राजकीय पक्षांकडून व्यक्तीस्वातंत्र्यावर गंडांतर ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jun-2018
Total Views |
 

 
 
भारताने लोकशाही व्यवस्था स्वीकारली आहे. यात मूलभूत अधिकार प्रत्येक भारतीयांना दिले आहेत. त्यात स्वातंत्र्याचा हक्क तर घटनेचा आत्मा आहे. भारत गुलामगिरीतून मुक्त झाला आहे. घटनाकारांनी देशाला घटनेच्या माध्यमातून अनेक महत्त्वपूर्ण अधिकार दिले आहेत. त्यानुसार देशात वेठबिगारी, गुलामगिरी संपुष्टात आली आहे. एक व्यक्ती दुसर्‍या सज्ञान व्यक्तीवर आपले आचार किंवा विचार लादू शकत नाही, एवढी पवित्र घटना देशात लागू करण्यात आली आहे.
 
नुकतेच माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नागपूर येथे संघ कार्यालयात तृतीय वर्ष संघशिक्षा वर्गाच्या समारोपाला उपस्थिती दिली. प्रणवदांनी संघाच्या कार्यक्रमास जाऊ नये यासाठी देशातील सर्वात जुन्या राजकीय पक्षाने त्यांना गळ घातली. वास्तविक पाहता, देशातील सर्वोच्च पद भूषविलेल्या व्यक्तीस त्यांनी काय करावे आणि काय करु नये असे सुचविणारी कॉंग्रेस प्रणवदांच्या स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये हस्तक्षेप करत नव्हती का ? असा प्रश्‍न निर्माण होतो. कॉंग्रेस आणि रा. स्व. संघाची वैचारिक भूमिका वेगळी आहे याचा अर्थ त्यांच्या पक्षात राहिलेल्या कोणत्याही व्यक्तीने संघाच्या कार्यक्रमास उपस्थिती देणे म्हणजे देशद्रोही कृत्य असल्याचा आव काहींकडून आणण्यात आला. प्रणवदांच्या नागपूर कार्यक्रमाच्या सहभागाबद्दल टीका करण्यात आली, तर मणिशंकर अय्यरसारखा वाचाळ पाकिस्तानमध्ये जाऊन नको नको ते बडबड करतो, हे कॉंग्रेसला चालते. जर कॉंग्रेस माजी राष्ट्रपतींनी काय करु नये हे ठरवणार असेल तर देशात व्यक्तीस्वातंत्र्याच्या अधिकारावर गंडांतर येत नाही का? यामुळे देश जरी गुलामगिरीतून मुक्त झाला असला तरी राजकीय पक्षांची मानसिक गुलामगिरीची भावना अस्तित्वात असल्याचेच यातून स्पष्ट होते. अत्याचारांना विरोध करतांना केला जाणारा भेदभावसुद्धा अशाच पक्षीय मानसिक गुलामगिरीचा भाग असावा.
 
आपला देश धर्मनिरपेक्ष आहे. पण पक्षीय राजकारण हे धर्मनिरपेक्ष नाही हे वारंवार सिद्ध झाले आहे. एएमआयएमचे असदुद्दीन ओवैसी यांनी मुस्लिमांनी कॉंग्रेसवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे. कारण या पक्षाचे माजी मंत्री राहिलेले प्रणवदा यांनी रा. स्व. संघाच्या कार्यक्रमास उपस्थिती दिली. याचा अर्थ कॉंग्रेस हा पक्ष केवळ मुस्लिमांचाच हितचिंतक आहे का? मुस्लिमांना रा. स्व. संघ चालत नसेल म्हणून तो कॉंग्रेसलासुद्धा चालत नसेल आणि कॉंग्रेसचे माजी ज्येष्ठ पदाधिकारी आरएसएसच्या कार्यक्रमास गेले म्हणून मुस्लिमांनी एकत्र येवून आपली राजकीय शक्ती दाखविण्याची गरज असल्याचे ओवैसी यांनी म्हटले आहे. असे विधान करणे लोकशाहीत चालते पण संघाने हिंदुत्वाचा विचार करणे चालत नाही, हा दुटप्पीपणा नव्हे का?
 
आपण धर्मनिरपेक्ष असू तर ज्यादृष्टिने आपण संघाकडे बघतो त्याचदृष्टिने सर्वच पक्षांकडे व विचारसरणींकडे पाहायला हवे. पण तसे होत नाही. कारण आम्ही घटनेमधील तरतुदींचा वापर केवळ स्वत:च्या हितासाठी करतो आणि जेथे आपले हित नसते तेथे पळवाट शोधत असतो. जे आपले विचार मानत नाहीत त्यांना आपण विरोधक समजतो. विरोध हा वैचारिक असेल तर तोही मान्य करत येईल, परंतु एखाद्याच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावर हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करणे कितपत योग्य आहे? अत्याचारांचा निषेध करतांना जो भेदभाव केला जातो त्यातून तर हे अधिक स्पष्ट झाले आहे.
 
 
निलेश वाणी (८८८८८ ७७६१०)
 
@@AUTHORINFO_V1@@