सेवाकार्याचा अहंकार नको!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jun-2018
Total Views |




पानिपत : 'सेवा देणाऱ्या लोकांनी आपल्या मनात कुठलाही अहंकार ठेवायला नको, तर मनात आपलेपणाची भावना ठेवूनच सेवाकार्य करायला हवे,' असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी येथे केले.

 

समालखा येथील पट्टीकल्याणा गावात श्री माधव जनसेवा न्यासातर्फे उभारण्यात येणाऱ्या सेवा साधना आणि ग्राम विकास केंद्राचा शिलान्यास सरसंघचालकांच्या हस्ते शनिवारी करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. जैन मुनी उपाध्याय गुपती सागर हे देखील यावेळी विशेषत्वाने उपस्थित होते. दोघांनी भूमिपूजनापूर्वी वृक्षारोपण केले. यावेळी गीता मनिषी ज्ञानानंद महाराज, गनौर आश्रमाचे रवि शाह महाराज, मडलोडा आश्रमाचे स्वामी मोलडनाथ आणि माधव जनसेवा न्यासाचे अध्यक्ष पवन जिंदलदेखील उपस्थित होते. ‘देश हमे देता है सबकुछ, हम भी तो कुछ देना सिखे,’ या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

 

यावेळी मोहनजी म्हणाले की, 'पट्टीकल्याण येथे उभारण्यात येत असलेल्या सेवा साधना आणि ग्रामविकास केंद्राबाबतची कल्पना फार आधीपासून मनात होती. आज या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. हा समाजाचा समाजासाठी चालविण्यात येणारा एक प्रकल्प आहे. हा प्रकल्प उभा करण्यासाठी येथे काम करणाऱ्या मजुरापासून प्रकल्पाची देखभाल करणाऱ्या संघाच्या अ. भा. अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांचेच योगदान आहे. गरजूंना मदतीचा हात देणे, हीच खरी सेवा आहे. सर्वसंपन्न लोकांनी समाजाला काही तरी देण्याची मानसिकता करायला हवी. मनात आपलेपणाची भावना ठेवून जे केले जाते, त्यालाच सेवा म्हटले जाते. पाश्चात्त्य संस्कृतीत सेवेला 'सर्व्हिस असे म्हटले जाते. आता आपण जेव्हा कुणाकडून सर्व्हिस (सेवा) घेत असतो, तेव्हा त्या बदल्यात आपण त्याला काही मानधन देत असतो. भारतीय संस्कृतीत मात्र सेवाकार्याची परिभाषा, केवळ देण्याची आहे, घेण्याची नाही. आपण कुणाला काही देत असतो, तेव्हा आपल्या मनात कुठल्याही प्रकारचा अहंकार नसावा. उलट, आपण असा विचार करायला हवा की, आपल्याला जे काही मिळाले, ते येथूनच मिळाले आहे आणि जे काही दिले, तेदेखील येथेच दिले.'

 

'आपल्याला मोक्ष प्राप्त करायचा असेल, तर हिमालयावर जाऊन तपस्या करावी लागते, पण आपण जर निःस्वार्थ भावाने सेवाकार्य केले, तर आपल्या हृदयातच हिमालयासारखी उंची निर्माण होत असते. त्यानंतर तपस्या करण्यासाठी आपल्याला कुठेही जाण्याची गरज भासत नाही. सर्व साधना येथेच प्राप्त होत असतात,' असे सांगताना सरसंघचालक म्हणाले की, 'सेवाकार्य करणाऱ्यांना चिंतन करण्याची आणि चिंतन करणाऱ्यांना सेवाकार्य करण्याची गरज आहे. ही संपूर्ण सृष्टी आपलीच आहे आणि या सृष्टीत राहणारा प्रत्येक प्राणी व जीव आपलाच आहे, असा अनुभव आपण करायला हवा. आपला जन्म केवळ कमविण्यासाठी नाही, तर देण्याकरिताही झाला आहे. आपण शंभर हातांनी कमवून एक हजार हातांनी वाटायला हवे.

 
पाश्चात्त्य संस्कृतीत श्रीमंतांचे चरित्र लिहिले जाते, तर भारतीय संस्कृतीत श्रीमंतांचे नव्हे, तर दान देणाऱ्या भामाशाहंचे चरित्र लिहिले गेेले आहे. पाश्चात्त्य संस्कृतीत सत्ताधाऱ्यांचे चरित्र लिहिले जाते, तर भारतीय संस्कृतीत समाजाचे मार्गदर्शन करणारे प्रभू श्रीराम, भगवान श्रीकृष्ण, महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज यांसारख्या महापुरुषांचे चरित्र लिहिले आहे. आपला जन्म केवळ जीवन जगण्यासाठी झालेला नसून, समाजाला काहीतरी देण्यासाठी झालेला आहे. यामुळेच आपण केलेले कार्य, कमावलेला पैसा आणि मिळालेला वेळ समाजहितासाठीच अर्पण करायला हवा,' असे मतही डॉ. भागवत यांनी व्यक्त केले. सरसंघचालक म्हणाले की, 'देशभरात स्वयंसेवकांच्या माध्यमातून १ लाख ७५ हजारांपेक्षा जास्त सेवाकार्य चालविण्यात येत आहेत. संघाचे स्वयंसेवक सेवाकार्य करणाऱ्या प्रकल्पांची निर्मिती करीत आहेत. पट्टीकल्याण गावात तयार होत असलेले सेवा साधना केंद्र समाजाच्या कल्याणात फार मोठी भूमिका पार पाडणार आहे.' या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री राव इंद्रजित, विधानसभाध्यक्ष कंवर पाल, संघाचे अ. भा. सहव्यवस्थाप्रमुख अनिल ओक यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@