तरुणांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांच्या देवाणघेवाणासाठी सिनोलॅब महत्त्वाची

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jun-2018
Total Views |

परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यांचे प्रतिपादन
विद्यापीठातील ‘सोशल इनोव्हेशन लॅब’चे उद्घाटन
 

 
 
 
पुणे : “इनोव्हेशन ही फक्त कल्पना नाही, तर आधुनिक काळात आपल्याला दिशा देणारे माध्यम आहे. आताच्या काळात होणारे सर्व बदल हे इनोव्हेशनचाच भाग आहेत. सोशल इनोव्हेशन सेंटरमध्ये तरुणांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांची (इनोव्हेटिव्ह आयडियाज्) देवाणघेवाण होऊन पुढील महत्त्वाची दिशा उद्योजकतेला मिळेल. त्यामुळे ही सिनोलॅब पुढील काळात महत्त्वाची ठरेल.” असे मत विदेश मंत्रालयाचे सचिव श्री. ज्ञानेश्वर मुळे यांनी व्यक्त केले.
 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय सेंटरमधील ‘सोशल इनोव्हेशन लॅब’ (सिनोलॅब) या नव्या प्रकल्पाचे उद्घाटन मुळे यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. या वेळी मंचावर कुलगुरू प्रो. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. अरविंद शाळिग्राम, पुणे पारपत्र कार्यालयाचे अनंत ताकवले, विद्यापीठातील ‘आंतरराष्ट्रीय सेंटर’चे प्रमुख डॉ. विजय खरे, स्पेनमधील युनिव्हर्सिटी ऑफ सॅन्तिआगोच्या परराष्ट्र व्यवहार अधिकारी इजाबेल बॅरेरिओ वॅझक्वेझ, एज्युलॅब एज्युकेशन एक्सचेंज प्रा. लि.चे संस्थापक संचालक प्रतिक गांधी आणि त्यांचे सहकारी दामेन हानेट उपस्थित होते.
 
निसर्ग आपल्या आयुष्याला सतत नवी दिशा देत असतो. या बदलांना स्वीकारत आपल्या आयुष्यात योग्य ते बदल करता आले पाहिजेत. मागे एका लेखात वाचले होते की, नजिकच्या काळात कदाचित माणूस ही जात उरणार नाही. कारण २०२४ पासून पुढे आपल्याला मरायचे आहे की नाही हे निवडता येणार आहे. पण जर असे जगतच रहायचे असेल तसे वार्धक्य हे मरणप्राय असेल. जोपर्यंत जगण्यात मौज आहे तोपर्यंत मरण्यात मौज आहे. जेनेटिक इंजिनिअरिंग, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, क्लोनिंग आणि सतत नव्या येणाऱ्या तंत्रज्ञानामुळे आयुष्य थिटे झाले आहे. माणसाने माणसाशी बोलले पाहिजे. ज्याला आपण गप्पा मारतो ती कलाच लोप पावत चालली आहे. हे गंभीर आणि अस्वस्थ करणारे आहे. तंत्रज्ञान हे संवाद वाढवणारे पाहिजे. जगणे सुकर करणाऱ्या तंत्रज्ञानाचा अतिरेक झाला तर संवाद खुंटून आपण जगायचेच विसरून जाऊ ही भीती अलीकडे जास्त जाणवते, असेही श्री. मुळे म्हणाले.
 
कुलगुरू प्रो. करमळकर म्हणाले की, तरुणांच्या कल्पना, त्यांचे म्हणणे ऐकून घेतले गेले आणि त्यांनी मांडलेल्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न झाले तर नवीन उद्योग उत्तमरित्या उभे राहतील. वसुधैव कुटुम्बकम् ही भारतीय तत्त्वविचारांमधील प्राचीन संकल्पना कालातीत आहे. आंतरराष्ट्रीय सेंटरच्या माध्यमातून आज दोन विद्यापीठे, दोन देशच नाही तर अनेक देशांमधील विद्यार्थी एकमेकांच्या सहाय्याने संकल्पनांच्या देवाणघेवाणीतून शक्यता तपासतील आणि विद्यापीठातील तज्ज्ञ त्यांना मार्गदर्शन करतील. यातून उद्याच्या काळासाठी भरीव काम उभे राहील असा विश्वास आहे. विद्यार्थी उत्तम कामगिरी करतील यात मला कोणतीही शंका नाही, असे मत कुलगुरूंनी व्यक्त केले.
 
नव्या पिढीच्या कल्पनांना इनोव्हेशन आणि प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळाल्यास रोजगार संधी योग्य पद्धतीने उपलब्ध होतील असा विद्यापीठाला विश्वास वाटतो. उद्योजकतेला वाव देताना वास्तवात उतरणाऱ्या आणि सुकर आयुष्याला उभारी देणाऱ्या प्रकल्पांना विद्यापीठाचा पाठिंबा राहील असे आश्वासन दिले, असे प्र-कुलगुरू डॉ. उमराणी म्हणाले.
 
नाविन्यपूर्ण कल्पनांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपणारे उद्योजक आणि उद्योजिकांसाठी ‘सिनोलॅब’ची उभारण्यात आली आहे. नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रम (सोशल इनोव्हेशन) आणि संकल्पना मांडण्यासाठी आणि राबविण्यासाठी ही लॅब असेल, अशी माहिती विभागप्रमुख डॉ. विजय खरे यांनी यावेळी दिली.
 
@@AUTHORINFO_V1@@