अॅक्ट ईस्ट पॉलिसीमध्ये सिंगापूर हा भारताच्या सर्वात महत्त्वाचा सहकारी : पंतप्रधान मोदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jun-2018
Total Views |


सिंगापूर :
'भारत आणि सिंगापूर यांची मैत्री अत्यंत दृढ असून भारताच्या अॅक्ट ईस्ट पॉलिसीमध्ये सिंगापूर हा भारताच्या अत्यंत महत्त्वाचा सहकारी आहे' अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिली आहे. सिंगापूर दौऱ्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी सिंगापूरचे पंतप्रधान ली सीन लुंग यांच्यासह झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये आज बोलत होते.

'सिंगापूर हा पूर्व आशियाई देशांच्या अगदी मध्यभागी वसलेला असल्यामुळे आशियाई देशांमधील त्याचे महत्त्व अधिक आहे. त्यातच भारत आणि सिंगापूर यांच्यातील अनेक वर्षांच्या दृढ संबंधांमुळे दोन्ही देश अत्यंत जवळ आलेले आहे. भारत आणि सिंगापूर यांनी अनेक क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्य वाढवले आहे. भविष्यात देखील हे संबंध अधिक होणार असून याचा दोन्ही देशांबरोबर आशियाई खंडातील सर्व देशांना याचा फायदा होणार असल्याचे मोदींनी यावेळी म्हटले.

याचबरोबर आपल्या द्वीपक्षीय चर्चेदरम्यान दोन्ही देशांमधील व्यापार, संस्कृती, विज्ञान तंत्रज्ञानाची देवाणघेवाण आणि सागरी सुरक्षा या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली असल्याचे मोदींनी यावेळी सांगितले. सध्या भारत आणि सिंगापूर यांच्यासाठी सायबर सुरक्षा आणि सागरी सुरक्षा हे दोन अत्यंत महत्त्वाचे मुद्दे बनलेले आहेत. त्यामुळे दोन्ही देशांनी यावर व्यापक चर्चा केली असून आपल्या सायबर आणि सागरी सीमांच्या सुरक्षेसाठी मिळून प्रयत्न करणार असल्याचे मोदींनी यावेळी सांगितले. तसेच आज संध्याकाळी होणाऱ्या शांघरीला डायलॉगमध्ये आपण हेच मुद्दे आणि त्यासंबंधी भारताचा दृष्टीकोन याविषयी आपले मत मांडणार असल्याचे पंतप्रधान यांनी यावेळी सांगितले.

सिंगापूर पंतप्रधान ली यांनी देखील पंतप्रधान मोदी यांचे या दौऱ्यासाठी आभार मानले. भारत आणि सिंगापूर यांच्या संबंधांमध्ये सातत्याने होत असलेल्या विकासाबद्दल त्यांनी आपले मत मांडत, भारताची मैत्री ही सिंगापूरसाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. तसेच शांघरीला डायलॉगमध्ये सहभागी होण्यासाठी म्हणून मोदी यांनी सिंगापूरचे आमंत्रण स्वीकारल्याबद्दल त्यांनी पंतप्रधानांचे आभार व्यक्त केले व शांघरीला डायलॉगमध्ये भाषण देणारे पंतप्रधान मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरणार असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.
@@AUTHORINFO_V1@@