार्यकारी सदस्य डॉ. कल्पना जोशी, डॉ. जयश्री कुलकर्णी हे काम पाहत आहेत तर डोंबिवलीत या संस्थेचे काम रूपाली शाईवाले या पाहतात.

संस्थेच्या नावातूनच सूचित होते की, संस्था पर्यावरणाच्या संवर्धनासाठी काम करते. त्यासाठी संस्था नाविन्यपूर्ण पर्यायांचा उपयोग करत असते. संस्थेच्या कामाबाबत सांगताना या संस्थेच्या रूपाली शाईवाले यांनी सांगितले की, भारतीय मूळ असलेल्या वनस्पती टिकून राहाव्या, असा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहोत. उदा. ५ जून हा दिवस ’विश्व पर्यावरण दिन’ म्हणून साजरा केला जातो. ’गो वाईल्ड फॉर लाईफ’ हा २०१६ चा ’पर्यावरण दिना’चा विषय होता. या दिनाचे औचित्य साधून पर्यावरण दक्षता मंडळ आणि रिल्युम्नी (ठए-ङणचछख) यांच्या संयुक्त विद्यमाने आणि डोंबिवली नेचर लव्हर्स यांच्या सहकार्याने पर्यावरण विषयावर आधारित शालेय मुलांनी काढलेल्या चित्रांचे आणि वाईल्ड लाईफ छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या वर्षीच्या विषयाला अनुसरून विविध वन्यजीवांची छायाचित्रे प्रदर्शनात दाखविण्यात आली, तसेच निसर्गाचे जतन आणि जपणूक या विषयावर लघुचित्रपट दाखविण्यात आले. नागरिकांनी या प्रदर्शनाला भरभरून प्रतिसाद दिला. हे प्रदर्शन डोंबिवली पूर्वेतील श्रीगणेश मंदिर संस्थान येथे भरविण्यात आले होते.

या निमित्ताने उपस्थित नागरिकांना झाडांची खास वैशिष्ट्ये सांगण्यात आली होती. नुकताच या संस्थेच्या वतीने रुंदे या गावी घेतलेल्या जमिनीवर देवराई प्रकल्प उभारण्यात येत आहे. टिटवाळ्याजवळील रुंदे गावात १९ हेक्टर क्षेत्रात हरितपट्टा उभारण्यात येणार आहे. या साठी डीएनएस बँकेच्या सभासदांना ’पालक बनून पर्यावरण जपा,’अशी जनजागृती करण्याचा या संस्थेचा मानस होता. यानुसार १ झाडासाठी १ हजार देणगी रूपाने घेऊन मंडळाच्या वतीने ६ वर्षे या वृक्षांची देखभाल केली जाणार आहे. तसेच यासाठी श्रमदान करण्याचे आवाहनही यावेळी पर्यावरणस्नेहींना करण्यात आले. या ठिकाणी काम करण्यास १२ जानेवारीपासून सुरुवात झाली असून शास्त्रोक्त पद्धतीने वृक्षारोपण केले जाणार आहे.

