पक्षाचे नुकसान टाळण्यासाठी गटबाजी थांबविण्याची आवश्यकता...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jun-2018
Total Views |



भिवंडी :ठाणे जिल्ह्यात भाजपची ताकद असूनही, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पक्षाचा पराभव झाला. पक्षाच्या पदाधिकार्‍यांच्या गटबाजीमुळे पक्षाचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे पक्षहितासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रयत्न करून पदवीधर मतदारसंघात विजय मिळवावा,” असे आवाहन भाजपचे ठाणे-पालघर विभागीय अध्यक्ष व खा. कपिल पाटील यांनी येथे केले.

कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप ठाणे जिल्हा ग्रामीण कार्यकारिणीची गोवेनाका येथे बैठक झाली. या बैठकीत अध्यक्षस्थानावरून खा. पाटील बोलत होते. यावेळी कोकणचे संपर्कप्रमुख व राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार निरंजन डावखरे, कोकण संघटनमंत्री सतीश धोंड, आ. किसन कथोरे, माजी खासदार जगन्नाथ पाटील, प्रदेश उपाध्यक्ष आर. सी. पाटील, जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे आदी उपस्थित होते.

ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात भाजपची मोठी ताकद आहे. मात्र, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपची पिछेहाट झाली. त्याबद्दल खा. कपिल पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. केवळ आपापसातील भांडणे व गटबाजीमुळे पक्षाचे मोठे नुकसान झाले. यापुढे अशी गटबाजी कोणी करू नये. पक्षाचे नुकसान होत आहे. पदवीधर मतदारसंघातील उमेदवार निरंजन डावखरे यांच्याबद्दल नाराजीची कार्यकर्त्यांत चर्चा होते. मात्र, नाराजी दूर सारून हा आपला उमेदवार आहे, म्हणजे मी स्वतःच उभा आहे, असे समजून प्रत्येकाने काम करावे. २०१९ च्या लोकसभेच्या दृष्टीने पदवीधर निवडणूक महत्त्वाची आहे. या निवडणुकीच्या निकालावर पुढील रणनीती अवलंबून आहे. त्यामुळे प्रत्येकाने ही निवडणूक गांभीर्याने घ्यावी, असे आवाहन खा. पाटील यांनी केले.

पदवीधर मतदारसंघात भाजपच्या कार्यकर्त्यांचे जाळे चांगले आहे. या जाळ्यावर आपल्याला निवडणूक जिंकावयाची आहे. त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत. भाजपच्या विविध संघटनांच्या प्रत्येक कार्यकर्त्याने कामाला लागावे, असे आवाहन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी यावेळी बोलताना केले.

@@AUTHORINFO_V1@@