दाल में कुछ ‘काला’ हैं!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jun-2018
Total Views |
राजकारणात प्रवेश केलेल्या रजनीकांतचा नुकताच प्रसारित झालेला चित्रपट ‘काला’ एक सखोल कारस्थान आहे. या चित्रपटाला, भीमा कोरेगावच्या पूर्वनियोजित दलित हिंसाचाराच्या तसेच मोदी-फडणवीस यांच्या सरकारांच्या पृष्ठभूमीवर पाहिले पाहिजे. ही उत्स्फूर्त निर्मिती असूच शकत नाही. एका षडयंत्रानुसार, दलितांविषयीच्या चर्चेला, काही विशिष्ट प्रतीकांच्या पृष्ठभूमीवर वारंवार दाखविण्यात आले आहे. यातील रजनीकांत आणि नाना पाटेकर हे कलावंत केवळ अभिनेते नाहीत, तर सामाजिक जाणीव असणारे जागरूक नागरिकही आहेत, हेही लक्षात घेतले पाहिजे.
 
 
या चित्रपटातील डझनावरी दृश्ये, संवाद किंवा घटना कथेचा स्वाभाविक भाग वाटत नाहीत. चातुर्याने याची पटकथा लिहिली गेली आहे. चित्रपटाची पृष्ठभूमी आशियातील सर्वात मोठी झोपडपट्‌टी असलेल्या मुंबईच्या धारावीची आहे. रजनीकांत या धारावीचा अनभिषिक्त सम्राट आहे. मूळ तामिळ परिवाराच्या तीन पिढ्या इथे एकत्र आहेत. रजनी म्हणजे काला, त्याचे चार मुलं, सुना, नातू वगैरे. शहरात राजकीय वजन असणारे नाना पाटेकर आहेत. नानाला धारावीच्या जागेवर एक संकुल उभारायचे असते आणि म्हणून घरांची पाडापाडी सुरू होते. परंतु, यामध्ये काला आल्याने पाणी फेरले जाते. पुढे या 166 मिनिटांच्या चित्रपटात रजनी आणि नाना यांच्यातील संघर्ष दाखविला आहे. मग यात आक्षेपार्ह ते काय, असा प्रश्न मनात येऊ शकतो.
 
 
आता आपण या चित्रपटातील खोडसाळ आलेखावर येऊ या. रजनी या संपूर्ण चित्रपटात काळ्या रंगाचा शानदार डिझायनर कुर्ता आणि काळी लुंगी घालून आहे. त्यांचा मेकअपही जरा काळाच आहे. हा काळिमा या कथेत दलितांचे प्रतीक आहे. नानाचे पात्र एक प्रभावी हिंदुवादी नेत्याचे आहे. त्याच्या राजकारणाचा थाट माफियाचा आहे. नाना गुन्हेगारी जगताची निर्मिती आहे. परंतु, आता सरकार त्याच्या ताकदीवर टिकून आहे. गुंडांची फौज आहे. पोलिस खाते खिशात आहे. सर्व प्रकारची शक्ती आहे. यातही काही वाईट किंवा चूक नाही. असे अनेक चित्रपट येऊन गेले आहेत.
 
 
आता थोडे सूक्ष्मतेने बघू या. धारावी वारंवार निळ्या रंगाच्या पृष्ठभूमीवर चित्रित केली आहे. बौद्ध वस्त्या जसे गौतम बुद्धाची मूर्ती, फोटो, सांचीच्या तोरणासारखी प्रतीके अनेक वेळा यात आली आहेत. खरेतर धारावी म्हणजे एक प्रकारचा लघुभारतच आहे. इथे हिंदू, मुसलमान, दुकानदार, कामगार, कारखानेवाले, ठेलेवाले, टॅक्सीवाले सर्व एकत्र राहतात. प्रत्येक राज्यातून आलेले लोक एकसाथ जगत, लढत, मरत जीवनाशी संघर्ष करीत असतात. परंतु, चित्रपटात धारावीत चैनीत राहणार्‍या ख्रिश्चन व मुसलमानांसोबत कुणी आहेत तर ते फक्त दलित! हिंदू तर खलनायक आहे. ब्राह्मण बदमाश आहे. हे नाना पाटेकरची भूमिका सांगून जाते. मनू नावाचा बिल्डर, कालासारख्यांना जमिनीवरून हुसकून लावू इच्छितो. या अन्यायाच्या मागे नाना पाटेकर आहे.
 
