राहुल गांधी आज भिवंडी न्यायालयात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jun-2018
Total Views |



भिवंडी : 'महात्मा गांधी यांची हत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच घडवून आणली,' असे वक्तव्य करून अडचणीत आलेले काँग्रेसचे अध्यक्ष खा. राहुल गांधी हे याप्रकरणी दाखल झालेल्या अवमान याचिकेच्या सुनावणीकरिता उद्या मंगळवार, दि. १२ जून रोजी भिवंडी न्यायालयात उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर भिवंडी न्यायालय व परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

'महात्मा गांधी यांच्या हत्येत रा. स्व. संघाचा सहभाग होता,' अशा आशयाचा आरोप राहुल गांधी यांनी दि. ६ एप्रिल, २०१४ रोजी भिवंडी येथील प्रचारसभेदरम्यान केला होता. राहुल यांच्या या वक्तव्यावर देशभरातून टीकेची झोड उठली होती. रा. स्व. संघाचे कार्यकर्ते राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात राहुल गांधी यांच्या विरोधात अवमान याचिका दाखल केली होती. या याचिकेत न्यायालयाकडून आरोपनिश्चितीसाठी राहुल गांधी यापूर्वी देखील भिवंडी न्यायालयात हजर राहिले होते. आता कुंटे यांच्या या अवमान याचिकेच्या पुढील सुनावणीसाठी राहुल १२ जून रोजी भिवंडी न्यायालयात हजर होणार आहेत. दरम्यान, रविवारी दिल्लीहून आलेल्या एनएसजी पथकाने भिवंडी न्यायालय परिसराची पाहणी करून बंदोबस्तात आराखडा तयार केला असून भिवंडी पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांच्या देखरेखीखाली न्यायालय परिसराच्या सुरक्षेसाठी शेकडो पोलीस अधिकारी, कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच, त्याची ‘रंगीत तालीम’ देखील भिवंडी न्यायालय परिसरात घेण्यात आली आहे. उद्या होणाऱ्या या सुनावणीदरम्यान राहुल गांधी यांचे वकील अॅड. नारायण अय्यर यांनी सदर सुनावणी ‘समरी ट्रायल बेस’वर न घेता ‘समन्स ट्रायल’वर घ्यावी, अशी मागणी केली असून, या दाखल केलेल्या अर्जावरसुद्धा सुनावणी होणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@