बंध मैत्रीचे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-May-2018
Total Views |


उमलणारी मैत्री कळ्यांसारखी असते, जेवढ्या सहजतेने आपण तिला फुलायला देणार तेवढ्याच सहजतेने ती बहरणार. तसेच मैत्रीचे आहे. उगाचच कृत्रिमता न आणता आपल्याला हव्या असलेल्या अटी व निर्बंधता न लादता मैत्रीला मुक्तपणे फुलू द्या आणि मग पाहा तिचा प्रभाव.

अनेकदा आपल्या मनात बरेच प्रश्‍न असतात. त्या सगळ्या प्रश्‍नांची मनासारखी उत्तरे मिळतीलच असे नाही. अर्थात, ती मिळायलाच पाहिजे असाही या जगाचा नियम नाही. पण, बरेच प्रश्‍न आपल्या अस्तित्वाच्या अवतीभवती फिरतात. आपल्या अपेक्षांच्या कोषाभवती असतात. आपल्या स्वप्नांभवती असतात. फार क्वचित असे होते की, आपण आपलं आयुष्य एकट्यानेच जगतो, बहुधा नाहीच! आयुष्यातल्या अनेक टप्प्यांवर आपण आपले छोट्यामोठ्या गरजांप्रमाणे दूरच्या व जवळच्या माणसांशी संवाद साधत असतो. तो संवाद सुसंवाद असेल, ज्यात प्रेम आहे, जिव्हाळा आहे, आदर आहे, तर कधी तो विसंवादही असू शकतो, ज्यात राग आहे, द्वेष आहे, अपमान आहे. काळ बदलत जातो, तसतशा आयुष्यातल्या अनेक गोष्टी बदलत जातात. जुन्या गोष्टी भूतकाळात सुटून जातात, तर येणार्‍या नवीन गोष्टींची आपल्याला कल्पना असते. कल्पना असेल तर त्यांच्या परिणामांचा अंदाज नसतो. पण, या सगळ्यातून आपण जात असतो. कधी आत्मविश्‍वासाने कधी कुठलाही दबाव नसताना तर कधी बिथरत, अडखळत आपण आपल्या जीवनपथावर चालत राहतो. एक गोष्ट मात्र खरी आहे ती म्हणजे, आपल्या अवतीभवती असलेल्या असंख्य गोष्टींतून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आपली विविध प्रकारची नाती. या नात्यांचा प्रभाव व्यक्तीच्या जीवनातील अनेक पैलूंवर दिसून येतो. किंबहुना, आपल्या आयुष्यातील विकाससुद्धा या नात्यांच्या विकासावरच अवलंबून असतो.

प्रत्येक नात्याची पोत आणि वीण वेगवेगळी असते. म्हणूनच नात्याच्या गुंतागुंतीतून बाहेर पडण्याचा साधा-सुकर मार्ग सहज सापडत नाही. हे मार्ग स्वतःलाच शोधावे लागतात. कधी खूप विचार करून हे मार्ग स्वतःच निर्माण करावे लागतात. त्यासाठी या नात्यांना समजून घ्यावे लागते. एका गायकाने छान सांगितले-

बहुत मुश्किल काम है
सभी रिश्तों को खुश रखना।
चिराग जलाते ही
अंधेरे रुठ जाते हैं ।

