नाल्यात दुर्गंधीयुक्त पाणी साचल्याने वरणगावकरांचे आरोग्य धोक्यात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-May-2018
Total Views |

नवीन पुलाचे फाउंडेशन प्रवाहापेक्षा उंच, पाणी वाहून जाण्यास अडचण

 
वरणगाव :
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पश्चिमेस असलेल्या नैसर्गिकरित्या पाणी वाहून नेणार्‍या नाल्यामध्ये विकसीत कॉलन्यांचे सांडपाणी वळविण्यात आले आहे. मात्र पालिकेने नाल्यावर प्रतिभानगरला जोडण्याकरीता बांधकाम केलेल्या पुलाचे कॉंक्रीट कंत्राटदारांने पाण्याच्या प्रवाहापेक्षा उंच बांधकाम केल्यामुळे दुर्गंधीयुक्त सांडपाणी साचले आहे, यामुळे परिसरात दुर्गंधी निर्माण झाली आहे, यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
 
 
शहर परिसराच्या डोंगराळ भागातून पूर्वीपासून नैसर्गिकरित्या पांच नाल्यांची निर्मिती झालेली आहे. मात्र शहराच्या वाढत्या विस्तारामुळे चार नाले फक्त कागदोपत्री शिल्लक असून ते प्रत्यक्षात नामशेष झालेले आहेत. तर एक नाला नैसर्गिकरित्या नागेश्वर महादेव मंदिर जुने मकरंदनगर, नवीन मकरंदनगर, कृषी उत्पन्न बाजार समिती, आई हॉस्पिटल प्रतिभानगर, दलितवस्ती आंबेडकरनगर मार्गे भोगावती नदीपात्रापर्यंत कागदोपत्री आस्तित्वात आहे. या नाल्यावरील २०१७ मध्ये नगरपालिकेने जुना कालबाह्य झालेला आई हॉस्पिटलजवळील पूल पाडून नवीन पूलाचे नियोजन करून बांधकाम करण्यात आले. मात्र नगरपालिकेचे बांधकाम अभियंता यांचे दुर्लक्ष आणि कंत्राटदार यांच्या निष्काळजीपणामुळे पूल बांधणीचे फाउंडेशन पाणी प्रवाहाच्या दोन फूट वर बांधकाम केल्यामुळे नाल्यात वळविलेले नागरिवस्त्यांचे सांडपाणी मागील वर्षापासून साचत आहे. या सांडपाण्यात जलपर्णिसह अन्य वनस्पती उगल्यामुळे पाण्याचा उग्र वास येत आहे.
 
 
या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे डांसांच्या उत्पंत्तीमध्ये वाढ झालेली आहे. तापमान वाढ आणि डासांचा त्रास यामुळे नागरिक हैराण झाले आहे. नगरपालिकेने साचलेले लाखो लिटर सांडपाणी नदीपात्रात वाहते करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
 
योग्य पर्याय निवडून कार्यवाही
नाल्यामध्ये साचलेले सांडपाणी वाहुन जाण्याकरीता उद्या कर्मचार्‍यांना सूचना करणार आहे. यापुढे कोणत्याही नाल्यात सांडपाणी साचणार नाही. याची खबरदारी नगरपालिका घेणार आहे. सांडपाणी वाहून जाण्याकरीता योग्य पर्याय निवडला जाईल
- सुनिल काळे , नगराध्यक्ष वरणगाव नगर पालिका
 
 
प्रतिभानगरला जोडणार्‍या नाल्यावरील पुलाचे बांधकाम अधिकार्‍यांचा नजरेखाली केलेले आहे. पुलाचे फाउंडेशन आराखड्यानुसार तयार केले आहे. पालिकेने वेळोवेळी नाल्याची स्वच्छता करत नाही. त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे नाल्यात सांडपाणी साचत आहे.
- शे. कलिम, पूलबांधकाम कंत्राटदार
@@AUTHORINFO_V1@@