पुनर्वसन झालेल्यांचे भोग कायम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jun-2018
Total Views |



डोंबिवली : गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात पश्चिमेतील नागूबाई सदन इमारत खचल्याने तेथील रहिवासी रस्त्यावर आले होते. या इमारतीतील रहिवाशांचे पुनर्वसन पूर्वेतील बीएसयुपी प्रकल्पात करण्यात आले पण त्यांची अवस्था आगीतून फुफाट्यात असल्यासारखी झाली आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथील रहिवाशांचे पुनर्वसन या ठिकाणी केले होते, पण त्यांच्या या अवस्थेकडे पालकमंत्री शिंदे यांचे साफ दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे.

१९८३ मध्ये मालक भरत तुकाराम जोशी यांनी नागूबाई सदन ही तळ अधिक चार मजली इमारत उभारली होती. इमारतीमध्ये तब्बल ७२ कुटुंबे पागडी व भाडेकरारावर राहत होती. ऑक्टोबर महिन्यात इमारतीचा मागचा कॉलम खचला असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलीस आणि महापालिकेने तातडीने धाव घेऊन संपूर्ण इमारतीमधील रहिवाशांंना बाहेर काढले होते. मात्र, यानंतर सुमारे 8 दिवस या रहिवाशांनी या परिसरात तळ ठोकला होता.

दरम्यान, पालकमंत्र्यांनी पालिकेच्या कचोरे येथील बीएसयूपी प्रकल्पातील घरे भाडेतत्त्वावर येथील राहिवाशांना देऊ केली. पण त्यानंतर या रहिवाशांच्या समस्येकडे पालकमंत्र्यांनी दुर्लक्ष केले आहे.

पालिकेच्या वतीने लावण्यात येणार्‍या नोटिसा तसेच महावितरणकडून आकारण्यात येणारी वाढीव बिले अशा समस्यांनी रहिवासी बेजार झाले. तरी येथील रहिवाशांनी आपल्या जमा पुंजीतून सुमारे ४४ हजार रुपये इतके बिल भरले पण आजच्या घडीला आलेल्या बिलाची रक्कम ही लाखांच्या घरात असून ते भरण्याची अखेरची तारीख दि.१५ जून देण्यात आली आहे. तसेच हे बिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याची नोटीस बजावण्यात आली आहे. यासाठी आम्ही महावितरण तसेच महापालिका पदाधिकार्‍यांची सातत्याने भेट घेत आहोत पण आमच्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे.

सुरुवातीला आम्ही २२ कुटुंबे या ठिकाणी स्थलांतरित झालो होतो पण आता फक्त ८ उरले आहोत. तरी महापालिका आमच्यावर दया दाखवत नसल्याचे मत येथील उषा गायकवाड यांनी व्यक्त केले. दरम्यान, दि. १५ जूनला जर आमचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला तर आम्ही महावितरण कार्यालया समोर तळ ठोकणार असल्याचे पवार म्हणाले.

आम्हाला येथे फुकट राहायचे नाही पण आमची परिस्थिती बघून भाडे आकारत आम्हाला काही महिने येथे राहण्याची मुदत द्यावी, असे मत राजूबाई शेपाळ यांनी व्यक्त केले. या ठिकाणी बसविण्यात आलेला मीटर हा कॉमन युटिलिटी मीटर असल्याने हे बिल येत आहे. या मीटरवरून पथदिवे तसेच पाण्याचे पंप व रहिवाशांना उपयुक्त वीज वापरण्यात येत आहे. त्यामुळे सरासरी बिलाच्या दुपटीने बिल त्यांना येत आहे. त्यांची या ठिकाणी राहण्याची सोय ही महापालिकेने केल्याने त्यांच्याकडे लक्ष देण्याची जबाबदारी महापालिकेची असल्याची माहिती महावितरणचे गवळी यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’ला दिली.

तसेच या संदर्भात माहितीसाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या पथदिवे व विद्युत कनिष्ठ अभियंता जितेंद्र पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

@@AUTHORINFO_V1@@