संस्थेतर्फे असाच एक पर्यावरणस्नेही उपक्रम राबवला जातो. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि पर्यावरण दक्षता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 'पालवी-२०१८’ हे कुंडीतील रोपांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनात विविध जातींची २०० झाडे ठेवण्यात आले असून ३० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला आहे. यात प्रामुख्याने औषधी वनस्पती, शोभिवंत फुलांची झाडे ठेवण्यात आली आहेत. येथील मुख्य आकर्षण म्हणजे २५ वर्षांच्या जुन्या वडाचे झाड बोन्साय पद्धतीने वाढविलेले झाडही या प्रदर्शनात समाविष्ट आहे. या प्रदर्शनात बदलापूर, ठाणे, कल्याण व डोंबिवलीतील नागरिकांनी आपला सहभाग नोंदविला आहे. कुंडीमधील झाडांना अशाप्रकारे पाणी घालावे, जेणेकरून इमारती व त्यांचा रंग खराब होणार नाही, याची काळजी घेण्याकरिता ड्रिप एरिगेशन सिस्टिम बसविण्यात आली आहे. तसेच आकाशकंदील कार्यशाळा आणि तत्सम उपक्रम दिवाळीच्या सुमारास भरविण्यात येतात. 'निसर्गमेळा’ या कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते. या उपक्रमात पर्यावरणाशी निगडीत दहा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. पथनाट्य स्पर्धा, वनस्पती आवाजावरून पक्षी ओळखा, कीटक ओळखा, प्लास्टिकचा पुनर्वापर करून उपयोगी वस्तू तयार करणे, निसर्ग छायाचित्रण, चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धा अशा विविध माध्यमांतून निसर्गाच्या अनेक पैलूंचे महत्त्व व त्यांच्या संवर्धनाची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या निसर्ग मेळाव्यात पक्षी, कीटक, झाडे, पाणी, माती या नैसर्गिक साधनसंपत्ती बरोबरच प्लास्टिकचा पुनर्वापर, वर्षाजल संधारण, कचरा व्यवस्थापन या पर्यावरण संवर्धनाच्या घटकांवरही प्रकाशझोत टाकण्यात आला. सर्व स्पर्धांसाठी तज्ज्ञ व मान्यवर परीक्षकांचे सहकार्य लाभले. पर्यावरण दक्षता मंडळातर्फे दुर्मीळ होणार्‍या काही प्राण्यांची प्रदर्शनी सादर करण्यात आली. सर्व स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त बक्षीस मिळविणार्‍या शाळेला निसर्गमित्र आर. एल. दुबे स्मृतिचषक देऊन सन्मानित करण्यात आले होते. पर्यावरण दक्षता मंडळ आणि ऊर्जा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहर स्वच्छता अभियानांंतर्गत प्लास्टिक निर्मूलन प्रशिक्षण कार्यशाळा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डोंबिवलीतील पर्यावरण दक्षता मंडळ आणि रोटरी क्लब ऑफ यंग डोंबिवलीतर्फे ज्ञान मंदिर विद्यासंकुलामध्ये रानभाज्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनात वनस्पतीची ओळख, औषधी गुणधर्म आणि पाककृती याविषयी माहितीही विद्यार्थी व पालकांना देण्यात आली. पावसाळी दिवसांत ग्रामीण, आदिवासी आणि दुर्गम पट्ट्यात रानभाज्या मोठ्या प्रमाणावर उगवतात. या भाज्या शहरात आणून त्यांची विक्री केली जाते. आदिवासींना त्यापासून रोजगार उपलब्ध होतो. डोंबिवलीतदेखील या रानभाज्यांना उत्तम प्रतिसाद मिळत असतो. त्यासाठी भरविलेल्या या प्रदर्शनात तब्बल ५६ रानभाज्या ठेवण्यात आल्या होत्या.

संपूर्ण मानवजातीकरिता पृथ्वी हा एकमेव ग्रह सध्या तरी उपलब्ध आहे. तेव्हा पृथ्वीला जपण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे, ही जाणीव करून देण्याकरिता २२ एप्रिल १९७० रोजी ‘वसुंधरा दिन’ याच उद्देशांकरिता ५ जून 1974 रोजी ‘जागतिक पर्यावरण दिन’, २२ मार्च १९९३ ला ‘जल दिन’ आणि २२ मे २००२ रोजी ‘जागतिक जैवविविधता दिन’ असे अनेक ‘दिन’ अस्तित्वात आले. तसे पाहता सार्वजनिक जीवनातील कुठलाही ‘दिन’ हा प्रतिकात्मकच असतो. आपापल्या वृत्तीनुसार तो साजरा केला जातो. आक्षेप येऊ नये यासाठी त्या ‘दिना’ची पूर्तता करणे, तो उरकून टाकणे, कागदी मेळ दाखवणे, प्रदर्शन भरविणे अशा विविध प्रकारे तो विशिष्ट ‘दिन’ साजरा केला जातो. तसाच तो ‘दिन’ अतिशय अर्थपूर्ण व कल्पकरित्याही साजरा करण्याचे काम ठाण्यातील व डोंबिवलीतील पर्यावरण दक्षता मंडळ सातत्याने करत आहे. ९ जुलै १९९९ साली या संस्थेची स्थापना करण्यात आली तेव्हापासून सातत्याने १९ वर्षे ही संस्था ठाण्यासह डोंबिवलीत काम करीत आहे. सातत्याने पर्यावरणावर उपयोगी कार्यक्रम राबवून नागरिकांना पर्यावरण उपयुक्त कर्तव्य बजावण्यासाठी प्रेरित करत आहे. लाईव्ह डेमो प्रोजेक्टच्या माध्यमातून कळवा येथे जनजागृती उपक्रम करणे तसेच वसुंधरा डिजिटल फिल्म लायब्ररीच्या माध्यमातून ४ .५० फिल्मचा संग्रह लोकांना दाखविण्यात येतो. 'आपलं पर्यावरण’ मासिकाच्या माध्यमातून ही जनजागृती केली जाते. मांगलोलीला निसर्गायन येथे नर्सरी चालवली जाते. जंगलातील बिया गोळा करून त्यांना रुजविण्याचे काम केले जाते.

