कर्नाटक निवडणुका : मतदानाची तयारी अंतिम टप्प्यात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-May-2018
Total Views |

संपूर्ण राज्यात एकूण ५८ हजार मतदान केंद्र

८० हजार इव्हीएमचा होणार वापर 




बंगळूरू :
अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या कर्नाटक निवडणुकांच्या मतदानाची सर्व तयारी अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली असून संपूर्ण राज्यात एकूण ५८ हजार मतदान केंद्रे उभारण्यात येत असल्याची माहिती कर्नाटकचे मुख्य निवडणूक अधिकारी संजीव कुमार यांनी दिली आहे. कर्नाटक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आज ही माहिती दिली.


नव्या मतदारांच्या नोंदणीनंतर राज्यात सध्या ५ कोटी ६० लाख मतदार असल्याचे समोर आले आहे. या आकडेवारीनुसार संपूर्ण राज्यामध्ये एकूण ५८ हजार मतदान केंद्रांची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे कुमार यांनी यावेळी सांगितले. तसेच मतदान केंद्रांच्या उभारणीमध्ये यंदा काही अभिनव कल्पना वापरण्यात येणार असून यामध्ये महिला आणि दिव्यांग व्यक्तींकडून काही मतदान केंद्र चालवले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील ६०० मतदान केंद्र हे पूर्णपणे महिलांकडून चालवले जाणार आहेत. तर १० मतदान केंद्र हे पूर्णपणे दिव्यांगव्यक्तींकडून चालवले जाणार आहेत. तसेच राज्यातील २८ निवडक मतदान केंद्रांवर काही आकर्षक पद्धतीच्या सजावटी करणात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


याच बरोबर केंद्रीय निवडणूक आयोगाने या अगोदरच जाहीर केल्याप्रमाणे यंदा कर्नाटक निवडणुकांसाठी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन अर्थात इव्हीएमचा वापर करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच इव्हीएमबरोबर व्हीव्हीपॅट मशीनचा देखील वापर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व मतदान केंद्रांसाठी मिळून एकूण ८० हजार इव्हीएम मशीनची व्यवस्था करण्यात आली असून तितक्याच प्रमाणात म्हणजे ८० हजार व्हीव्हीपॅट मशीन देखील राज्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात सुरक्षेच्या दृष्टीने देखील सर्व काळजी घेतली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

येत्या १२ तारखेला राज्यामध्ये विधानसभेसाठी मतदान घेण्यात येणार आहे. निवडणुका अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण सध्या कमालीची तापले आहे. विशेष म्हणजे भाजप आणि कॉंग्रेस या दोन पक्षांमध्ये सध्या ही निवडणूक चांगलीच रंगत असल्याचे दिसत आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये सातत्यने पराभवांना सामोरे जात असलेल्या कॉंग्रेस पक्षाकडे सध्या कर्नाटक हे एकमेव मोठे राज्य हातात आहे. परंतु मोदींच्या भाजपने या राज्यात देखील आपली विजयगुढी उभारण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षांमध्येच ही निवडणूक रंगणार आहे. परंतु या सर्वांमध्ये कर्नाटकचे जनता मात्र कोणाला आपला कौल देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@