 
एकदा आगीत ही वस्ती जळते, तर गौतम बुद्धाची जळलेली प्रतीके चित्रपटात वारंवार दाखविण्यात आली आहेत. जयभीमचा उद्घोषही. ड्रोन शॉटस्‌मध्ये छत, भिंती, झेंडे तसेच बॅनरांचा रंग निळाच आहे. पथनाट्यातील पात्रे, त्यांचे कथानक आणि विसंगत बोल असलेली गाणी... हे सर्व कथेची सहज मागणी नसून, एका कारस्थानानुसार जोडण्यात आलेले तुकडे आहेत.
 
 
 
धारावीचा अर्थ आहे- कमीतकमी जागेत जास्तीतजास्त लोकांची गर्दी. कमीतकमी आकाशात कमीतकमी हवा आणि प्रकाश तसेच सर्वाधिक कोलाहल. सर्वात अरुंद गल्लीबोळात भयावह रहदारी. ही धारावीची वस्तुस्थिती आहे. संघर्षाची वास्तविकता आहे, लाजिरवाणे वास्तव आहे. रजनीकांत मूळ महाराष्ट्राचा आहे. खरे नाव शिवाजीराव गायकवाड. हे नाव चित्रपटात एका प्रामाणिक पोलिस हवालदाराचेही आहे, जो ते नाव, या लोकांशी संघर्ष करण्यासाठी समोर आल्यावर ओरडून जाहीरही करतो.
संवाद ऐका- या वस्तीत आम्ही सर्व एक आहोत! इथे अशरफचा भाऊ मोहन आणि गणेशचा जावई अजीज... जय भीम...! कालाच्या एका मुलाचे नाव लेनिन आहे. तो एक कॉम्रेड आहे. एका भूमाफियाच्या चकमकीत तो आपल्या आईसह मारला जातो आणि नंतर त्याच्या फोटोवर कॉम्रेड लेनिन असे लिहून येते, तेव्हा हे नाव समजते. तो जमिनीच्या संघर्षात एका कट्‌टर क्रांतिकाराच्या भूमिकेत आहे. व्यवस्थेविरुद्ध सदैव संतापलेला. हा संताप आंदोलनातून व्यक्त करण्यासाठी उतावीळ. कुठल्याही रचनात्मक पर्यायी बुद्धीचा विचार नाही. एके समयी काला जरीनाशी विवाह करत असतानाच, अचानक राष्ट्रवादी नाना पाटेकरचे पात्र वस्तीवर हल्ला करते. ही जोडी बर्‍याच वर्षांनी एकत्र आली आहे. कालाच्या घरी बुद्धाच्या मूर्ती आहेत. कुठे आंबेडकरांचे कटआऊट्‌स पण दिसतात.
 
