अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती स्थिर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jun-2018
Total Views |



नवी दिल्‍ली : माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती स्थिर असल्याचे अ. भा. आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) म्हटले आहे. दरम्यान, वाजपेयी यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून देशभर प्रार्थना करण्यात येत आहे.

युरिन इन्फेक्शन आणि मूत्रपिंडाच्या त्रासामुळे वाजपेयी यांना सोमवारी सकाळी एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी त्यांचे डायलेसिसही करण्यात आले. वाजपेयी यांच्यावर औषधांचा अनुकूल परिणाम दिसून येत आहे. इन्फेक्शन कमी होईपर्यंत त्यांना रुग्णालयात ठेवण्यात येणार असल्याचे एम्सने काढलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. वाजपेयी यांना अ‍ॅण्टिबायोटिक औषध देण्यात येत असून, त्यांचे सर्व अवयव उपचारांना योग्य प्रतिसाद देत असल्याचे या पत्रकात म्हटले आहे. एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या नेतृत्वात डॉक्टरांचे पथक वाजपेयी यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहे. आज सकाळपासूनच वाजपेयी यांना भेटण्यासाठी अनेक मान्यवरांनी एम्समध्ये गर्दी केली होती. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, एमडीएमकेचे प्रमुख वायको, शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे, तसेच अनेक मंत्र्यांनी एम्समध्ये जाऊन वाजपेयी यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. वाजपेयी यांची प्रकृती ठीक असल्याचे तसेच काळजीचे कोणतेच कारण नसल्याचे केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले.

@@AUTHORINFO_V1@@