मेहबूबांचा मध्यम मार्ग...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-May-2018
Total Views |


मेहबूबा मुफ्तींची मागणी गैरलागू नसली तरी मधला मार्ग कोणता हा प्रश्‍नच आहे. जसजशा लष्कराच्या कारवाया अधिकाधिक वाढत जातील तसतशा दगडफेकीच्या घटना वाढणारच आहेत. कारण, हा शेवटचा पर्याय आता फुटीरतावादी अवलंबित आहेत. काश्मिरी जनतेला हे सत्य जितक्या लवकर कळेल तितके त्यांच्यासाठी बरे असेल.
 
जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्राकडे याचना केली आहे. जम्मू-काश्मीरमधला हिंसाचार पुन्हा उफाळून येण्याच्या शक्यतेने त्यांनी केंद्राकडे मागणी केली आहे. त्यांच्या मागणीनुसार केंद्राने काही मध्यम मार्ग काढावा, अशी याचना केली आहे. हा मध्यम मार्ग म्हणजे काय, हे मात्र त्यांनी सांगितलेले नाही. फुटीरतावादी नेते, त्यांच्या नादी लागलेले लोक हेच आज जम्मू-काश्मीरचे वास्तव असल्याचे रंगविले जात आहे. माध्यमे यात अग्रेसर आहेत. भारतीय सैन्याने अद्याप तरी सामंजस्याची भूमिका घेतली आहे. कारण, हा भूभाग अखेरपर्यंत भारताचाच हिस्सा आहे. यावर त्यांचा विश्‍वास अडीग आहे. सरकार कोणतेही आले तरी सैन्याला मात्र आपल्या या भूमिकेवर ठाम राहावेच लागते. मध्ये मध्ये सैन्याचा उपमर्द करणार्‍या काश्मिरी तरुणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतच असतात. मात्र, यामुळे सैन्याच्या मानसिकतेत कुठलाही फरक पडलेला नाही. ते त्यांच्या ठिकाणी ठाम आहेत. उलट, काश्मिरी युवकांविषयी मात्र देशभरातल्या नागरिकांच्या मनात राग निर्माण होत असल्याचे चित्र आहे. जम्मू-काश्मीरमध्ये बॉम्बस्फोट, त्यानंतर दहशतवादी कारवायांनी वातावरण बिघडविण्याचे उपद्रव मोठ्या प्रमाणावर कमी झाले आहेत. याबाबत काही बोलायचे असेल तर लष्कराच्या बंदुकाच बोलतात. ‘ऑपरेशन ऑलआऊट’ नंतर आता पुन्हा अस्वस्थता वाढणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. मेहबूबांना नेमकी त्याचीच चिंता वाटत असावी. काश्मीरमध्ये दगडफेकीची घटना पहिली नाही. यापूर्वीही अशा अगणित घटना घडल्या आहेत. सैन्याच्या जाचाला कंटाळून लोक असे वागतात, असा ल्युटंट दिल्लीतल्या पुरोगाम्यांचा अहवाल असतो. ‘ऑपरेशन ऑलआऊट’ नंतर सर्वसामान्य फुटीरतावादी काश्मिरी गट पूर्णपणे भांबावलेले आहे. टिपून मारण्याची सैन्याची ही कवायत त्यांना पचणारी नाही. हे सगळेच फुटीरतावादी गट पाकिस्तानचे पाळीव आहेत. ‘कश्मिरीयत’पेक्षा आणि काश्मिरी जनतेच्या हितापेक्षा त्यांना स्वत:च्या तुंबड्या भरण्यातच अधिक रस आहे. 2017 साली ‘आयबी’च्या अहवालानुसार पाकिस्तानने या फुटीरतावादी लोकांना 700 कोटी रुपये दिल्याचा दावा केला आहे.
 
या भिकेकंगाल देशाला आपली अर्थव्यवस्था स्थिर ठेवण्यासाठी अमेरिकन डॉलर्सची मदत लागते. आपल्या देशातील नागरिकांच्या तोंडात चार घास कमी पडले तरी चालतील, पण काश्मीर धुमसत राहिले पाहिजे. दगड फेकणार्‍यांचे दर आणि त्यांना मिळणारा मेहनताना पूर्णपणे ठरलेला आहे. काश्मिरी भाषेत याला ‘कन्नीजंग’ असे म्हणतात आणि या दगडांच्या लढ्याला ‘संगबाज’ म्हटले जाते. या तरुणांना दररोज दगडफेक करण्यासाठी सहा ते सात हजार रुपये दिले जातात. तसेच पेट्रोलबॉम्ब वगैरे मिळाले तर थोडे अधिक पैसे मिळतात. याला ही मंडळी ‘आझादी’ म्हणतात. अशा भाडूत आंदोलकांकडून ‘आझादी’ मिळण्याची घटना जगात कुठेही घडलेली नाही. केवळ जेएनयुसारख्या डाव्यांच्या किल्ल्यातच अशा ‘आझादी’वर चर्चासत्रे यशस्वी होऊ शकतात.
 
