राष्ट्रीय स्वयंसेवक संघ – निःस्वार्थ सेवेचे प्रतिक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jun-2018
Total Views |

 
एक पत्रकार म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमांचे वृत्त संकलन करण्यासाठी मी अनेक प्रसंगी गेलो आहे. पण संघाबद्दल मला जास्त माहिती नाही. माजी राष्ट्रपती श्री प्रणब मुखर्जी यांच्या नागपुरातील संघाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यावरून जे वादळ माजले होते ते मला काहीसे विचित्र वाटले. हे सर्व लोक असे आहेत ज्यांनी संघाची समाजसेवेची कामे जवळून पहिली नाहीत. मी एका पत्रकाराच्या नजरेने संघाच्या निःस्वार्थ सामाजिक सेवेच्या कामांचा जवळून अनुभव घेतला आहे. आणि त्याबद्दल लिहिण्यापासून स्वतःला रोखणे मला आज कठीण झाले आहे. संघ मुस्लीम विरोधी आहे किंवा हिंदू हितैषी याबद्दल मला विशेष माहिती नाही आणि तसा अनुभव देखील नाही. पण माझ्या अनुभवाच्या आधारावर मी इतके नक्कीच सांगू शकतो कि संघ मानवता विरोधी निश्चितच नाही. २४ वर्षाच्या माझ्या पत्रकारितेच्या काळात अनेकदा अपघात किवा नैसर्गिक संकटांच्या काळात संघाच्या लोकांनी प्रसिद्धिच्या दूर राहून शांतपणे मदत कार्य केल्याचे मी स्वतः पहिले आहे. पण कोणत्याही सांप्रदायिक तणावाच्या काळात त्यांची कोणतीच भूमिका मला आढळून आली नाही. संघाला दंगा करतांना इतर पत्रकारांनी किंवा नेत्यांनी पहिले असेल तर त्याची मला कल्पना नाही. आणि हो, एक गोष्ट मी येथे स्पष्ट करू इच्छितो कि माझा संघ किंवा भाजपा यांच्याशी दूरान्वयानेही संबंध नाही. मी एक असा पत्रकार आहे ज्याने कधी संघ किंवा भाजपचे वृत्त संकलन केले नाही.
 
 
 
१० जुलै २०११. रविवार चा दिवस होता. मी कानपूरच्या एका वृत्तसंस्थेत प्रमुख बातमीदार म्हणून काम करत होतो. रविवार असल्याने कामाचा ताण नव्हता आणि मी शांतपणे बसलो होतो. एव्हढ्यात सुमारे दुपारी एकच्या दरम्यान दिल्लीच्या कार्यालयातून माझ्या संपादकांचा फोन आला. ते म्हणाले कि फतेहपुरच्या जवळ मलवा येथे मोठा रेल्वे अपघात झाला आहे. ताबडतोब तेथे जाण्याची तयारी करा. मी रेल्वेतील माझ्या सूत्रांना फोन लावून बातमी खरी असल्याची खातरजमा केली आणि त्वरित घटनास्थळी जाण्यासाठी निघालो. अपघात मलवा स्थानकापासून 10-१२ किमी अंतरावर एका निर्जन ठिकाणी झाला होता. तेथे पोहचण्यासाठी मला सुमारे ४ किमी पायी देखील चालावे लागले. तिथे जवळपास मनुष्यवस्तीचे एकही चिन्ह नव्हते. सर्वत्र शेतीची जमीन होती.
 
 
घटनास्थळी पोहचल्या बरोबर मी वृत्त संकलनाच्या कामात गढून गेलो. आणि फोन वरून दिल्लीतील कार्यालयात संपादकांना आणि डेस्कला बातमी पाठविण्याच्या कामात लागलो. रेल्वेच्या बोगीतून मृत देह बाहेर काढले जात होते. आणि जखमींना दवाखान्यात नेण्यात येत होते. ते एक भयानक दृश्य होते. कोण्या मुलाचे आई-वडील या अपघातात दुरावले होते तर कुणाचा भाऊ, कुणाचा पती, कुणाची पत्नी; कुणी रडत होते तर कुणी जखमांच्या वेदनेने विव्हळत होते. असे ते करुण दृश्य होते. डब्यांमधून प्रेते काढली जात होती आणि जवळच्या एका शेतात ठेवली जात होती. तेव्हा माझे लक्ष्य गेले कि खाकी हाफ प्यांट घातलेले काही लोक तेथे आले आणि प्रेतांवर पांढरा कपडा पांघरू लागले. इकडे प्रेत आणले कि लगेच हे खाकी चड्डी वाले लोक त्यावर पांढरा कपडा पांघरीत. कारण ती प्रेते देखील अत्यंत क्षतिग्रस्त झालेली होती. नंतर त्या मृत देहांना शवविच्छेदनासाठी दवाखान्यात पाठविण्यात येत होते.
 