प्लास्टिक प्रदूषणावर मात करणे, हे सध्याचे उद्दिष्ट आहे पण या मानवनिर्मित आपत्तीवर उपाय शोधण्याऐवजी आजही पळवाटा शोधल्या जातात. ते पाहून दुःख होतं. महाराष्ट्र शासनाने प्लास्टिक आणि थर्मोकोल यांच्यावर बंदी आणण्याचा कायदा केला आहे पण हे काम त्या पद्धतीत होत नसतानाही संस्था या विरोधात सातत्याने काम करत आहे. शिल्लक प्लास्टिक कचर्‍याची विल्हेवाट आणि प्लास्टिकला सर्वदूर किफायतशीर पर्याय उपलब्ध करून देणे, ही मोठीच आव्हाने आहेत. त्याकरिता खेड्यांपासून महानगरांपर्यंत सर्वांसाठी मोहीम हाती घेऊन आबालवृद्धांना त्यात सहभागी करून घ्यावे लागेल. प्रत्येक गावाच्या आणि शहराच्या आकारानुसार टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करणे गरजेचे असताना असे होताना दिसत नाही.

पर्यावरणासाठी काम करणं ही आमची जबाबदारी लक्षात घेत छोटे उपक्रम केले जातात. २० हजार विद्यार्थ्यांमार्फत ग्रीन गारबेजबाबतची माहिती देण्यात आली. ठाण्यातील रुग्णालयीन कचरा गोळा करून त्यावर काम केले जाते. त्यांच्या पर्यावरण शिक्षण प्रकल्पाची दाद महाराष्ट्र शासनाने घेतली. डॉ. विकास हजरनीस या संस्थेचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांच्या मते पर्यावरण आणि माणसाचे नाते हे माता आणि पुत्राप्रमाणे आहे. तरी माणसाला हे नाते कळायला उशीर झाला आहे.

पर्यावरण चित्रपट महोत्सव

पर्यावरणाचे ज्ञान लोकांना होण्यासाठी या संस्थेच्या वतीने ठाण्यात पर्यावरण चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रा. विद्याधर वालावलकर यांनी आपलं पर्यावरण लघु चित्रपट महोत्सवाची पार्श्वभूमी सांगितली. यानंतर जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर मिलिंद दामले यांचे ’चित्रपट रसग्रहण’ या विषयावर व्याख्यान झाले. दुपारी अरविंद सुळे यांची ’नखचित्र’ या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. यात १२ जण सहभागी होते. यात अरविंद सुळे यांनी वेगवेगळ्या वन्यप्राण्यांची चित्रे नखांनी काढायला शिकवले. त्यासाठी लागणारी आर्थिक बांधाबांधही कळव्याच्या रुग्णालयीन प्रकल्पाच्या माध्यमातून केली जाते. ठाणे महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने चालणार्‍या या प्रकल्पातून तसेच सदस्यांच्या माध्यमातून संस्था हे काम करते.

 रोशनी खोत
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@