पाकिस्तानी मंडळींना एवढ्याचाही आधार वाटतो. मग भरकटलेल्या डाव्या तरुणांना त्यात अलगदपणे ओढले जाते आणि हे बावळट अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावावर आपल्याच देशात बोंबलत फिरतात. सध्या अलीगढ मुस्लीम विद्यापीठातही तेच सुरू आहे. या सगळ्या मूर्खांना हे समजत नाही की, भारताकडून ‘आझादी’ मिळवून ही मंडळी कुठे जाणार आहेत? पाकिस्तानला आपले सावरणे मुश्किल होऊन बसले आहे. या उठसूठ दगड मारत फिरणार्‍यांना कोण सांभाळणार? आज मेहबूबांचा मान राखून कुणाशीतरी बोलायचे ठरले तरी समोर कोण असेल हाच मोठा प्रश्‍न आहे. पाकिस्तानचा खरा राज्यकर्ता कोण? हा गहन प्रश्‍न आहे. मूळ मुद्दा असा की, खून, मारामार्‍या, परांगदा होणे हे करणारे लष्करशहा, सतत बदलणारे राजकारणी की दहशतवादी यापैकी कुणाला सांगायचे? काश्मिरी जनतेला आज हेही समजत नाही की, जर एखाद्या पुसट शक्यता नसतानाही त्यांना जे स्वप्न दाखविले जाते त्याचे काय होऊ शकते? तिथे बलात्कार झाला की मुलींनाच दोषी ठरवून दगडांनी ठेचून मारले जाते. शिक्षणाची गंधवार्ता नसते. नव्या जगात काय चालू आहे कुणालाही माहीत नाही. राज्यकर्ते कोण आहेत? आपण मतदान कोणाला करतो? माणूस म्हणून विकासाची कोणती फळे आपल्याला मिळतात? या आणि अशा कितीतरी प्रश्‍नांची उत्तरे आज पाकिस्तानसमोर आणल्यावर दिसत नाही. अजून एक घटक चीन आहे. चीनमध्ये अशा घटना झाल्या की तिथले प्रशासन काय करते हे जाहीर आहे. या दोन्ही देशांच्या तुलनेत सध्या काश्मिरी जनतेची बरीच सरबराई चालू आहे. 2016 साली जम्मू-काश्मीरमध्ये अधिकृत अहवालात आलेल्या दगडफेकीच्या घटना 2,690 आहेत. ही अराजकता असूनही सैन्याने देशाचे शत्रू टिपण्याचे काही कमी केलेले नाही. मूळ मुद्दा हा आहे की, यातून काश्मिरी जनतेला काय मिळणार? सईद अलीशाह गिलानी, असिया अंद्रबी आणि अन्य कितीतरी लोकांच्या तुंबड्या मजबूत भरल्या आहेत.
 
 
जम्मू-काश्मीर धुमसत ठेवण्यावरच या मंडळींचा भर आहे. ते धुमसत राहिले तर यांच्या चुली आणि शेकोट्या पेटणार आहेत. यावेळी झालेल्या घटनेत दुर्दैवी घटना अशी की, यात एक लहान मुलगा जखमी झाला आहे. कधी नव्हे तो एक पर्यटकही जखमी झाला आहे. बाकी काहीही असले तरी पर्यटन व्यवसाय हाच जम्मू-काश्मीरचा कणा आहे. इथली अर्थव्यवस्था आणि रोजगार पर्यटनाच्या माध्यमातूनच फुलते. खरेतर आता पर्यटकांनी जम्मू-काश्मीर फुलण्याचा काळ, मात्र असे विपरीत घडण्याचा परिणाम स्थानिकांना भोगावाच लागणार आहे. यातून जे साध्य होईल त्याची किंमत शिकारा चालविणारे, लहान मोठे हॉटेलचालक, गाईड, चहा विकणारे, गाड्या चालविणारे यांनाच भोगावी लागणार आहे. केवळ एक पर्यटक जखमी झाला असला तरी या मोसमात येणार्‍या असंख्य पर्यटकांनीच पाठ फिरविण्याची भीती मोठी आहे. जसजशा लष्कराच्या कारवाया अधिकाधिक वाढत जातील, तसतशा दगडफेकीच्या घटना वाढणारच आहेत. कारण, हा शेवटचा पर्याय आता फुटीरतावादी अवलंबित आहेत. काश्मिरी जनतेला हे सत्य जितक्या लवकर कळेल तितके त्यांच्यासाठी बरे असेल.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@