टॉवरवरील ब्रिटीशकालीन घड्याळाची दुरुस्ती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-May-2018
Total Views |

जैन इरिगेशनचा पुढाकार; सुरतच्या कारागिराने केले चार महिने शर्थीचे प्रयत्न

 
 
जळगाव :
शहरातील अतिशय महत्वाचा आणि गजबजलेला चौक म्हणून शास्त्री टॉवर चौकची ओळख आहे. याठिकाणी खरेदीसाठी मोठी गर्दी होते. चौकातील शास्त्री टॉवरवरील घड्याळ गेल्या अनेक वर्षांपासून बंदावस्थेत होते. ते दुरूस्त करण्यासाठी जैन इरिगेशनने पुढाकार घेतला होता. हे घड्याळ सुरत येथील अशोक विसपुते यांनी चार महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर दुरूस्त केले. त्यामुळे टॉवरवरील या घड्याळाची टीक.. टीक जळगावकरांना पुन्हा अनुभवता येणार आहे.
 
 
इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन यांच्याकडून सामाजिक बांधिलकीचा वसा जैन इरिगेशनने जोपासला आहे. भाऊंचे उद्यान, महात्मा गांधी उद्यानासह शहराच्या सुशोभिकरणाच्या कार्यात जैन इरिगेशनचे महत्त्वाचे योगदान आहे.
 
 
शास्त्री टॉवरवरील घड्याळ दुरूस्तीसाठी मनपाने प्रयत्न केले. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. टॉवरवरील घड्याळ वजनदार असून ते दहाव्या मजल्यावर असल्याने त्याच्या दुरूस्तीचे काम अतिशय जिकरीचे आणि आव्हानात्मक होते. ते दुरुस्त करून जळगावच्या लौकिकात भर घालण्याचे महत्वपूर्ण कार्य जैन इरिगेशनने पूर्ण केले आहे.
 
 
घड्याळाची चार मजल्यापर्यंत वाईडींग चेन
टॉवरच्या दहाव्या मजल्यावर असलेल्या घड्याळ्याचेे डायल १२ फुट तर ५.५ फुट आणि ६ फुट लहान मोठे काटे आहेत. वाईडींग चेन ७२ फुट म्हणजे १२ मीटर, चार मजल्यापर्यंत जाईल एवढी आहे. घड्याळाला पॉवर देण्यासाठी चार प्लेट असून त्या सुमारे १८० ते २०० किलो वजनाच्या आहेत. घड्याळात पितळाचे व्हिल आहे. त्यातील दोन व्हील तयार करण्यासाठी खुप परिश्रम करावे लागते. सुरत, मुंबई, बडोदा याठिकाणाहून घड्याळाचे पार्ट मागवावे लागले. दर आठ दिवसांनी त्याला चावी द्यावी लागते. त्याच्या हाताळणीसाठी दोन जणांची नेमणूक केली आहे.
 
 
टॉवरचे सुशोभिकरण
टॉवरच्या रंगरंगोटीचे काम जैन इरिगेशन कंपनीच्या माध्यमातून झाले आहे. तसेच टॉवरच्या खाली असलेल्या लाल बहादूर शास्त्री यांच्या पुतळ्याच्या मागे भिंत बांधून त्याठिकाणी ‘लाल बहादूर शास्त्री टॉवर’ असे नाव टाकले जाणार आहे. पुतळ्यावर संगमरवरची छत्री लवकरच तयार केली जाणार आहे.
 
देशात १०क्लॉक टॉवर्स
घड्याळांचे मनोरे शहराच्या मध्यभागी असलेल्या चौकात उभे करण्याची संकल्पना ब्रिटिशांनी भारतात आणली. भारतातील महत्त्वाच्या क्लॉक टॉवरमध्ये मुंबई विद्यापीठाचा राजाबाई टॉवर, घड्याळ गोदी, हुसेनाबाई क्लॉक टॉवर (लखनऊ), चौरा बझार क्लॉक टॉवर (हैद्राराबाद), देहरादून क्लॉक टॉवर, घंटा घर (मिर्झापूर), घंटा घर (जोधपूर), मिंट क्लॉक टॉवर (चेन्नई), क्लॉक टॉवर (म्हैसूर) यांचा समावेश आहे. महत्त्वाच्या टॉवरमध्ये जळगावचा उल्लेख केला जातो.
 
 ट्रकभर कचरा काढला
अशोक विसपुते यांनी त्यांचे वडील सदाशिव विसपुते यांच्याकडून घड्याळ दुरूस्तीचे प्रशिक्षण घेतले. टायटन सर्व्हिस सेंटरमध्ये काम केल्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळेच टॉवरवरील घड्याळ दुरूस्तीचे काम यशस्वी केल्याचे ते सांगतात. सुरवातीला कबुतरांचे ठिकाण बनलेल्या या घड्याळाची स्वच्छता करण्यात आली. त्यात ट्रकभर कचरा होता. तो वेळीच काढण्यात आला. अतिशय दणकट असलेले हे घड्याळ वाईडींग पद्धतीचे आहे. त्याला इलेक्ट्रीक पद्धतीत आणण्याचा प्रयत्न झाल्याने ते निकामी झाले. दुरुस्तीच्या वेळी विशेष पद्धतीचे ग्रीस वापरण्यात आल्याचे विसपुते यांनी सांगितले.
 
दुर्मीळ वस्तुंच्या जतनाची गरज
दुर्मीळ टॉवरवरील घड्याळ हे ऐतिहासिक आहे. जळगाव शहराची शोभा वाढविणारे हे घड्याळ दुर्मीळ स्वरुपातील आहे. अशा दुर्मीळ गोष्टींचे आपण जतन करायला हवे. या सर्व वास्तु-वस्तुंमध्ये प्रत्येकाच्या भावना दडलेल्या असतात. जळगावकरांच्या भावना, संवेदना जोपासण्यासाठी जैन इरिगेशन नेहमी पुढाकार घेते. शास्त्री टॉवरवरील घड्याळाच्या दुरूस्तीचे कामही त्या हेतूनेच केले आहे.
- अशोक जैन, अध्यक्ष-जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.
 
 
जिद्द ठेवून घड्याळ दुरूस्त केले
घड्याळ दुरूस्तीचा वसा वडीलांकडून मिळाला. माझ्या आयुष्यातील अनुभव पणाला लावून आव्हानात्मक घड्याळ दुरूस्तीचे काम पूर्ण केल्याचे समाधान आहे. दहाव्या मजल्यावर चढून दुरूस्ती करताना अडचणी आल्या. मात्र, जिद्द ठेवून घड्याळ दुरूस्तीचे काम पूर्ण केले.
-अशोक विसपुते, कारागिर, सुरत
 
 
@@AUTHORINFO_V1@@