‘त्या’ शाळेचा निकाल शून्य टक्के

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jun-2018
Total Views |



खानिवडे : दहावीच्या शालांत परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या निकालात वसई तालुक्यातील जूचंद्र येथील गिरीजा म्हात्रे शाळेतील मुले पास असतानाही या शाळेचा निकाल बोर्डाच्या साईटवर शून्य टक्के लागल्याचे दाखविल्याने शाळा व्यवस्थापन आणि पालकांमध्ये मोठी खळबळ उडाली. दहावीच्या परीक्षेत या शाळेतील मुलांना बोर्डाने चक्क एटीकेटी लावल्याने पालकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

 

दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या निकालात वसई तालुक्यातील अनेक शाळांचा निकाल १०० टक्के लागल्याचे दिसून येत असताना जूचंद्र येथील गिरीजा म्हात्रे शाळेचा निकाल मात्र बोर्डाच्या चुकीमुळे शून्य टक्के लागल्याचे जाहीर झाल्याने पालकांना आणि शाळा व्यवस्थापनाला मोठा धक्का लागला होता. या शाळेतील ४१ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. ते सर्व नापास असल्याचे दाखविण्यात आले आहे. यापैकी अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले मार्क्स मिळाले आहेत. ८२ टक्के मार्क्स मिळालेला मुलगाही बोर्डाच्या तांत्रिक चुकीमुळे नापास दाखविण्यात आला. मुळात शाळेत जो विषय शिकविला जात नाही, त्या विषयाबाबत हा घोळ झाल्याचे समोर आले आहे. याबाबत शाळा व्यवस्थापनाने परीक्षेपूर्वीच बोर्डाला पत्र लिहून कळविले होते. तसेच ही चूक दुरुस्त करण्यासाठी शुल्कही भरले असताना बोर्डाच्या गलथान कारभारामुळे येथील मुलांना त्यांच्या पालकांना आणि शाळा व्यवस्थापनाला नाहक त्रास सहन करावा लागला.

 

मुळात दहावीच्या मुलाला पास अथवा नापास असा रिझल्ट देण्यात येत असताना या शाळेतील विद्यार्थ्यांच्या मार्कलिस्टवर प्रमोटेड असे दाखविण्यात आले आहे तसेच काहींना बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी एटीकेटी लावल्याने शिक्षणक्षेत्रातील गलथानपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. याबाबत शाळा व्यवस्थापनाने बोर्डाशी संपर्क केला असता ही तांत्रिक चूक असल्याचे बोर्डाकडून सांगण्यात आल्याचे समजते. या सर्व बाबीत मुलांना मात्र मानसिक त्रास झाल्याचे बोलले जात आहे.

 

सदर शाळेतील एकूण ४१ विद्यार्थ्यांनी दहावीची शालांत परीक्षा दिली. फक्त एकच विद्यार्थी या परीक्षेत यश मिळवू शकला नाही. शाळेचा निकाल ९५ टक्के लागला आहे. ८२ टक्के गुण मिळवणारा विद्यार्थी शाळेचा टॉपर आहे. केवळ ग्रेड सब्जेक्ट म्हणून असलेल्या शाळेच्या वर्क एज्युकेशन विषयाचे मार्क्स न दिल्याने व तसे बोर्डाला कळवले असतानाही निकाल बोर्डाच्या साईटवर शून्य टक्के दिल्याने बोर्डाचा गलथानपणा दिसून येत आहे.

 

बोर्डाच्या तांत्रिक चुकीमुळे आमच्या शाळेची बदनामी झाली असून त्याचा फटका आमच्या प्रतिष्ठेला बसला आहे, आम्ही सर्व बाबींची पूर्तता केली असतानाही बोर्डाने त्याकडे लक्ष न दिल्याने शून्य टक्के निकाल दिला आहे. आमची सर्व मुले पास असतानाही त्यांना नापास दाखविण्यात आल्याने आम्हाला मात्र नाहक त्रास सहन करावा लागला आहे.

जनार्धन म्हात्रे, संस्थापक - अध्यक्ष, गिरिजा म्हात्रे विद्यालय

@@AUTHORINFO_V1@@