शिवसेना भवनाजवळ झाड कोसळून ४ नागरिक जखमी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jun-2018
Total Views |

 
मुंबई :  राज्यात सर्वत्र मान्सून दाखल झाल्याने सर्वत्र पावसाच्या धारा लागल्या आहेत. पाऊल जितका आल्हाददायक वाटतो, तितकाच तो त्रासदायकही होतो जेव्हा त्यामुळे अपघात घडतात. असाच एक अपघात घडला आहे मुंबईच्या दादर भागात. दादर येथे शिवसेना भवनाजवळ मुसळधार पावसाने एक झाड कोसळल्याने ४ जण जखमी झाले आहेत. आज सकाळी ८ वाजता ही घटना घडली. जखमी झालेल्या नागरिकांमध्ये एका युवतीचा देखील समावेश आहे.
 
गेल्या २ दिवसांपासून राज्याची राजधानी मुंबई येथे मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे आज सकाळी दादर येथील शिवसेना भवन परिसरात एक झाड उन्मळून पडले. त्यावेळी रस्त्याच्याकडेवरून जाणारे ४ नागरिक जखमी झाले. यामधील युवती गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
झाड कोसळल्याया घटनेची माहिती तत्काळ दादर पोलीस आणि अग्निशामक दलास कळविण्यात आली. त्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी आणि स्थानिकांनी या चौघांना बाहेर काढले. या सर्व जखमींना पोलिसांनी हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या ३ जखमी पुरुषांना प्राथमिक उपचार करून सोडून देण्यात आले आहे.
श्रेया राऊत (वय २०) असे गंभीर जखमी झालेल्या तरूणीचे नाव असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 
पावसाळ्यात मुंबईत झाड कोसळण्याच्या घटनामध्ये वाढ होत आहे. गेल्या चार दिवसात जोरदार वारा आणि पाऊस सुरूच आहे. त्यामुळे झाड कोसळण्याच्या घटना अनेक ठिकाणी झाल्या. शुक्रवारी रात्रीही गोरेगाव येथे झाड अंगावर कोसळून १ जण जखमी झाल्याची घटना घडली होती.
@@AUTHORINFO_V1@@