पनवेलचे पोस्ट कार्यालय पनवेलमध्येच हवे : आ. प्रशांत ठाकूर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jun-2018
Total Views |



 

पनवेल : 'पनवेल शहरातील पोस्ट ऑफिस इतरत्र स्थलांतरित न करता पनवेल शहरातच असावे,' अशी आग्रही मागणी आ. प्रशांत ठाकूर, घरकुल संघटना व ज्येष्ठ नागरिक संघटनेने केली असून या संदर्भात सोमवारी पोस्ट विभागाचे वरिष्ठ अधीक्षक अजेय सिंह यांच्यासोबत सखोल चर्चा झाली.
 

पनवेल शहर पोस्ट कार्यालय हे सन १९४२ पासून कार्यरत आहे. पोस्टाची इमारत दुरवस्थेत असल्याने पनवेल महानगरपालिकेने ती धोकादायक असल्याचे जाहीर केली असून ती कोणत्याही क्षणी पडून जीवित तसेच आर्थिक हानी होण्याची शक्यता असल्याने घरकुल संघटना, ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या सोबतीने आ. प्रशांत ठाकूर या संदर्भात गेली ९ वर्षे पोस्टाची इमारत पनवेल शहरातच अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्याबाबत प्रयत्न करीत आहेत. या अनुषंगाने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार पत्रव्यवहारही त्यांनी केला आहे. त्याचबरोबरीने २०१० साली तत्कालीन केंद्रीय मंत्री सचिन पायलट यांच्याकडेही याविषयी पाठपुरावा करण्यात आला होता.

 

या इमारतीचे मालक मुणोथ यांनी ही धोकादायक इमारत खाली करण्यासाठी व त्या बदल्यात त्यांच्या मालकीच्या पनवेल शहरातील अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्यासंदर्भात पोस्टाकडे प्रस्ताव सादर केला होता. मात्र पोस्ट खात्याकडून सकारात्मक दृष्टिकोन घेतला जात नसल्याने आ. प्रशांत ठाकूर, माजी उपनगराध्यक्ष अशोक (आबा) खेर, घरकुल संघटनेचे पदाधिकारी श्रीकांत बापट व प्रविण धोंगडे पोस्टाचे वरिष्ठ अधीक्षक अजेय सिंह यांची भेट घेऊन चर्चा केली. पनवेल शहरातील पोस्ट कार्यालयाची इमारत मोडकळीस आल्याने सदरचे कार्यालय नवीन पनवेलला स्थलांतरित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वास्तविक पाहता पनवेल शहराची लोकसंख्या एक लाखाहून अधिक आहे. त्याचबरोबरीने पनवेल येथील कार्यालयात ज्येष्ठ नागरिक, महिलावर्ग, महिला बचत गट, ठेवीदार, बचत खातेदार, अशाप्रकारचे दररोज शेकडो नागरिक आपापल्या कामानिमित्त येतात. वाढते नागरीकरण तसेच विविध प्रकल्प या अनुषंगाने पनवेलचे पोस्ट कार्यालय याच शहरात असणे गरजेचे असून नवीन पनवेलमध्ये कार्यालय स्थलांतर केले तर त्याचा आर्थिक भुर्दंड आणि नाहक त्रास विशेषतः ज्येष्ठ नागरिक व महिलावर्गाला होणार आहे. त्यामुळे आ. प्रशांत ठाकूर व शिष्टमंडळाने या संदर्भात अजेय सिंह यांच्यासोबत बैठक घेऊन त्या संदर्भात त्यांचे लक्ष वेधले.

 

काळाची गरज, वाढते नागरीकरण आणि सोयीसुविधांच्या दृष्टीने पनवेल शहराचे पोस्ट कार्यालय पनवेलमध्ये असणे गरजेचे आहे. ठेवीदार, ज्येष्ठ नागरिक व महिलावर्गाचा विचार करता पनवेलचे पोस्ट ऑफिस नवीन पनवेलला स्थलांतरित करणे गैरसोयीचे होणार आहे. त्यामुळे पोस्ट खात्याने जनतेच्या भावना लक्षात घेऊन जनतेच्या सोयीसाठी सहकार्य करावे.

आ. प्रशांत ठाकूर

 

वाढत्या लोकसंख्येचा विचार करता पनवेलचे पोस्ट कार्यालय पनवेल शहरातच असणे उचित ठरणार आहे. नवीन पनवेलमध्ये स्थलांतर झाल्यास त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकाला होणार आहे. त्यामुळे पोस्ट विभागाने याची दक्षता घेतली पाहिजे.

श्रीकांत बापट

@@AUTHORINFO_V1@@