तर अशा नात्यांची ओळख, त्यातील गुंतागुंत समजून घेण्यासाठी मन तितकेच नितळ असले पाहिजे. ते आपल्याला अनेक प्रसंगांतून समजेल. सुलक्षणा व अनिता दोघी सख्ख्या शेजारी. चाळीमध्ये शेजारशेजारच्या दोन कुटुंबाच्या मैत्रीतून यासुद्धा पक्क्या मैत्रिणी होत्या. लहानपणी एकसारख्या रंगाचे फ्रॉक्स घालून केसांना तसेच रंगीत बो लावून चालताना, कसले कसले आवाज करणारे शूज घालून त्यांचे बाल्य मजेत घडत गेले. दोघींच्याही घरात त्या एकुलत्या एक लेकी होत्या. लहानपणी आर्थिक परिस्थिती अगदीच कठीण नसली, किंबहुना थोडी बरी असली तर मुलीच्या लाडाकोडात ‘फॅशन’ची संकल्पना अगदी लहानपणापासून येते. त्यामुळे या दोघी तशा वयाच्या तीन वर्षांपासूनच ‘फॅशनेबल’ म्हणायला हरकत नाही. दोघींच्याही आई मुद्दाम वेळ काढून त्यांच्या खरेदीला त्यांना घेऊन एकत्रच जात असत. एकसारखे नसले तरी छान छान फ्रॉक्सची खरेदी व्हायची. एकाच वयाच्या असल्याने त्यांना एकाच शाळेत घातले होते. त्यांनाही एकमेकींचा सहवास खूप आवडत होता. त्या दोघींचं एकत्र असणं खूप कौतुकाचा विषय होता. त्या कौतुकाच्या शब्दांनी, प्रेमाच्या शब्दांनी दोघींना खूप छान वाटत असावे. कुठलीही गोष्ट सुलक्षणाला दिली की, ती गोष्ट तिला मिळाली म्हणून होणार्‍या आनंदापेक्षा ती अनिताला दाखवून तिने पसंत केली की, सुलक्षणाचा आनंद द्विगुणीत व्हायचा. अनिताचंही डीट्टो तसेच... एखादी खाण्याची गोष्ट, मग ती जिलेबी असो, केक असो की आईस्क्रीम असो, सुलक्षणाला दाखवायचे. दोघींच्या कुटुंबाने मुलींना खूप छान सवय लावली होती. ती म्हणजे, वाटून खायची. त्यामुळे त्या दोघी त्यांचे बालपण मोठ्या आनंदाने एकमेकांशी समजून- उमजून दिमाखात जगत होत्या. मैत्रीची अशी लहानपणीच निरागस सुरुवात होते. तेव्हा ती खूप घट्ट असते. त्यात आपण एकमेकांबरोबर आहोत, ही भावनाच मुळी मजबूत असते. त्यामुळे चुकूनही आपण कधीतरी वेगळे होऊ शकू, हा भाव त्यांच्यात नव्हता. बाल्यातून त्यांना समज आली ती तारुण्याच्या सुरुवातीच्या काळात निरागस मैत्री, ज्यात कधी काय कमी किंवा काय जास्त ही बेरीज-वजाबाकी नव्हती. केवळ आपण एकमेकांशी जोडले आहोत, या भावनेतूनच सुख होतं आणि ते आता अधिक प्रगल्भ होऊ लागले होते. आता आपण नुसते एकमेकींबरोबर असतो, यापेक्षा आपण एकमेकींबरोबर निष्ठावान असणार आहोत, ही खात्री यायला लागली होती. एकमेकींवरचा विश्‍वास वाढायला लागला होता. एकमेकींचे स्वतंत्र अस्तित्व व मूल्य समजायला लागले होते. काही बाबतीत मग त्या खाण्याच्या गोष्टी असोत, आवडते रंग असोत व आणखी काही असो, आपली अशी स्वतंत्र आवड असते. त्या आवडीमुळे आपले अस्तित्व दुसर्‍यांपासून काहीअंशी वेगळेच असते, हे कळण्याइतपत त्यांना समज आली होती. एकूण स्वत:चे असे खास कंगोरे दोघींनाही समजू लागले होते. असं स्वत:चा काहीतरी वेगळं असतं, पण तरीही ते आपल्याला आपल्या प्रियजनांपासून तोडत नाही, अशी सक्षम मैत्री जेव्हा घडते तेव्हा आयुष्याचा भूत व भविष्य तर सुरक्षित वाटायलाच लागतो, पण वर्तमानसुद्धा एका सुंदर अस्मितेत जगायला लागतो.

या दोन मुलींच्या आयुष्याचे मार्ग वैयक्तिकदृष्ट्या वेगळे असणार यात शंका नाही. पण, एक निखळ मैत्री जोपासणे ही एक अलौकिक कला आहे. कारण, मैत्री केवळ शरीराने एकत्र असल्याने जुळत नाही, तर त्यात सकारात्मक भाव हवेत. आपल्याला ही मैत्री हवी आहे, ती टिकवायची आहे. किंबहुना, नुसतीच टिकवायची नाही तर त्याही पलीकडे जाऊन तिची जोपासना करायची आहे. त्यासाठी मैत्रीत हवी ती निरागसता आणि निर्मळपणा. अल्लड मैत्रीत छक्केपंजे नसतात, तर त्यात एक सुंदर आनंद असतो. ‘मैत्री’ या संकल्पनेला समजत असताना ती निभावण्याची निष्ठा असते. छोट्या छोट्या गोष्टींतून घेता येणारा, मोठा आनंद मैत्रीत असतो. लहान मुलांमध्ये असणारी उत्सुकता असते. एकमेकांसाठी असण्याची व काहीही करण्याची तयारी मुलांमध्ये असते. थोडेसे हातचे राखूनच ठेवायचे, ही वृत्ती मुलांमध्ये नसते. त्यामुळे त्यांचे मैत्रीतील समर्पण पूर्णत्वाकडे जाणारे असते. मैत्रीत गमावण्यासारखं काही नाही, पण मिळविण्यासारखे मात्र खूप आहे, हे समजते, तेव्हाच मैत्री खर्‍या अर्थाने जमते. मैत्रीत देण्यातही घेण्यापेक्षा आनंद आहे, हे समजते तेव्हा मैत्री जमते. मैत्रीतील नि:स्वार्थी बाल्य ज्यांना जपता येते, त्यांना ती मैत्री जीवनभर टिकविता येते. उमलणारी मैत्री कळ्यांसारखी असते, जेवढ्या सहजतेने आपण तिला फुलायला देणार तेवढ्याच सहजतेने ती बहरणार. तसेच मैत्रीचे आहे. उगाचच कृत्रिमता न आणता आपल्याला हव्या असलेल्या अटी व निर्बंधता न लादता मैत्रीला मुक्तपणे फुलू द्या आणि मग पाहा तिचा प्रभाव. आपल्या आयुष्यात जेव्हा जेव्हा मनाला फुंकर घालायची गरज भासेल, तेव्हा तेव्हा मैत्री ती अलगद ती फुंकर घालेल. म्हणून मैत्रीची हाक ऐकायलाच हवी.


- डॉ. शुभांगी पारकर
@@AUTHORINFO_V1@@