आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत १७१ शिक्षकांचे ‘इनकमिंग’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-May-2018
Total Views |

जिल्ह्यातून १२२ शिक्षकांची बदली; उर्दूचा प्रस्ताव निरंकच
बदली प्रक्रिया आता थेट मंत्रालयातून ऑनलाईन

 जळगाव :
प्राथमिक शिक्षण विभागाकडून आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरू झाली आहे. मंगळवारी, ८ मे रोजी पार पडलेल्या प्रशासकीय कार्यवाहीत दुसर्‍या जिल्ह्यातून १७१ शिक्षक बदली होऊन जळगाव जिल्ह्यात दाखल झाले. दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातील १२२ शिक्षक बदली होऊन दुसर्‍या जिल्ह्यात गेले. जिल्ह्यात उर्दू माध्यमासाठी १०० शिक्षकांची पदे रिक्त आहेत. परंतु, दुसर्‍या जिल्ह्यातील एकही शिक्षकाचा प्रस्ताव प्राप्त झाला नाही. तसेच जिल्ह्यातील एकही शिक्षक दुसर्‍या जिल्ह्यात बदली होऊन गेलेला नाही, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी बी.जे. पाटील यांनी दिली.
 
 
‘अनमॅपिंग’चे काम सुरू
बदली प्रक्रियेत जे शिक्षक बदली होऊन दुसर्‍या जिल्ह्यात गेले आहेत, त्यांची नावे बदलीच्या यादीतून वगळण्यासाठी ‘अनमॅपिंग’चे काम देखील तात्काळ सुरू करण्यात आले आहे. अनमॅपिंग आणि बदली प्रक्रियेचे काम एकाचवेळी सुरू असल्याने मंगळवारी जि.प.तील सर्वशिक्षा अभियान विभागात शिक्षकांची तसेच शिक्षण विभागातील अधिकार्‍यांस कर्मचार्‍यांची प्रचंड गर्दी झाली होती. दरम्यान, जे शिक्षक बदली होऊन दुसर्‍या जिल्ह्यातून जळगाव जिल्ह्यात आले आहेत. त्यांच्या याद्या तालुकानिहाय गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे जाणार आहेत. मंत्रालयातून पदस्थापनेबाबत सूचना आल्यानंतर त्यांना सामावून घेतले जाणार आहे. तसेच जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात बदलून गेलेल्या शिक्षकांना वरिष्ठ कार्यालयातून आदेश आल्यानंतर कार्यमुक्त केले जाणार असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली.
 
पदस्थापनाही ऑनलाईनच
बदली प्रक्रियेत बदली झालेले, बदलून आलेल्या शिक्षकांना त्या-त्या जिल्ह्यात ऑनलाईन पद्धतीनेच पदस्थापना दिली जाणार आहे. पदस्थापनेबाबत अद्याप कोणतीही माहिती किंवा सूचना मंत्रालयस्तरावरून शिक्षण विभागाला देण्यात आलेल्या नाहीत, असेही प्राथमिक शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील यांनी सांगितले.
 
 
शिक्षण विभागाची डोकेदुखी कायम
आंतरजिल्हा बदली प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी बाहेरील जिल्ह्यातून तब्बल १७१ शिक्षक बदली होऊन जिल्ह्यात दाखल झाले. बदली होऊन आलेल्या शिक्षकांची संख्या लक्षात घेता जळगाव जिल्ह्यात अजून १५० ते २०० शिक्षकांची पदे रिक्त राहणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे शिक्षण विभागाची डोकेदुखी कायम राहण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, शिक्षक बदली प्रक्रिया आता थेट मंत्रालयातून ऑनलाईन पद्धतीने हाताळली जात असल्याने या प्रक्रियेतील गोंधळ दूर झाला आहे. बदली प्रक्रिया सुरळीत व पारदर्शकपणे पार पडत आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@