 
आता मी तेथून निघून जरा बाजूला जेथे या अपघातात मृत झालेल्या व्यक्तींचे आप्तस्वकीय शोक-विलाप करीत होते तेथे आलो. तहानलेले-भुकेलेले हे लोक देवाकडे आपल्या मृत नातेवाईकांसाठी चिरशांतीची प्रार्थना करीत होते. तेव्हा मी पहिले कि काही लोक तेथे बसलेल्या प्रवाश्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना चहा, पाणी आणि बिस्किटे देत होते. माझ्या शिवाय तेथे किमान दोन डझन पत्रकार या अपघाताच्या वृत्त संकलनासाठी आले होते. त्याचवेळी एका व्यक्तीने माझ्या हातात चहाचा कप आणि दोन बिस्किटे ठेवली. सुमारे चार तासांपासून तेथे अविरत काम करणाऱ्या मला आणि माझ्यासारख्या अन्य पत्रकारांना तो चहा एखाद्या पंचतारांकित हॉटेलच्या चहापेक्षा कितीतरी पटीने चांगला वाटला होता.
 
 
आता माझ्यातल्या पत्रकाराची उत्सुकता चाळविली गेली होती. हे कोण लोक आहेत जे सर्वांना फुकटात चहा आणि बिस्किटे देत आहेत? हे काय सरकारी लोक आहेत? मी एका व्यक्तीला थांबवून विचारले, “बंधू, आपण इथे हे वाटप करीत आहात ते कुणातर्फे आणि कशासाठी करीत आहात?” ओठावर स्मितहास्य आणून ते म्हणाले “तुम्हाला जर आणखी चहा लागेल तर तिकडे पिंपळाच्या झाडाखाली या.” माझी उत्सुकता शांत करण्यासाठी मी त्यांच्या पाठोपाठ गेलो. तेथे मी एक वेगळेच दृश्य पहिले. चांगल्या घरातील सुमारे २० – २५ महिला तेथे बसून भाजी चिरत होत्या आणि कणिक मळत होत्या. जवळच चुलीवर चहाचे पातेले ठेवले होते आणि बिस्किटाची शेकडो पाकिटे पडली होती. पाण्याचा एक पिंप ठेवला होता आणि त्यातील पाणी प्लास्टिकच्या पिशव्यांत भरून लोकांना देण्यात येत होते.
 
 
कुर्ता-पायजमा घातलेले एक ज्येष्ठ कार्यकर्ते तेथे काम करण्याऱ्या महिला आणि पुरुषांना लवकर-लवकर काम पूर्ण करण्याचे निर्देश देत होते. मी त्यांच्या जवळ गेलो आणि त्यांना परिचय विचारला त्यावर त्यांनी फक्त स्मित केले. “मी म्हटले माझे नाव झफर. मी एक पत्रकार आहे. तुम्ही कोण आहात, कोणत्या संघटनेशी संबंधित आहात, तुम्ही तुमचा परिचय द्या. मी तुमच्या या निःस्वार्थ सेवेची एक बातमी करेन”. बातमीचे नाव ऐकताच ते माझ्यापासून दूर निघून गेले...आणि कोणाचेही नाव किंवा धर्म न विचारता सर्वांना चहा-पाणी, बिस्किटे देऊ लागले.
 

