११/०९, जो घडलाच नाही...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |



खरं म्हणजे, अमेरिकेचा किंवा ‘नाटो’ संघटनेचा युद्ध करण्याचा किंवा अवकाशयुद्ध करण्याचा तर अजिबातच उद्देश नव्हता. त्यांना फक्त शक्तिप्रदर्शन करायचं होतं, पण याने सोव्हिएत श्रेष्ठी खरंच घाबरले आणि प्रतिहल्ल्याच्या तयारीला लागले.

११ सप्टेंबर २००१ हा दिवस आपल्या चांगलाच लक्षात आहे, कारण इस्लामी अतिरेक्यांनी त्या दिवशी न्यूयॉर्कच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरचे जुळे मनोरे उद्ध्वस्त केले. सगळ्या जगाने ते भीषण दृश्य दूरदर्शनवर ‘लाईव्ह’ पाहिले.

अमेरिकेचं सगळं वेगळंच असतं. आपण हा दिनांक ‘११/०९/२००१’ असा लिहितो. अमेरिका मात्र तो ‘९/११’ असा लिहितो. कारण काय? खास कारण असं काहीच नाही. प्रत्येक गोष्टीत वेगळेपणा दाखवायचा. जग इंधन तेलाला ‘पेट्रोल’ म्हणतं तर हे ‘गॅस’ म्हणणार. जग मोटारच्या पाठच्या भागाला ‘डिक्की’ म्हणतं, तर हे ‘ट्रंक’ म्हणणार आणि स्वतःच्या पाश्वभागाला ‘डिक्की’ म्हणणार.

तर ते असो. पण २००१ सालच्या विध्वंसापूर्वी आणखी एक ‘९/११’ घडणार होतं. केवळ अमेरिकेचंच नव्हे, तर सगळ्या जगाचंच! नशीब बलवत्तर म्हणून ते घडता घडता राहिलं. ते जर घडलं असतं, तर सोव्हिएत रशिया आणि अमेरिका हे देश तर पूर्णपणे भस्मसात झालेच असते. पण, जगभरात जिथे जिथे त्यांनी एकमेकांविरुद्ध क्षेपणास्त्रे रोखून ठेवलेली होती, ते देशही राखेचे ढिगारे झाले असते. वैज्ञानिक भाषेत बोलायचं, तर जगात फक्त झुरळ आणि विंचू एवढेच सजीव प्राणी जिवंत राहिले असते.

म्हणजे अणुयुद्ध घडण्याची शक्यता होती. तो दिनांक होता ९नोव्हेंबर १९८३. म्हणजे, आपल्या पद्धतीने लिहिल्यास ९/११ आणि अमेरिकी पद्धतीने लिहिल्यास ११/९.

काय आहे ही भानगड? ही भानगड तुमच्या- आमच्यापर्यंत म्हणजे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत यायला १९८३ ते २०१८ अशी तब्बल ३५ वर्षं उलटून गेली आहेत. टेलर डाऊनिंग नावाच्या एका संशोधक पत्रकार लेखक आणि अनुबोधपट निर्मात्याने त्या घटनेवर एक उत्कृष्ट पुस्तकच लिहिलं आहे. ‘१९८३ : रीगन आंद्रोपोव्ह ऍन्ड अ वर्ल्ड ऑन द ब्रिंक’ असं त्याचं नाव आहे. राजकारणाच्या अत्युच्च पातळीवर कसकशा घटना घडत असतात, सामान्य माणसाला त्यांचा पत्ताही नसतो आणि त्या पातळीवरच्या संबंधित व्यक्तींनी तारतम्य वापरून, जर नीट निर्णय घेतले नाहीत, तर होणारे भीषण परिणाम सामान्य माणसांना कसे भोगावे लागतात हे आपाल्यालाच माहीत आहेच.

१९८१ साली अमेरिकेत रोनाल्ड रीगन हे राष्ट्राध्यक्ष बनले. रीगन आक्रमक प्रवृत्तीचे होते. शिवाय त्या सुमारास अमेरिकेने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात खूपच पुढे मुसंडी मारली होती. सोव्हिएत रशिया पिछाडीवर पडला होता आणि उच्च नेतृत्वाच्या म्हणजेच राष्ट्राध्यक्ष लिओनिद ब्रेझनेव्ह आणि त्यांचे सहकारी त्यांच्या जुनाट मनोवृत्तीमुळे तो आणखी आणखी मागे पडत होता.

