...तर भाजपचा १०० टक्के पराभव : शरद पवार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jun-2018
Total Views |

राष्ट्रवादीच्या २० वा वर्धापनदिन सोहळ्यात व्यक्त केले मत

देशाला नवा पर्याय उपलब्ध करून देण्याची गरज  



पुणे : 'केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारने सामान्य नागरिकांचे जगणे मुश्कील केले असून या संकटातून बाहेर पडण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे देशातील सर्व समविचारी लोकांनी एकत्र येऊन जनतेला एक नवीन पर्याय उपलब्ध करून दिला तर भाजपचा १०० टक्के पराभव होईल,' असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. पुण्यातील सहकारनगर येथील शिंदे हायस्कूल मैदानावर आयोजित राष्ट्रवादीच्या २० व्या वर्धापनदिन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी छगन भुजबळांसह राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते.

'गेल्या चार वर्षांमध्ये केंद्र सरकारने दिलेले एक आश्वासन पाळलेले नाही. मोदींच्या धोरणांमुळे देशातील विद्यार्थ्यापासून ते सामान्य शेतकऱ्यांपर्यंत सर्व जण त्रस्त झाले आहेत. त्यामुळे देशाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी म्हणून सर्व समविचारी नेत्यांना एकत्र आणण्यासाठी म्हणून मी स्वतः प्रयत्न करत आहे. नागरिकांच्या भल्यासाठी सर्व नेते देखिल आता तयार झाले आहेत. त्यामुळे आता नागरिकांनी जर सर्व राजकीय पक्षांना आपला पाठींबा दिला तर भाजपचा पराभव कोणीही रोखू शकणार नाही' असा विश्वास पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

शिवसेनाला देखील नव्या आघाडीत सामील होण्याचे संकेत

दरम्यान भाजपविरोधात उभारण्यात येत असलेल्या तिसऱ्या आघाडीमध्ये शिवसेनाला देखील सामील होण्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले. यावर बोलताना त्यांनी राज्यात नुकत्याच झालेल्या पोटनिवडणूकांचा दाखला देत पालघरमध्ये शिवसेना, कॉंग्रेस आणि बहुजन महासंघ यांच्या मतांची बेरीज केली, तर भाजपचा पराभव हा झाला असता, असे त्यांनी म्हटले. तसेच पालघरमध्ये इव्हीएममुळे भाजप निवडून आले असून भाजपचे यश हे खरे नसल्याचे देखील त्यांनी म्हटले.


पुणेरी नव्हे तर फुलेंची पगडी देऊन सत्कार करा

दरम्यान आपल्या भाषणाच्या सुरुवातीला पवार यांनी पुणेरी पगडी देऊन करण्यात येणाऱ्या सत्कारावर आक्षेप घेतला. यापुढे राष्ट्रवादीच्या कोणत्याही कार्यकर्त्याचा अथवा नेत्याचा सत्कार जर करायचा असेल तर तो पुणेरी पगडीने न करता महात्मा फुले यांच्या पगडीने करावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच स्वतः आणलेली एक फुले पगडी देखील त्यांनी भुजबळ यांना घातली.
@@AUTHORINFO_V1@@