 
 
मी देखील गाडीतून काढण्यात येणाऱ्या मृत देहांची मोजणी, आणि बचाव कामात लागलेल्या अधिकाऱ्यांशी बोलण्यात आणि बातम्या पाठविण्याच्या कामात लागलो. रात्रीचे सुमारे १२ वाजले असावे. गाडीतून शव बाहेर काढण्याचे काम अजूनही सुरूच होते. इतक्यात तेच दुपारी भेटलेले कार्यकर्ते माझाजवळ आले आणि माझ्या हातात एक पाकीट दिले. मी विचारले, “बंधू, यात काय आहे?” ते म्हणाले “काही नाही चार पोळ्या आणि भाजी आहे. तुम्ही दुपारपासून काही न खाता बातम्या पाठवीत आहात. तुम्हाला भूक लागली असेल. काही खाऊन घ्या.” भूक तर खरोखरच लागली होती. तरी मी म्हणालो कि “ठीक आहे मी खाईन पण एका अटीवर. प्रथम तुम्ही तुमचा परिचय द्या”. ते म्हणाले “तुम्ही आश्वासन द्या कि काही छापणार नाही”. मी म्हणलो “ठीक आहे. नाही छापणार”. तेव्हा त्यांनी सांगितले कि ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आहेत आणि परस्पर सहकार्याने येथे रेल्वे अपघातातील जखमींची सेवा करण्यासाठी त्यांच्या जेवण्याची आणि चहा इत्यादीची व्यवस्था करीत आहेत.
 
 
माझ्यातला पत्रकार जागा झाला. “अरे, यावर तर खूप चांगली बातमी लिहिल्या जाऊ शकते. तुम्ही तुमचे नाव सांगा”. ते म्हणाले “मी नाव सांगणार नाही आणि तुम्ही पहिलेच आश्वासन दिले आहे कि तुम्ही याची बातमी छापणार नाही”. मी विचारले कि “या महिला इथे दिवसभर चहा-जेवण तयार करीत आहेत त्या कोण आहेत?” ते म्हणाले कि “या सर्व महिला आमच्या घरच्या आहेत”. मी विचारले कि “या गाडीतून जी प्रेते काढली जात आहेत त्यावर पांढरा कपडा तुम्ही टाकत आहात तो कुठून आला?” ते म्हणाले कि “आमच्यापैकी ज्यांचे कपड्याचे दुकान आहे त्यांनी हा कपडा निःशुल्क दिला आहे; ज्यांचे किराण्याचे दुकान आहे त्यांनी कणिक, तेल, दिले आहे. ज्यांचे ज्या-ज्या वस्तूंचे दुकान आहे त्या-त्या वस्तू त्या सर्वांनी निःस्वार्थ भावनेने आणून दिल्या आहेत”. मी विचारले, “संघ तर हिंदूंचे संघटन आहे मग इथे इतक्या लोकांमध्ये आपण कसे काम करीत आहात?” ते म्हणाले, “बंधू, आम्ही सर्व या रेल्वे अपघातात जखमी झालेल्या आणि त्यांच्या कुटुंबियांना खाण्या-पिण्याचे सामान सेवा भावनेने उपलब्ध करून देण्यासाठी आलो आहोत. कुणाचाही धर्म किंवा नाव आंम्ही विचारीत नाही. आमच्या संघटनेचे काम पिडीत लोकांची मदत करण्याचे आहे. त्यांचा धर्म आणि नाव जाणून घेण्याचे नाही”. मी म्हटले, “तुम्ही तर मृत देहांवर सुद्धा कपडा पांघरीत आहात”. ते म्हणाले कि “जो मृत देह गाडीतून बाहेर आणला जातो त्यावर पांढरा कपडा टाकणे हे आमचे काम आहे. त्या शवाचे नाव किंवा धर्म काय आहे हे जाणून घेण्याचे आमचे काम नाही आणि त्याची काही आवश्यकताही आम्हाला वाटत नाही.”
 
 
एव्हढे बोलून तो खुदाचा नेक बंदा आपले नाव न सांगता, आपली ओळख न देता शांतपणे तिथून निघून गेला. जातांना हे आश्वासन सोबत घेऊन गेला कि मी याची बातमी छापणार नाही...
 
 
मी अपघाताच्या ठिकाणी जवळ-जवळ ३६ तास होतो. आणि या लोकांना पिडीत, जखमी आणि त्यांच्या सेवेत असलेल्या अधिकारी, पत्रकार, पोलीस यांची सेवा करतांना पाहत होतो. नंतर मी सगळी वर्तमानपत्रे पहिलीत पण कोणत्याच वृत्तपत्रात या निःस्वार्थ भावनेने सेवा करणाऱ्यांचे नाव कुठेच छापलेले नव्हते.....
 
 
जफर इरशाद 
(लेखक दोन दशकाहून अधिक काळ पत्रकारितेचा
अनुभव असलेले वरिष्ठ पत्रकार आहेत.)
 
@@AUTHORINFO_V1@@