१९६२ साली क्यूबा पेचप्रसंगाच्या वेळेस अमेरिका आणि रशिया तुल्यबळ होते. अमेरिकेच्या अगदी अंगणात असलेल्या क्यूबा या कॅरेबियन समुद्रातल्या देशात रशियाने क्षेपणास्त्र उभी केली. अमेरिका आणि सगळे पश्चिमी लोकशाही देश हादरले. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांनी कणखर भूमिका घेत, सोव्हिएत राष्ट्राध्यक्ष निकीता कु्रश्‍चेव्ह यांना अंतिमोत्तर पाठवलं. यातून आता तिसरं महायुद्ध भडकरणार की काय म्हणून जग धास्तावलं, पण केनेडी आणि कु्रश्‍चेव्ह दोघांनाही एकमेकांच्या शक्तीचा अंदाज होता. दोन्ही राष्ट्राध्यक्ष फक्त एक बटण दाबून, एकमेकांच्या आणि त्याचबरोबर संपूर्ण जगातल्या सर्वच देशांचा संपूर्ण उच्छेद करू शकतात, याची कल्पना असल्यामुळे दोघांनीही समझोता केला आणि सर्वंकष युद्ध टाकलं.

पण आता हे १९६२ साल नसून, १९८१ साल होतं. अमेरिका विज्ञान आणि तंत्रज्ञानात कुठच्या कुठे निघून गेली होती. रशियन राष्ट्राध्यक्षाने बटण दाबून अमेरिका आणि तिचे मित्र देश यांच्याविरूद्ध रोखलेली आण्विक क्षेपणास्त्र मुक्त करावी या चालीवर आता अमेरिकेकडे प्रभावी प्रतिचाल होती आणि ती म्हणजे ‘स्टार वॉर’.

रोनाल्ड रीगन यांनी सत्तेवर आल्यापासून आक्रमकपणे सोव्हिएत रशियाविरुद्ध भाषण करायला सुरुवात केली. साम्यवादी सोव्हिएत रशियाने जगभर पसरून ठेवलेल्या लाल साम्राज्याला त्यांनी उघडपणे ‘इव्हिल एम्पायर’ असं संबोधायला सुरुवात केली आणि अखेर एक दिवस अमेरिकन संसदेत त्यांनी जाहीर केलं की, सोव्हिएत रशियाने जगभराच्या अनेक गुप्त लष्करी तळांवरून अमेरिका नि तिच्या दोस्तांच्या रोखाने बसविलेल्या आंतरखंडीय आण्विक क्षेपणास्त्रांना आम्ही भीक घालत नाही. त्या क्षेपणास्त्रांना अवकाशातून येऊन, काटणारी प्रतिक्षेपणास्त्रं आमच्याकडे आहेत. त्या कालखंडात अमेरिकन दूरदर्शनवर ‘स्टार वॉर’ ही विज्ञान काल्पनिक (सायन्स फिक्शन) मालिका सुरु होती नि ती कमालीची लोकप्रिय झाली होती. क्षेपणाशास्त्रांचं युद्ध आकाशातून अवकाशात नेणार्‍या आपल्या प्रतिक्षेपणास्त्र प्रणालीला रीगन यांनी तेच लोकप्रिय नाव दिलं ‘स्टार वॉर’.