 
पोलिस खाते पूर्णपणे नाना पाटेकरच्या खिशात आहे. वस्तीत पोलिस मनाला वाटेल ते करतात. गुंडांचा त्रास वेगळाच. घरे जाळतात. जिवाने मारण्याचा प्रयत्न करतात. नाना पाटेकर खलनायक आहे. किंग मेकरसारखे त्याचे व्यक्तिमत्त्व आहे. याच्या मदतीने सरकारे बनतात. नाना ज्या ज्या वेळी स्वत:च्या घरी दिसतो, आसपास कृष्णाची प्रतिमा दाखविली जाते. भगवा रंग, सर्वांच्या कपाळी टिळा, पात्रांच्या गळ्यात भगवे दुपट्‌टे... हे सर्व काय सूचित करतात? या प्रतीकांचा ओव्हरडोस, पात्रांच्या भूमिकांच्या बाहेर पडल्यावर मनावर सतत आघात करतो की, यांची सरकारे अशाच प्रकारे काम करतात. ती दलितांवर अन्याय करीत आहेत. त्यांचे पोलिस राक्षसी आहेत. त्यांच्यावर माफियांची पकड आहे. हे सर्व कट्‌टर दलितविरोधी आहेत. दलितांसोबत फक्त कम्युनिस्ट, एनजीओ, पथनाट्यवाले आहेत, लेनिन आहे, आंबेडकर आहेत, बुद्ध आहेत. स्पेशल इफेक्टपण, साईड इफेक्टपण... या शृंखलेत आता एक अशी परोपकारी देवदूतासारखी व्यक्तीदेखील आहे, जी स्वत: एका माफियाप्रमाणे प्रस्थापित झाली आहे.
 
चित्रपटाच्या शेवटी शेवटी नानाच्या शानदार बंगल्यावर भागवतावरचे प्रवचन सुरू असते. त्याच वेळी त्याचे गुंडे धारावीमध्ये हिंसेचे ‘महाभारत’ रचत असतात. भागवत प्रवचनकार अशा प्रसंगांना ओजस्वी वाणीत ऐकवीत असतात आणि मारहाणीच्या शॉटस्‌चे प्रवचनातील मिक्सिंग, शास्त्रांवर प्रश्न उपस्थित करण्यासाठी आहे. कळत-नकळत हे सर्व नाना पाटेकरला एक कट्‌टरपंथी हिंदू नेता सिद्ध करण्याचा प्रयत्न आहे, जो गरिबांचे हक्क हिसकावून स्वत:साठी पुण्य गोळा करण्यात लागला आहे आणि एक ब्राह्मण त्याला गीतेच्या उपदेशांमध्ये गुंतवून ठेवत आहे. इकडे रावणाच्या वधाची कथा सुरू आहे आणि तिकडे नानाचे गुंडे कालाच्या रक्ताचा घोट घेण्यासाठी वस्तीवर तुटून पडले आहेत. हे ब्राह्मण आणि दलितांमधील संघर्षाचे स्पष्ट आलेखन आहे. ज्यात, कालाच्या पेहरावावरून आणि वर्णावरून अशाच संज्ञा दिल्या आहेत. स्पष्टपणे रंगभेद! रंगावरून कुणाची जातिगत ओळख पुढे आणणे आणि तिला जाहीर करणे.
 
 
एकूण काय की, हा ताकद आणि अहंकाराचाच खेळ आहे. दलित, निळा रंग, आंदोलन, जमिनीचा हक्क, गरिबीचा संघर्ष, कॉम्रेड लेनिन, आंबेडकर, बुद्ध हे सर्व मोहरे आहेत. जो यांच्या वापरण्यात तरबेज तो इतकाच यशस्वी.
रजनीकांत आणि नाना पाटेकरने या चित्रपटात काम करण्यास संमती दिली होती तेव्हा त्यांनी केवळ आपली भूमिका आणि संवादच बघितले होते की, हा चित्रपट जसा तयार झाला आणि पडद्यावर आला, याचा त्यांना अंदाज होता? मला वाटते की त्यांना ही जाणीवही नसावी की, या चित्रपटाचे दिग्दर्शक वा क्रिएटिव्ह टीम मुळात काय निर्माण करणार आहेत?
मित्रांनो, या समीक्षेत पूर्णपणे माझे स्वत:चे विचार आहेत. कदाचित तुम्ही या चित्रपटाला मनमोहन देसाईटाईप चित्रपट समजून घरी परताल. असेही होऊ शकते की, रजनीकांतच्या मौजेच्या आणि नाना पाटेकरच्या प्रभावी भूमिकेसमोर तुम्हाला हे काही आढळणारही नाही. परंतु, माझे मन मानायला तयार नाही. हा ‘काला’ नाही, ‘दाल में काला है!’
विजय मोहन तिवारी
@@AUTHORINFO_V1@@