आश्रमशाळा विद्यार्थ्यांच्या खात्यात ४७ कोटी जमा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jun-2018
Total Views |



नाशिक : आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य खरेदीसाठी देण्यात येणारी ४७ कोटींची रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली. प्रतिवर्षी शालेय साहित्य, दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या वादात सापडणाऱ्या खरेदीवर तोडगा म्हणून या साहित्याची रक्कम थेट बँक खात्यात जमा करण्याचा आदिवासी विकास विभागाचा संकल्प या शैक्षणिक वर्षांत खऱ्या अर्थाने पूर्णत्वास जाणार आहे. आधार संलग्न बँक खाती नसल्याने गतवर्षी केवळ चार प्रकल्प कार्यालयातील सर्व तर २४ प्रकल्प कार्यालयांतर्गत प्रत्येकी दोन आश्रमशाळांमध्ये ही योजना राबविणे शक्य झाले होते. पुढील काळात सर्व विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढून ते बँक खात्याशी जोडण्यात आले. यामुळे यंदा आश्रमशाळा सुरू होण्याआधीच राज्यातील ९८ हजार विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात उपरोक्त साहित्य खरेदीसाठी सुमारे ४७ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांची रक्कम वर्ग करण्याचे काम प्रगतिपथावर आहे.

 

राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या २९ प्रकल्प कार्यालयांतर्गत एकूण ५२७ शासकीय आश्रमशाळा असून त्यात सुमारे एक लाख ९१ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. हे विद्यार्थी आणि आश्रमशाळांच्या व्यवस्थेवर शासन दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते. निवास, भोजन आणि विद्यार्थ्यांच्या संपूर्ण शैक्षणिक खर्चाची जबाबदारी शासनातर्फे उचलली जाते. प्रचंड निधी खर्च होऊनही विद्यार्थी मूलभूत सुविधांपासून वंचित असतात. निकृष्ट दर्जाचे भोजन, वह्या-पुस्तके, दैनंदिन वापराच्या वस्तू वेळेवर न मिळणे, बिछाना नसल्याने फरशीवर झोपणे, वसतिगृह, आश्रमशाळेत प्राथमिक सोईसुविधांचा अभाव अशा स्थितीत त्यांना शिक्षण घ्यावे लागते. या विभागाची खरेदी प्रक्रिया वादात सापडत असल्याने त्याचा फटका नाहक विद्यार्थ्यांना सहन करावा लागत होता.

 

खरेदी प्रक्रियेतील गैरप्रकार रोखण्यासाठी मागील वर्षी शासनाने घाऊक खरेदीस मान्यता न दिल्यामुळे शैक्षणिक साहित्य, दैनंदिन गरजेच्या वस्तूंची विद्यार्थ्यांनी स्वत: खरेदी करावी म्हणून थेट त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा जमा करण्याचा निर्णय घेतला. शैक्षणिक, दैनंदिन वापराच्या १७ वस्तूंचे बाजारमूल्य लक्षात घेऊन ही रक्कम निश्चित करण्यात आली. पण, ही योजना सर्व शासकीय आश्रमशाळेत राबवता आली नव्हती. अनेक आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचे आधारकार्ड वा बँक खाती नव्हती. यामुळे २०१७-१८ या वर्षांत ही योजना चार प्रकल्प कार्यालयांतील सर्व आश्रमशाळा आणि २४ प्रकल्प कार्यालयांतील प्रत्येकी दोन आश्रमशाळांत राबविली गेली.

 

या अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात आली. उर्वरित ठिकाणी आश्रमशाळानिहाय ही रक्कम देण्यात आली. या वर्षांत (सन २०१७-२०१८) एक लाख ९१ हजार ७२९ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, दैनंदिन गरजेच्या वस्तूंसाठी एकूण १०६ कोटी रुपयांचे वितरण करण्यात आल्याचे आदिवासी विकास विभागाकडून सांगण्यात आले. मागील वर्षी राहिलेल्या त्रुटी वर्षभरात दूर करण्यात आल्या. यामुळे येत्या शैक्षणिक वर्षांत (२०१८-१९) राज्यातील ५२७ शासकीय आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात उपरोक्त वस्तू खरेदीसाठी रक्कम जमा करण्यात येणार आहे. १५ जून रोजी आश्रमशाळा सुरू होत आहे. पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांकडे उपरोक्त साहित्य असावे, यासाठी प्रत्येकाची रक्कम आधीपासून बँक खात्यात जमा केली जात आहे. दोन टप्प्यात ही रक्कम विद्यार्थ्यांना मिळणार आहे. एकूण रकमेच्या ६० टक्के प्रथम आणि वस्तू खरेदीनंतर ४० टक्के या निकषानुसार ती दिली जाईल. या शैक्षणिक वर्षांसाठी आतापर्यंत ९८ हजार विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात पहिल्या टप्प्यातील ४७ कोटी रुपये जमा करण्यात आले.

@@AUTHORINFO_V1@@