रीगन यांच्या जाहीर घोषणेमुळे जगभरच्या सर्व लोकशाही देशांत खुद्द रशियात नि रशियाने साम्यवादी गुलामगिरी लादलेल्या देशांत आनंदाची आणि आशेची लाट उसळली. सोव्हिएत सत्ताधारी तंबूत मात्र घबराट उडाली. सोव्हिएत तिजोरीत खडखडाट होता. अफगाणिस्तानात असलेल्या सोव्हिएत सेना गनीम पठाणी टोळ्यांकडून जबर मार खात होत्या. विज्ञान-तंत्रज्ञानात अमेरिकेने घेतलेल्या आघाडीवर सोव्हिएत वैज्ञानिकांकडे उत्तर नव्हतं. त्यातच लिओनिद ब्रेझनेव्ह आणि कॉन्स्टन्टाईन चेरवेन्को हे दोन राष्ट्राध्यक्ष पटापटा मरून, युरी आन्द्रोपोव्ह या माजी गुप्तहेर प्रमुखांच्या हाती सत्ता आली होती. पण, अल्पावधीतच ते किडनी विकाराने गंभीर आजारी पडले असे म्हटले जाते की दोन्ही किडण्या बाद झालेल्या आन्द्रोपोव्हना राजधानी मॉस्कोच्या उपनगरातल्या एका सुसज्ज, पण गुप्त रुग्णालयात ठेवलं होतं आणि देशाचा सगळा कारभार क्रेमलिनऐवजी तिथूनच चालू होता.

आणि अशातच अकस्मात बातमी धडकली की, अमेरिका आणि तिचे युरोपीय मित्र देश म्हणजेच ‘नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनयझेशन’ उर्फ ‘नाटो’ संघटना ही ७ नोव्हेंबर ते ११ नोव्हेंबर १९८३ या पाच दिवसांत अत्यंत व्यापक असा सैनिकी सराव करणार आहे. बेल्जियममधील कॅस्च्यू या नाटोच्या मुख्यालयातून या ‘एबल आर्चर ८३’ नामक एक्सरसाईजचं संचलन केलं जाणार असून, ‘नाटो’ संघटनेच्या सदस्य देशांचं भूदल, वायुदल आणि नौदल फार मोठ्या संख्येने पश्‍चिम युरोप आणि पूर्व युरोप यांच्या सीमांवर जमून युद्ध सराव करेल.

सोव्हिएत श्रेष्ठींनी याचा अर्थ ‘स्टार वॉरसुरु होणार असा घेतला आणि आपल्या आण्विक क्षेपणास्त्र प्रणाली हाताळणार्या लोकांना संपूर्ण सज्जतेचे आदेश दिले. एकच धावपळ उडाली. युरोपमधील अमेरिकन वायुदलाच्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख लेफ्टनंट जनरल लिओनार्ड पेरुटस् याला अर्थातच ताबडतोब या धावपळीच्या बातम्या कळल्या. खरं म्हणजे, अमेरिकेचा किंवा ‘नाटो’ संघटनेचा युद्ध करण्याचा किंवा अवकाशयुद्ध करण्याचा तर अजिबातच उद्देश नव्हता. त्यांना फक्‍त शक्तिप्रदर्शन करायचं होतं, पण याने सोव्हिएत श्रेष्ठी खरंच घाबरले आणि प्रतिहल्ल्याच्या तयारीला लागले. हे पाहून पेरुटस्ला खरं तर गंमत वाटायला पाहिजे होती, पण तो येडबंबू नुसताच गोंधळून गेला. म्हणजे पाहा! असे पप्पू लोक केवळ आपल्याकडेच आहेत असं नाही; तर चक्‍क अमेरिकन गुप्तहेर खात्यातसुद्धा होते.

युरोपातल्या विविध देशांतल्या गुप्त हस्तकांकडून येणार्‍या खबर्‍यांकडून सोव्हिएत श्रेष्ठींनी निष्कर्ष काढला की, ९ नोव्हेंबर १९८३ या दिवशी सर्वंकष आण्विक युद्ध होणार नि संपूर्ण जग एक राखेचा ढिगारा बनणार, पण काहीच घडलं नाही. ‘एबल आर्चर ८३’ युद्ध सराव ठरल्याप्रमाणे सुरु झाला नि संपला आणि सोव्हिएत श्रेष्ठींनी सुटकेचा निःश्वास टाकला.

या सगळ्या तणावाची नि थरार नाट्याची माहिती दोन्ही बाजूकडच्या हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्याच व्यक्तींना होती. आपल्याला ती कळायला तब्बल तीन तपं उलटून जावी लागली आहेत. अज्ञानातच किती सुख असतं!

@@AUTHORINFO_V1@@