यहुदीविरोधी आयती?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-May-2018   
Total Views |

आपल्याकडे राजकारणात आणि निवडणुकांत नेहमीच हिंदू-मुसलमान आणि जाती-धर्माचे मुद्दे उचलत आपली सत्तेची पोळी भाजली जाते. पण, आताचा मुद्दा भारतातला नसून युरोपातला आहे. इस्लामी देशांतली अराजकाची परिस्थिती, सीरिया-इराकमध्ये ‘इसिस’ने घातलेला हिंसक हैदोस आणि त्यातून युरोपीय देशांत होणारे मुस्लिमांचे स्थलांतर या घटनांचीही आताच्या मुद्द्याला पार्श्‍वभूमी आहे. फ्रान्समध्ये सध्या मुस्लीम आणि यहुदी (ज्यू) असा वाद पेटला असून त्याला कारण आहे, कुराणावर घेण्यात आलेले आक्षेप. फ्रान्समध्ये कुराणातील निवडक आयतींवर आक्षेप घेण्यात आला असून त्या हटवण्यासंदर्भातले एक घोषणापत्रही प्रसिद्ध करण्यात आले आहे. या घोषणापत्रामुळे फ्रान्समधील राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. प्रकाशित करण्यात आलेल्या घोषणापत्रामध्ये मुसलमानांचा पवित्र ग्रंथ कुराणमध्ये अशा काही आयत असल्याचे म्हटले की, ज्या यहुदी म्हणजेच ज्यूविरोधी आहेत. त्यामुळे त्या आयतींना तातडीने हटवण्याची मागणीही करण्यात आली आहे. या घोषणापत्रात असाही दावा केला की, या आयती यहुदीविरोधी भावना वाढीस लागण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. हे घोषणापत्र प्रकाशित झाल्यानंतर मात्र त्या विरोधात एकत्र येत तिथल्या मुस्लीम संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत.

फ्रान्समधील वृत्तपत्र ’पीरसेन’मध्ये हे घोषणापत्र प्रकाशित झाले असून त्याचा विषय ’मॅनिफेस्टो अगेन्स्ट द न्यू अ‍ॅण्टी सेमिटिजम’ हा आहे. या घोषणापत्राद्वारे मागणी करण्यात आली आहे की, कुराण करीमच्या ज्या आयतीमध्ये यहुदी, ख्रिस्ती आणि बेदीन नास्तिकांच्या हत्येची आज्ञा दिली आहे, त्यांना हटवले जावे.

कुराणमधील कथित यहुदी विरोधी आयती हटवण्याची मागणी केलेल्या या घोषणापत्रावर सुमारे 300 लोकांच्या स्वाक्षर्‍या आहेत. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, या घोषणापत्रावर फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष निकोलस सारकोजी आणि माजी पंतप्रधान मॅन्युअल वॉल्स यांच्याही स्वाक्षर्‍या आहेत. कुराणमधील आयती हटवण्याची मागणी करणार्‍या आणि घोषणापत्रावर स्वाक्षरी करणार्‍या लेखक पास्कल ब्रुकनेर यांचे म्हणणे आहे की, त्यांची इच्छा इस्लामला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याची नव्हे, तर मुस्लिमांनी सद्भावनेने इस्लाममध्ये सुधारणा करावी ही आहे.

कुराणमधील आयतींवर आक्षेप घेत त्या हटवण्याची मागणी करणारे घोषणापत्र प्रकाशित झाल्यानंतर एका दिवसाने 30 मुस्लीम इमामांनी फ्रान्सच्या एका वृत्तपत्रात त्याच्या उत्तरादाखल एक पत्र प्रकाशित केले. इमामांनी आपल्या उत्तरात म्हटले की, कुराणच्या आयतींविरोधात प्रकाशित केलेले घोषणापत्र वंशवादी आणि घृणास्पद आहे. त्यांनी असाही इशारा दिला की, यामुळे युरोपीय देशांमध्ये विभिन्न धार्मिक समुदायातील संबंधांत तणाव निर्माण होऊ शकतो. इजिप्तचे प्राचीन विद्यापीठ जामिया-अल-अजहरचे उपाध्यक्ष-शेख अल अजहर यांनीही या घोषणापत्राचा निषेध केला. शेख अल अजहर यांनी म्हटले की, कुराण विनाकारण कोणत्याही व्यक्तीची चुकीच्या पद्धतीने हत्या करण्याची आज्ञा देत नाही, तर वाईट आणि अत्याचारी लोकांपासून बचाव करण्यासाठी लढाईचा आदेश देते.

कुराणमधील आयतींविरोधात घोषणापत्र प्रकाशित झाल्यानंतर फ्रान्समधील मुस्लीम समुदायाने म्हटले की, ”हे इस्लामला बदनाम करण्याचे षड्यंत्र आहे. ज्या लोकांनी या घोषणापत्रावर स्वाक्षरी केली, ते लोक मुठभर कट्टरवाद्यांमुळे संपूर्ण मुस्लीम समुदायाला दोषी ठरवत आहेत.” पण, जे मुस्लीम समुदायातील लोक असे बोलत आहेत, त्यांनी कधीही कट्टरवाद्यांचा विरोध केल्याचे कोणाला दिसले नाही, त्यामुळे संपूर्ण मुस्लीम समुदायाबद्दलच संशयाची भावना बळवत चालली आहे, हेही तितकेच खरे.दुसरीकडे संपूर्ण युरोपात जवळपास पाच लाख यहुदी समुदायाचे लोक राहतात. फ्रान्समध्येही यहुदींची संख्या मोठी आहे. मात्र, गेल्या काही काळापासून इस्लामी कट्टरवाद्यांच्या उदयानंतर फ्रान्समध्ये यहुदीविरोधातील हल्ल्यांमध्ये वेगाने वाढ झाली आहे. त्यामुळे यहुदींना आता तेथून पलायन करत इस्रायल गाठावे लागत आहे. यहुदींच्या पलायनाचे कारण युरोपात येत असलेले मुस्लीम निर्वासित आणि त्यांची यहुदीविरोधी भावना हेही आहे. पॅरिसच्या एका वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, 2006 सालापासून आतापर्यंत इस्लामी कट्टरवाद्यांनी 11 यहुदींना केवळ ते यहुदी असल्याने ठार मारल्याच्या घटना घडल्या आहेत. आताही नुकताच एका 85 यहुदी महिलेवर दोघा कट्टरवाद्यांनी चाकूचे सपासप वार करत हल्ला केला होता. एवढेच नव्हे, तर अमानुषपणाचा परिचय देत त्यांनी महिलेच्या शरीरात चाकू खुपसल्यानंतर तिच्या शरीराला जाळून टाकले. या घटनेलाही यहुदीविरोधाचा आयाम होता.


- महेश पुराणिक
@@AUTHORINFO_V1@@