पर्यावरणाची जपणूक करण्यावाचून आपली सुटका नाही - राहुल दामले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jun-2018
Total Views |



डोंबिवली: झाडांची सततची होणारी तोड व वाढते नागरिकीकरण यामुळे पर्यावरणाचा र्‍हास होत आहे. याचा फटका आपल्याला सातत्याने बसत आहे. यात 3 वर्षांपूर्वी पडलेला दुष्काळ व इतर घटनांनी पर्यावरणाचा कोप जाणवत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत आता पर्यावरणाची जपणूक करण्यापासून आपली सुटका नाही, असे मत गणपती मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा केडीएमसीचे स्थायी समिती सभापती राहुल दामले यांनी व्यक्त केले. पर्यावरण दक्षता मंडळ, श्री गणेश मंदिर संस्थान व डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वृक्ष दत्तक कार्यक्रम पार पडला.

पूर्वेतील गणेश मंदिर संस्थेच्या वक्रतुंड सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात दामले यांच्यासह पर्यावरण दक्षता मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. विकास हजरनीस,अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम काळे, सचिव संगीता जोशी, डोंबिवली नागरी सहकारी बँकेचे जयंत पित्रे व पर्यावरण दक्षता मंडळाच्या डोंबिवलीच्या रुपाली शाईवाले उपस्थित होत्या.

या कार्यक्रमात पर्यावरण दक्षता मंडळाने रुंदे या गावी घेतलेल्या जमिनीवर चालणार्‍या देवराई प्रकल्पाबाबत माहिती देण्यात आली. टिटवाळ्याजवळील रुंदे गावात १९ हेक्टर क्षेत्रात हरितपट्टा उभारण्यात येणार आहे. यासाठी डीएनएस बँकेच्या सभासदांना पालक बनून पर्यावरण जपा, अशी जनजागृती करण्याचा या संस्थेचा मानस होता. यानुसार 1 झाडासाठी 1 हजार देणगी रूपाने घेऊन मंडळाच्या वतीने ६ वर्षे या वृक्षांची देखभाल केली जाणार आहे. तसेच यासाठी श्रमदान करण्याचे आवाहनही यावेळी पर्यावरणस्नेहींना करण्यात आले. या ठिकाणी काम करण्यास १२ जानेवारीपासून सुरुवात झाली असून शास्त्रोक्त पद्धतीने वृक्षारोपण या ठिकाणी केले जाते.

यावेळी डॉ. हजरनीस यांनी, पर्यावरणस्नेहीबरोबर जनसामान्यांनीही पर्यावरण जोपासणे गरजेचे आहे. त्यामुळे आपण प्रत्येकाने अशा विविध प्रकल्पांत सहभागी होण्याचे आवाहन केले . तसेच पर्यावरणाला माणसाची गरज नाही. माणसाला पर्यावरणाची गरज आहे त्यामुळे त्याला जोपासण्यासाठी माणसाने प्रयत्न करायला हवा, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

पर्यावरणाचा होणारा र्‍हास रोखण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिका प्रयत्न करत आहे, पण या कामासाठी लागणार्‍या उपकरणासाठी केडीएमसीकडून मदत केली जाईल, असे आश्वासनही यावेळी सभापती दामले यांनी दिले तसेच मंडळाच्या या अभिनव प्रकल्पाला देणगी देत दामले यांनी काही झाडांचे पालकत्वही स्वीकारले.

@@AUTHORINFO_V1@@