भीती मेंदूत आरपार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jun-2018   
Total Views |



गुन्हेगारांना आंदण देणारी एखादी व्यवस्था सूक्ष्म रूपात कार्य करत असली तरी त्याचे तीव्र पडसाद हे समाजात उमटतात.

सध्या समाजात तेढ, क्रोध, परस्परांमधील द्वेष, त्यातून होणारे गुन्हे वाढत आहेत. समाजातील या घटना अचानक वाढल्या काय? तर नाही. या वृत्ती वाढीस लागण्यासाठी त्या त्या समाजात तशी स्थिती निर्माण झाली किंवा करण्यात आली. याला कारणीभूत राजकीय मतभेद, जातीव्यवस्था किंवा काही अन्य कारणे असू शकतील पण याची दाहकता आता प्रचंड वाढली आहे. गुन्हेगारांना आंदण देणारी एखादी व्यवस्था सूक्ष्म रूपात कार्य करत असली तरी त्याचे तीव्र पडसाद हे समाजात उमटतात. औरंगाबादसारख्या शहरात सध्याचे वातावरण पाहाता समाजातील सामान्य नागरिक काहीसा भेदरलेला आहे. त्याला सुरक्षिततेची उणीव भासू लागली आहे. दंगली, सातत्याने पेटणारा कचरा प्रश्‍न यासारख्या समस्या डोके वर काढत आहेत. या परिस्थितीचा फायदा घेत गुन्हेगारी पाश्वभूमी वाढीस लागल्याचे चित्र आहे. क्षुल्लक कारणावरून होणारे वादही आता टोक गाठत आहेत. शेवगा तोडल्याचा राग मनात ठेवून एकाने ८१ वर्षीय डॉक्टरवर तलवारीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. औरंगाबादमधील गादिया विहार भागात ही घटना घडली. काही दिवसांपूर्वीच डॉ. पांडुरंग काळे यांच्या घरासमोरील शेवग्याच्या शेंगा विजय साबळे याने तोडल्या होत्या. या शेवगा का तोडल्या, याचा जाब डॉक्टर काळे यांनी साबळेला विचारला. त्याचाच राग विजयच्या मनात होता. या रागातून विजयने स्कूटरवरून घरी जाणाऱ्या डॉ. काळे यांच्यावर तलवारीने हल्ला केला गेला. मुळात प्रश्न हाच आहे की, शेवगा तोडणाऱ्या आणि त्यावर आपली गुजराण करणाऱ्या विजय या व्यक्तीकडे तलवारीसारखे हत्यार इतक्या सहजतेने कसे येते? दुसरे म्हणजे, समाजात आणि औरंगाबाद शहरात असे किती विजय खुले फिरत असतील, याचा विचार कारायला हवा. जाब विचारणे ही चूक असू शकत नाही. समाजात असे विजय खुल्याने फिरू लागले तर दिवसाढवळ्या उघड्या डोळ्यांनी सामान्य नागरिकांना काय काय पाहावे लागेल याची शक्यता व्यक्त न केलेलीच बरी, पोलीस यंत्रणांवर थेट खापर नेहमीच फुटते पण ‘विजय’ ही वृत्ती आहे. त्यामुळे अशा वृत्ती समाजात दररोज काही ना काही कारणाने निर्माण होतात. त्यांना पाठबळ देणार्‍या शक्तींवर विजय मिळवता येणे गरजेचे आहे. काही दिवसांपूर्वीच औरंगाबादमध्ये ऑनलाईन पद्धतीने तलवार विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याबाबत ठोस पाऊले प्रशासनाने उचलणे गरजेचे आहे. अन्यथा ही दहशत आणि भीती मेंदूत आरपार घर करेल.

राजकीय स्वार्थ नको

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मगावी चौंडी (ता. जामखेड) येथे जयंती सोहळ्यात गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्यासमोरच धनगर आरक्षणावरून गोंधळ झाला. जलसंधारणमंत्री राम शिंदे यांचे भाषण सुरू असताना बहुजन एकता परिषदेचे अध्यक्ष डॉ. इंद्रकुमार भिसे व त्यांच्या समर्थकांनी सभेत गोंधळ घातला. पोलिसांनी लाठीमार करत भिसे यांच्या कार्यकर्त्यांची धरपकड केली. अहिल्याबाईंच्या व्यक्तिमत्त्वाचा सकारात्मक उपयोग न करता भिसे व त्यांच्यासारखे समर्थक हे केवळ त्यांचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी कसा करता येईल, याचा विचार करताना दिसतात. अहिल्याबाईंसारख्या व्यक्तिमत्त्वाचा वापर केवळ धनगर आरक्षणासारख्या जातीय राजकारणासाठी करण्यात येणे, हे चूक आहे. तीन वर्षांपासून पालकमंत्री राम शिंदे यांच्या पुढाकारातून चोंडीत अहिल्यादेवी जयंतीचा कार्यक्रम होत आहे. गेल्यावर्षी केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय आले होते. यावेळीही काही युवकांनी धनगर आरक्षणावरून त्यांना जाब विचारला होता. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या भाषणात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न झाला होता. यंदा लोकसभेच्या अध्यक्षा आणि इंदूरच्या खा. सुमित्रा महाजन यांच्याही कार्यक्रमात भिसे यांनी व्यत्यय आणला.

अहिल्याबाईंचे राजकारण हे समाजाभिमुख होते. अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या राज्यकाळात सती परंपरा व हुंडाबळी परंपरा बंद केल्या. स्त्री असूनही तिच्यात अहंकाराची भावना मुळीच नव्हती. विलक्षण धर्मवेडाबरोबरच त्यांच्यात परधर्म सहिष्णुता होती. पराकाष्ठेचा धर्मभोळेपणा असूनही आपल्या प्रजेच्या कल्याणाखेरीज दुसरे विचार त्यांनी मनाला शिवू दिले नाहीत. अहिल्याबाईंनी भारतभरात अनेक मंदिरे, घाट बांधले व त्यांचा जीर्णोद्धार केला. महेश्वर व इंदूर या गावांना केवळ सुंदरच बनवले नाही तर या शहरांच्या नदीकिनारी घाट बांधले. जलसंधारणाची कामे केली. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. त्यांच्या या कार्याचा आदर्श न घेता चौंडीत भिसे यांच्याकडून घडलेला प्रकार अशोभनीय वाटतो. अहिल्याबाईंचे भगवेकरण सुरू असल्याचे बिनडोक आरोप करणार्यांनी पुन्हा एकदा होळकरांच्या सामाजिक कार्याचे अध्ययन करणे गरजेचे आहे, तर डोक्यात काही प्रकाश पडण्याची शक्यता आहे.

@@AUTHORINFO_V1@@