FARZAND Film Review : मराठीसाठी नक्कीच प्रशंसनीय, पण...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

 
ऐतिसाहिक चित्रपट आणि मराठी चित्रसृष्टीचं फार घनिष्ट नातं असल्याचं चित्र आजपर्यंत कधीही ठळक झालं नाही. सुरुवातीच्या काळात भालजींनी इतिहासावर विशेषतः शिवाजी महाराजांवर चित्रपट बनविला होता. पण त्यानंतर फार कोणी इतिहासाकडे गांभीर्याने बघितल्याचे दिसत नाही. प्रेम, संसार, सासू-सून, विनोद यामध्येच गुंतलेला मराठी सिनेमा 'श्वास' नंतर थोडाफार वेगळ्या वळणावर विचार करू लागला. अशातच या आठवड्यात 'फर्जंद' प्रदर्शित झालाय. सामान्यतः किल्ले पन्हाळा म्हणालं की इतिहासाने सांगितलेली बाजी पासलकरांची गोष्ट चटकन डोळ्यासमोर येते आणि कोंडाजी फर्जंद नाव घेतलं की त्यांची जंजिऱ्यावरची चढाई आठवते. पण फर्जंद हा चित्रपट या दोन्ही पेक्षा एक वेगळा इतिहास आपल्यासमोर मांडतो आणि तो म्हणजे पन्हाळा गड काबीज करण्याचा...
 
नुकतीच तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा जिंकलेला आहे. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची तयारी जोरात चालू आहे. पण या सगळ्यात अजूनही महाराजांच्या मनात एक सल कायम आहे आणि ती म्हणजे पन्हाळा गड जिंकण्याची! यासाठी मग कोंडाजी फर्जंद या वाघाची निवड केली जाते. आणि कोंडाजी अवघ्या ६० मावळ्यांच्या साथीने हा गड काबीज करायला निघतो. आता इथून पुढे त्यांचा प्रवास कसा होतो, त्यांचे म्होरके कोण असतात त्यांच्या खुबी काय असतात, दुसरी कडे प्रतिस्पर्धी गटात काय खलबतं चालू असतात या सगळ्याची मांडणी आपल्याला फर्जंद मधून बघायला मिळते. या कथेचा शेवट काय होणार हे माहित असूनही प्रेक्षक काही प्रमाणात त्यात गुंतत जातो हे या चित्रपटाचे खरे यश म्हणावे लागेल.
 
सगळ्यात आधी बऱ्याच वर्षांनंतर मराठी रसिकांना एक ऐतिहासिक चित्रपट दाखविल्याबद्दल दिग्दर्शक दिगपाल लांजेकर याचे कौतुकच करायला हवे. चित्रपटातील काही संवाद, काही प्रसंग नक्कीच प्रेक्षकांना अभिमानास्पद वाटतात. एका प्रसंगात केसर नावाची तमाशगीर महाराजांना भेटायला येते व त्यांना म्हणते 'मला तुमची सेवा करण्याची इच्छा आहे.'' त्यावर महाराज खूप संयमाने उत्तरात, ''आई, तू चुकीच्या ठिकाणी आली आहेस.'' या संवादामुळे महाराजांप्रतीचा आदर कैकपटीने वाढल्याशिवाय राहत नाही. असेच काही उर भरून आणणारे संवाद, प्रसंग 'फर्जंद' मध्ये आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट या चित्रपटातील कलाकार यामध्ये डझनभर कलाकार असे आहेत की त्या प्रत्येकाने आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. या सगळ्यातही चिन्मय मांडलेकर, प्रसाद ओक, प्रवीण तरडे व मृण्मयी देशपांडे यांचं काम उठावदार झालं आहे. अंकित मोहनला कोंडाजींच्या मुख्य भूमिकेत ट्रेलरमध्ये बघून थोडी शंका निर्माण झाली होती, पण संपूर्ण चित्रपटात एक-दोन प्रसंग सोडले तर अमराठी अंकित चांगल्या प्रकारे वावरला आहे. विशेष म्हणजे त्याच्या शरीरयष्टीचा 'फर्जंद' सारख्या ऍक्शनपटाला अधिक फायदा झाला आहे.
 
 
 
चित्रपट ऐतिहासिक असल्याने त्यासंबंधी येणाऱ्या प्रत्येक जागेवर जाऊन चित्रण करणं दिग्दर्शकाला अवघड गेलं असतं. त्यामुळेच कदाचित या चित्रपटात अनेक ठिकाणी 'व्हीएफएक्स'चा वापर करण्यात आला आहे. ही देखील मराठीसाठी कौतुकास्पदच बाब होती. पण आपण आजमितीला हॉलिवूड आणि बॉलिवूडचे 'व्हीएफएक्स'चा वापर केलेले अनेक चित्रपट पहिले असल्याने त्यातुलनेत 'फर्जंद' फारच मागे असल्याचे जाणवते. काही प्रसंगात 'व्हीएफएक्स' गडबडल्याचे प्रकर्षाने दिसून येते. दुसरी गोष्ट चित्रपटाची एकूण लांबी आणखी कमी करायला पाहिजे होती असं वाटतं. मोहीम फत्ते करण्यासाठी जे काही सरावाचे प्रसंग दाखवले आहेत त्यामुळे चित्रपट थोडा ताणल्यासारखा वाटतो. त्याचबरोबर सुरुवातीला कोंडाजींच्या व्यक्तिरेखेबद्दल थोडं अधिक दाखवणे गरजेचे वाटले. एका वाक्यात महाराजांनी करून दिलेली त्यांची ओळख ही पुरेशी वाटत नाही. गणोजी किंवा गुंडोजी यांना शोधून आणण्यात घालवलेला वेळ कोंडाजींच्या व्यक्तिरेखेची ओळख करून देण्यात घालवणे अपेक्षित होते.
 
ऐतिहासिक चित्रपट असल्याने दिग्दर्शकाने त्याचा सखोल अभ्यास नक्कीच केला असणार यात शंका नाही. पण त्यातही अखेरच्या काही प्रसंगांमुळे खरंच असं घडलं असेल का असा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहात नाही. अगदीच स्पष्ट बोलायचे झाल्यास पन्हाळ्याच्या लढाईत शेवटच्या टप्प्यात शिवाजी महाराज स्वतः सामील झाले होते का? आणि खरंच झाले असतील तर मग या लढाईची जबाबदारी कोंडाजींच्या खांद्यावर देण्याचे मनसुबे काय होते? असे प्रश्न पडतात. शिवाय इतर चित्रपटांप्रमाणेच शेवटी खूप जास्त 'मेलोड्रामा' दाखवलेला आहे. त्यामध्ये 'रिऍलिटी'ला जास्त प्राधान्य देणे गरजेचे होते. एकूणच 'फर्जंद' हा चित्रपट मराठीसाठी नक्कीच प्रशंसनीय प्रयोग आहे. पण सध्याच्या २०१८ चा विचार करता अधिक चांगली मांडणी करून आणखी उत्तम 'व्हीएफएक्स'च्या आधारे या चित्रपटाला सर्वोत्तम बनवता आले असते.
----
फर्जंद
दर्जा : तीन स्टार
-----
@@AUTHORINFO_V1@@